१३-तिची आजी

तिची आजी
मुलांकडे,त्यांच्या अभ्यासाकडे इंदुमती मुळीच लक्ष देत नव्हती.  उलट आपल्याजवळ खूप पैसे आहेत त्यामुळे शिक्षणाची आपल्याला गरज नाही असे मुलांवर बिंबवत गेली. प्रभाकरची मुले शाळेत जाईनासे झाले……
 भाग -१३
 त्यांना अभ्यास करण्यापेक्षा बाकी गोष्टीत जास्त रस वाटायला लागला. मनोहर कधी गावी आला तर त्यांना समजवायचा. पण प्रभाकरची मुले ऐकायची नाही.
 त्यांना शिक्षणाचे आणि पैशाचे मोल वाटेनासे झाले होते.बाहेर फिरणे,मित्रांवर खर्च करणे यातच वेळ घालवत होते.
श्रीधरला चार मुले. फॕक्टरीत पगार तुटपुंजा होता.मुले शिक्षण घेत होती. घरात नेहमी पैशाची नड राहायची. मोठ्या मुलाच्या  ॲडमिशनसाठी त्याला पैसे पाहीजे होते.शारदाने त्याला दादाकडून थोडे पैसे घ्या असे सुचविले.दादा पैसे देणारच या खात्रीने श्रीधरने पैशांसाठी प्रभाकरला पत्र पाठवले.पण प्रभाकरने यावर्षी कमी पीक झाले असे सांगून पैसे द्यायला साफ नकार दिला.
एवढी वर्ष  शेतीतील काहीही उत्पन्न श्रीधर आणि  मनोहरने मागितले नव्हते.आणि प्रभाकरने स्वतःहून काही दिले नव्हते.पहिल्यांदा थोडे पैसे मागितले तर तेही द्यायला तो तयार नव्हता.श्रीधर दुखावल्या गेला.प्रभाकरने पैसे दिल्याशिवाय मुलाची ॲडमिशन होणे शक्य नव्हते.काय करावे त्याला सुचत नव्हते.
त्याने मनोहरला पत्र पाठवून शेतीचा हिस्सा मागू या असे सांगितलं. मनोहरने त्याला जरा सबूरीने घ्यायला सांगितले. मनोहरने प्रभाकरला श्रीधरला पैसे दे आणि वाटण्या टाळ असा सल्ला दिला.
आई जिवंत असेपर्यंत वाटण्या नको  असे मनोहरला वाटत होते पण प्रभाकर ऐकायला तयार नव्हता. तो श्रीधरला पैसे द्यायला तयार झाला नाही.भाऊ वाटण्या मागातील असे त्याला वाटत नव्हते.
प्रभाकरच्या हट्टीपणामुळे शेवटी शेतीच्या  वाटण्या करायचे ठरलेच.
सीताईच्या कानावर ही  वाटण्यांची गोष्ट गेली.एका घरात सोबत वाढलेली मुले वाटण्या मागत असतील तर आईला यातना होणारच. पण प्रभाकरच्या हेकेखोर स्वभावामुळे हे होणेच होते.सीताईसोबत प्रभाकर क्वचितच काहीतरी बोलायचा.त्यामुळे सीताईने त्याला समजवून सांगू  शकत नव्हती.
श्रीधर वाटण्यांसाठी  आला. मनोहरही गेला.त्याकाळी मुलींना वाटणी देण्याचा प्रघात नव्हता. त्यामुळे शेतीची वाटणी तीन भावांमध्ये होणार होत्या.
 दया आणि  गीता आल्या नाहीत. दोघींचे नवरे आले.जावई असल्यामुळे त्यांना मान देण्यात आला.
मनोहर येतांना सीताईलाही घेऊन आला. 
वाटण्या झाल्या. प्रभाकर मोठा आणि  त्याला नौकरी  नसल्यामुळे आठ एकर शेती जास्त देण्यात आली.
श्रीधर लहान म्हणून त्याला विहीर असलेले शेत देण्यात आले.मनोहर सर्वात लहान शेत देण्यात आले,आणि  सीताईच्या नावावर चार एकर शेत करण्यात आले.संपूर्ण शेतीची मालकीण असणारी  सीताई आता फक्त चार एकर शेतीची मालकीण  होती.
प्रभाकरने वाटण्या व्हायच्या आधीच स्वतःच्या कुटुंबासाठी मोठे घर बांधले होते. तो आता तिथे राहायला गेला.
सीताईने आता घरीच राहावे असे मनोहर आणि श्रीधरचे मत पडले.कारण एकेकाळी नांदते असणारे घर रिकामे झाले होते. कोणी कुठेही राहले तरी सोबत त्याच घरात वाढले होते.सीताईलाही दुसऱ्यांच्या घरी राहणे बरे वाटत नव्हते.म्हणून आता तिने इथेच राहायचे ठरवले.
एवढ्या मोठ्या घरात सीताई एकटी कशी राहणार हा प्रश्न सर्वांनाच पडला.सीताई हिंमतवान होती.ती तयार झाली एकटी राहायला.आधीसारखीच रोज रात्री  झोपायला तिची मैत्रीण पूर्णा येणार होती.शिवाय घरातील आठवणी सोबत होत्याच.
मनोहर,श्रीधर आपापल्या गावी,प्रभाकर नवीन घरात राहायला गेला.सीताई आता पूर्णपणे एकटी होती,शरीराने आणि  मनानेही. पण ती तिच्या स्वतःच्या घरी होती यातच तिला आनंद होता. तिने पुन्हा शेतीकडे लक्ष देणे सुरु केले.मनोहर तिला भेटायला दर शनिवारी यायचा.मनोहर,श्रीधर आणि  सीताईची शेती एकत्र होती.श्रावण प्रभाकरसोबत गेला .मनोहरला आता नवीन गडी ठेवावा लागला.
सीताई आता म्हातारपणाकडे झुकत होती पण पुन्हा शेतीकडे लक्ष ठेवत होती. दिवसभर स्वतःला कामात गुंतवत होती. रात्री पूर्णासोबत थोड्या गप्पा व्हायच्या.गावातील सगळ्या बातम्या पूर्णा सीताईला द्यायची.
अधूनमधून भाभी एकटी आहे म्हणून नर्मदा भेटायला यायची.पण एकंदरीत घरची वर्दळ कमी झाली होती. कधीकाळी तिथे एक नांदते कुटुंब होते याच्या आता फक्त आठवणी शेष होत्या.
मनोहरला शेतीचा अनुभव कमी होता त्यामुळे सुरवातीची काही वर्ष नुकसान होण्यातच गेली.पण हळूहळू तोही अनुभवी झाला.
दिवस ,वर्ष सरत गेले.तिघाही भावांची मुले मोठी होत होती.
प्रभाकरची मुले लग्नाला आली होती. मुले शिकली नाहीत त्यामुळे कुणालाही नौकरी नव्हती. प्रभाकरच्या मुलीसाठी मनोहरने चांगले स्थळ शोधले.पहिले लग्न असल्यामुळे तिच्या लग्नात सगळे आले.प्रभाकरने मुलीचे लग्न थाटामाटात केले.
 सीताई नातीच्या लग्नात पहिल्यांदा प्रभाकरच्या घरी आली.त्याचे मोठे  घर ती प्रथमच बघत होती.
क्रमशः
पुढे सीताईच्या आयुष्यात काय घडले वाचत रहा तिची आजी
Previous part link
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!