३- डायरी शलाकाची
३- डायरी शलाकाची

३- डायरी शलाकाची

३- डायरी शलाकाची
शलाकाच्या वडिलांच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आणि कधीही न भांडणारे शलाकाचे आईवडील एकमेकांपासून दूर झाले.एक सुंदर घरटे विखूरले.फक्त आईबाबांचेच घर विखूरले नाही.घरट्यातील पिलांचे आयुष्यही कायमचे बदलले…पुढे शलाकाचे जीवन कसे बदलत गेले…वाचा पुढील भागात….
  सुर्यप्रकाश आता सोनेरी बनला होता.निरतिशय सुंदर दृश्य होते. हे असले निसर्गाचे सौंदर्य बघायला कुणीतरी सोबत हवे.आजही तिला असेच वाटले.रोज कित्येक गोष्टी ती एकटीच अनुभवायची.
 मानस नेहमी त्याच्या प्रोजेक्टस् मध्ये गुंतलेला राहायचा. सौंदर्य बघायची,अनुभवायची जाण होती कुठे त्याच्याजवळ.  अंधार पडायला आला होता.शलाका खाली आली.जेवायची वेळ झाली होती. सुखदाने मानसला जेवायला  बोलवले. तिघे जेवले.शलाकाने सोबत जेवायचा पायंडा पाडला म्हणून सोबत जेवणे व्हायची. जेवण करुन मानस लगेच अभ्यासिकेत गेला.शलाका आणि  सुखदा थोडावेळ बोलून आपापल्या खोलीत गेल्या.
शलाका जातांना डायरी घेऊन गेली.
डायरीचे पान उलटले.
दिनांक ? तारीख,महिना काहीही आठवत नाही.
कसे आठवणार? किती वर्ष गेलीत ते प्रसंग  घडून.
नवीन पान आहे म्हणून तिने दिनांक लिहिले आणि परत एकदा जगलेले क्षण अनुभवायला लागली. 
दिनांक…..
मी दहावीत गेली,राजा बारावीत आणि सई बीएसस्सी फायनलला. आता बाबांसाठी आईने अश्रु ढाळणे बंद केले होते.पण आतल्याआत झुरत राहायची.मी खूप  लहानपणी अनुभवलेली आई नंतर कधीही अनुभवली नाही. आईची अशी दुरावस्था बघून  पुरुषांचा मला फार राग यायचा.मी कधीही नवऱ्यासाठी आसवे ढाळणार नाही असे तेव्हा ठरवलेच होते मी.माझी मी  जगेन,मला रडवण्याचा अधिकार मी कुणालाही देणार नाही…….वगैरे बंडखोर विचार डोक्यात येत राहायचे.
राजा खूप मन लावून अभ्यास करायचा. बारावीनंतर त्याला घरातून बाहेर पडायचे होते. त्याला ह्या घरात राहायचे नव्हते. त्याचे बघून मी पण अभ्यास करायचे.
पण माझे अभ्यासात जास्त मन रमायचे नाही.वर्गातली मुले,राजाचे मित्र यांचीच स्वप्ने पडायची. अभ्यास सोडून मग मी तिथेच रमायची.सिनेमातल्या हिरोच्या जागी त्यातला एक आणि  हिरोइनच्या जागी मी असायची.
बारावीचा रिझल्ट आला. राजाला.८०% मिळाले होते.त्याने आयआयटीची परीक्षा दिली होती.त्यातही तो पास झाला होता. दिल्ली आयआयटीत त्याचा नंबर लागला होता. खूप  वर्षांनी आज आईच्या चेहऱ्यावर
न मावणारा आनंद मी बघितला होता. तिने बाहेरुन मिठाई आणली.शेजारी वाटली. घरी गोडधोड बनवले.राजाच्या रिझल्टने आईचा आत्मविश्वास वाढवला. एकटीने सांभाळून मुलाला आयआयटीला पाठवले असे काहीसे आईला वाटत असेल का?
आई आता घरात जरा मोकळेपणाने वावरत होती. राजा जाणार म्हणून त्याच्या आवडीचे जेवण बनवत होते.दिल्लीला जाण्यापूर्वी एकदा बाबांना भेटून ये असे राजाला आईने सुचवले पण राजा तयार झाला नाही.
राजा पहिल्यांदाच दिल्लीला जाणार म्हणून आम्ही तिघीही त्याला दिल्लीला सोडायला गेलो होतो.
तिथे गेल्यावरच आयआयटी काय प्रकार असतो ते कळले.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत होता. तिथे येणाऱ्या प्रत्येक  विद्यार्थ्यांचे भविष्य किती उज्वल आहे, आयआयटीला जाणे किती अवघड आहे .वगैरे.सगळे हेच कुजबुजत होते.मला पण राजाचा खूप अभिमान वाटला.
राजाला सोडून आम्ही वापस आलो. आता आम्ही तिघीच होतो घरी.राजा सतत घरी असायचा त्यामूळे त्याची उणीव जाणवायची.आईला जास्त. आई दर आठवड्याला राजाला एक पत्र लिहायची. तिला राजाची फार काळजी वाटायची.
माझाही रिझल्ट आला.जास्त अभ्यास न करता मला ७५% मिळाले. माझे मार्कस् बघून आईला,सईला खूप  आनंद झाला. आई म्हणाली,
तू पण राजासारखी हुशार  आहेस.अभ्यास केला तर  आयआयटीला जाऊ शकतेस. माझाही आत्मविश्वास वाढला होता.
सई बीएससी झाली.आईच्या  डोक्यात आता तिच्या लग्नाचे विचार घोळत होते. नातेवाइकांनी एकदोन स्थळे आणलीत पण बाबांचे ऐकून त्यांनी  नकार दिला. बाबा गेल्यापासून आई कुठल्याही सामाजिक कार्यात जायची नाही त्यामूळे आमच्या ओळख्याही कमीच होत्या.सईने एमएससीला अॕडमिशन घेतली.
मी ही जोमाने अभ्यासाला लागले. मलाही राजासारखे होस्टेलमध्ये जाऊन राहायचे होते. आईने आमच्यावर बंधने टाकली नाहीत पण तिची करडी नजर आमच्यावर सतत असायची. मला मुक्त जीवन आवडायचे.
सई आणि  मी आम्ही दोघी बहिणी  वेगवेगळ्या होतो. कदाचित् बाबा  त्या दुसऱ्या बाईकडे गेले तेव्हा सई मोठी होती म्हणूनही असेल पण ती जास्त समंजस होती. आईला ती खूप  समजून घ्यायची. त्या दोघी मला लहान समजून  बऱ्याच गोष्टी  सांगायच्या नाही.मला फार वाईट वाटायचे.
शलाका लिहिता लिहिता कधी झोपली तिलाही कळले नाही. मानस खोलीत आला तेव्हा ती गाढ झोपली होती.
शलाका आज पहाटेच उठली. राजाने दिलेला कॕमेरा घेऊन टेरीसवर गेली.सूर्य  उगवत होता. काल संध्याकाळी  बघितलेला सूर्यास्त  आणि आजचा सूर्योदय. रंगांच्या छटा सारख्याच पण दृश्याची परिणामकारकता किती वेगळी.सूर्यास्ताच्यावेळी छटा सुंदर दिसतात पण त्यात थोडी उदासीनता असते आणि  त्याच रंगाच्या छटा पहाटे मात्र प्रसन्न करतात.
शलाका कॕमेरात सूर्योदयाच्या सगळ्या छटा टिपत बसली. मनात बोलली,
‘मी आधीच कॕमेरा का नाही घेतला? किती  मोहक,सुंदर  क्षण मी कॕमेरात बंदिस्त केले असते.किती क्षण हातातून वाळूसारखे निसटले.
फोटो काढून झाल्यावर ती खाली आली.तोवर मानसही उठला होता.
आज शलाकाला काॕलेजमध्ये जायचे होते.एका  इंजीनियरींग काॕलेजमध्ये ती प्रोफेसर होती.
मानसही प्रोफेसर होता पण दुसऱ्या काॕलेजमध्ये.
मानस बोलला,चल आज सोबतच निघू या.
सुखदाला आज काॕलेज नव्हते.ती झोपूनच होती.
दोघांनीही आपापले आवरले आणि सोबतच निघाले.
रस्त्याने शलाका शांतच होती.रोज चिमणीसारखी चिवचिव करणाऱ्या  शलाकाला आज शांत बघून मानसलाही नवल वाटले.त्याने विचारलेही तसे शलाकाला. ती काहीच बोलली नाही.फक्त  हसली.
क्रमशः
सई,शलाका,राजा तीन बहीणभाऊ.सईचे लग्न झाले.राजा होस्टेलमध्ये गेला.शलाका आणि आई दोघीच घरी….पुढे ….

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!