मराठी कविता-सुवर्णा पाटुकले
मराठी कविता-सुवर्णा पाटुकले

मराठी कविता-सुवर्णा पाटुकले

का निराश होशी आज

का निराश होशी आज, रात्र असे झाली
सूर्य उद्याची पहाट, रंगवील सारी
जाईल हा क्षण मना, ग्रहण हे सुटेल
वठलेल्या वृक्षा तुज, पालवी फुटेल
आस हाच मंत्र खरा,अपयशास मारी
सूर्य उद्याची पहाट रंगवील सारी
उभी यशाची गिरीशिखरे, मान ताठ करूनी
ध्येय तू ही घे, असे नसानसात भरूनी
अंतरात घुमू दे नाद, छेड तू सतारी
सूर्य उद्याची पहाट, रंगविल सारी
का राहसी तू उदास, विसर हे आघात
यातूनच फुलते, जे अंकुरते आत
झटत रहा दिसतील तुज, सुखद दिशा चारी
सूर्य उद्याची पहाट, रंगविल सारी
आकाशच हे मुठीत, घेशील तू सारे
असतील तुज सोबतीस, सूर्य चंद्र तारे
हरू नकोस झुरू नकोस, घे आता भरारी
सूर्य उद्याची पहाट, रंगवील सारी

 

 

तंत्र जगण्याचे

राग सोड अन् भांडू नको हे मंत्र दोनही दिले
जगण्याचे एक तंत्र वेगळे, चिमण्यांनी शिकविले
अशीच एकदा झाडत असता, गवत सांडले दारी
मी वैतागून उचलून आले, टाकून ते माघारी
चिडलेली मी आणिक थोडे त्यांनीही चिडविले
जगण्याचे एक तंत्र वेगळे, चिमण्यांनी शिकविले
पुन्हा पाहिली चिमण्यांची ती चिवचिव झाली सुरू
गवत आणखी काड्या त्या चोचीत लागल्या धरू
सहज लागल्या कामा, त्यांना कुणी असे घडविले
जगण्याचे एक तंत्र वेगळे, चिमण्यांनी शिकविले
विचार आला मनात त्यांचे, कष्टही गेले वाया
अन् थोडीशी कारण झाले, त्रास मी वाढवाया
ना चिडल्या ना रडल्या, त्यांनी दुःख कसे दडविले
जगण्याचे एक तंत्र वेगळे, चिमण्यांनी शिकविले
ना शाळा ना पुस्तक पाटी कुठून शिकले सारे
पदव्या घेऊनही रहातो का, आपण असेच कोरे
प्रेरणा घेऊन त्यातून मी त्या विचारास मढविले
जगण्याचे एक तंत्र वेगळे, चिमण्यांनी शिकविले

 

सुरवंट

ऐक एकदा सुरवंटाने, स्वप्नं पाहिले उडायचे
अणि म्हणाले पंखाविण हे अघटीत कैसे घडायचे ll
इच्छा धरूनी मनात ऐसी
मांडूनी देवापुढती
म्हणे वाटते असे उडावे
पाखरे जशी उडती
रंग लेवूनी पंखावरती, गंधातून त्या बुडायचे
ऐक एकदा सुरवंटाने, स्वप्नं पाहिले उडायचे
देवाने ते जाणून विणला
कोषच त्याच्या भवती
ते इवलेसे रूप पाहण्या
कित्येक जण हे जमती
बाहेर तिथून येण्यासाठी, पंख किती फडफडायचे
ऐक एकदा सुरवंटाने, स्वप्नं पाहिले उडायचे
एक तरुण तो कोष कापूनी
मदत लागला करू
त्यास वाटले लवकर सुटूनी
उडेल फुलपाखरू
तिथेच का ते निपचीत पडले, राहूनी प्रश्न ही पडायचे
ऐक एकदा सुरवंटाने, स्वप्नं पाहिले उडायचे
भावना चुकीची नसे
अवेळी आली होती दया
संघर्ष तोच पंखास देई बळ
निसर्ग शिकवी तया
प्रत्येक क्षणाला झगडत ही, एकेक पायरी चढायचे
ऐक एकदा सुरवंटाने, स्वप्नं पाहिले उडायचे

 

 

वादळ

कधी विचारांचं मोठं वादळ
घोंघावत माझ्या मनात शिरतं
चक्रीवादळाप्रमाणे ते
सारखं माझ्याभोवती फिरतं
सार्‍याच विचारांनी डोकावलं
की पुन्हा नवं कोडं पडतं
काही सुचेनासं झालं म्हणजे
वाटतं, असं का घडतं?
चांगले वाईट विचार येतात
मन त्यांच्या मागे पळतं
त्यातूनच एखादा विचार
वळून वळून मला छळतो
वाटतं………….
विचारांच्या या गोंधळात
आपलं काही चुकणार तर नाही
सुखाचं स्वप्नं पाहणारी कळी
फुलण्याआधीच सुकणार तर नाही
चूक की बरोबर हे ठरविण्यात
कधी सारी रात्र सरते
तरी देखील मी वेडी
त्या विचारांचाच विचार करते…

 

 

आभार

जीवनात किती येती
नव नवीन शिल्पकार
राही ऋणात त्यांचे
मानीत जा आभार
मान अडवतील तुजला
अडविणारांचे आभार
जे तुजला घडवतील
घडविणारांचे आभार
मानीत जा दुःखात
तुडविणारांचे आभार
जे तुजला रडवतील,
रडवणारांचे आभार
राहून जिथे गेला,
त्या गावांचे आभार
घाव जरी घातले मान त्या
त्या घावांचे आभार
जे मोल करू ना शकले
त्या भावांचे आभार
ज्या डावांनी हरविले तुला
त्या डावांचे आभार
तू मान सदा हसताना
हसवणारांचे आभार
फसविले कधी कोणी त्या
फसविणारांचे आभार
मनी आशा अंकुरताना
जगविणारांचे आभार
जगणेच अर्थमय केले
आज त्या सार्‍यांचे आभार.

 

ने मजसी तिथे

.ने मजसी तिथे, रोज जिथे आस जन्मते
नाविन्य नव्या स्वप्नांची, रास जन्मते
नवमूर्ती नवकीर्ती, नव पालवी जिथे
नवरंगी, नवढंगी, नवहास्यही जिथे
नवलाईची जेथे आरास जन्मते
ने मजसी तिथे, रोज जिथे आस जन्मते
जेथे नवीन किरणांनी फेर घातला
धरतीस प्रकाशाचा आहेर हा दिला
देण्यास जी सुखे या जगतास जन्मते
ने मजसी तिथे, रोज जिथे आस जन्मते
गेला तडा मनाला, तरीही लढाच जेथे
निष्पर्ण त्या लताही, येती फुलून जेथे
नवनिर्मितीच जेथे श्वासात जन्मते
ने मजसी तिथे, रोज जिथे आस जन्मते
जेथे जुने पुसूनी, नवआकार कोण देते
जेथे पुन्हा नव्याने, सुविचार कोण देते
नवकल्पनेत जेथे, नवचित्र जन्मते
ने मजसी तिथे, रोज जिथे आस जन्मते

 

कौतुक-मराठी कविता

प्रत्येकाला थोडंतरी
आपलं कौतुक हवं असत
आज ऐकून झालं तरी
उद्याला ते नवं असतं
कौतुक करा घडण्याचं
कौतुक करा चढण्याचं
इवल्या इवल्या पंखांनी
आपल्या आकाशात उडण्याचं
कौतुक करा वीराचं
कौतुक करा धीराचं
कौतुक करा नदी संगे
तिच्या दोन्ही तीराचं
कौतुक म्हणजे नाही केवळ
स्तुती बेगड खोटी
कौतुक म्हणजे हृदयातून
शब्द आलेले ओठी
कौतुक केवळ बक्षीस नाही
पाठीवर मायेची थाप
कौतुक म्हणजे बोट धरून
चालविणारा असतो हात
कौतुक म्हणजे मिळणार
टॉनिक असतं मनाला
कौतुकाच बळ असं
फुलवतं कणाकणाला
कौतुकाची भाषा सोपी
अणि खूप गोड असते
म्हणुन तर त्याची नेहमी
तुम्हा आम्हा ओढ असते.

 

राहिला किनारा किती दूर

खेळ जाहला हा कसा क्रूर
मी आले कोठे
राहिला किनारा किती दूर…
कुणाला न ऐकू आली
आर्त माझी हाक
अंधःकार चोहीकडे
झाला जीवनात
पाहूनिया थकले आला, लोचनात पूर.
राहिला किनारा किती दूर.
ऐलतीर पडला मागे
गेले दूर सारे
पैलतीर गाठू कैसी
दिले मी हकारे
शिडामधे भरले वारे कोठले भेसूर
राहिला किनारा किती दूर.
बुडू लागली ही नौका
खोल खोल पाणी
संकटांनी केली माझी
वल्ही निकामी
भयाण या लाटा झाली स्वप्नं चूर चूर
राहिला किनारा किती दूर.
मी आले कोठे
राहिला किनारा किती दूर

 

 

पहाटसण साजरा-निसर्ग कविता

 

झुळझुळणारा ताल धरुनीया वाहत आला झरा
रान दवाने भिजले झाला पहाटसण साजरा
उठले तरूवर, उठले पक्षी
किलबिल झाली सुरू
सडा अंगणी रांगोळी ही
रंग लागली भरू
रवी किरणांनी फेर घालता, उजळून गेली धरा
रान दवाने भिजले झाला पहाटसण साजरा
हासत उठले सारे जण हे
काम लागले करू
कसे नभाला भिडू पाहते
उडणारे पाखरू
धरणीच्या या कुशीत बीजा, अंकुर फुटला जरा
रान दवाने भिजले झाला पहाटसण साजरा
पाण्यावरती हळूच लागे
तरंग ही थरथरू
सोनेरी घरट्यात लागले
गाणेही अवतरू
हिरव्या पर्णकुटीत फुलांचा, रंगही आला भरा
रान दवाने भिजले झाला, पहाट सण साजरा

 

निसर्ग कविता धुके पांघरुनी निघाली पहाट

 

नाहून गेली प्रकाशात वाट
धुके पांघरुनी निघाली पहाट
येते तिची याद निराश रात्री
उतरते मनातून निजल्याच गात्री
होतीच मजला ती भेटेल खात्री
उघडताच डोळे पडलीच गाठ
धुके पांघरुनी निघाली पहाट

मोती जसे शिंपल्यातील खाणी
पानावरी ही दवांची निशाणी
अन् अंतरी आठवांची कहाणी
उसळून ये सागरी जैसी लाट
धुके पांघरुनी निघाली पहाट

भय ना कशाचे उरले मला ते
उमलत्या कळ्यांशी जुळलेच नाते
फुलण्यास आतुर होऊन गाते
उजळून होतो कसा झगमगाट
धुके पांघरुनी निघाली पहाट

 

अजूनही बाकी

 

अंधार दाटला भोवती सारा
काळोख्या राती
काजवा म्हणे प्रकाश माझा
अजूनही बाकी…..
जरा घेतला घोट नदीचा
क्षणभर थांबून मी
सागरा एवढी तहान माझी
अजूनही बाकी……
सरणावरती मला पाहिले
कितीदा जळताना
तरी जगण्याची नवीन आशा
अजूनही बाकी……
शिखरावरती ऊंच रहाते
कीर्ती अन ख्याती
चढावयाची जिद्द उराशी
अजूनही बाकी…..
जीवनातली खरी झेप ही
अजूनही बाकी……
निश्चया तुझी सत्व परीक्षा
अजूनही बाकी……
आज मिळवली जमीन मूठभर
मी ना समाधानी
पुढे पाहिले आकाश आहे
अजूनही बाकी……

 

 

प्रतिबिंब-मराठी कविता

त्या दिवशी मला
खूप एकटं एकटं वाटलं
भयाण त्या शांततेत…
एका आवाजानं मला गाठलं
मी कावरीबावरी झाले अन्
इकडे तिकडे पाहिलं
माझंच प्रतिबिंब, माझ्यापुढे उभं राहिलं
मी मलाच चिमटा घेतला
हे भास होतायत कसले?
माझ्या अवस्थेकडे पाहून
ते प्रतिबिंब मला हसले
अणि म्हणाले…….
आज देखील तुझ्याबरोबर
तुझा प्रत्येक श्‍वास आहे
म्हणुन तर अजून तुझ्या
जीवनाचा प्रवास आहे,
आशेचा नंदादीप तेवत ठेवीन
असं नेहमी तू म्हणायचीस
समजाऊन धीर देऊन
सर्वांना आपलसं करायचीस
प्रत्येक श्‍वासाच्या कुशीत
जीवनाचं रहस्य लपलंय
ते रहस्य त्या श्‍वासांनी
किती हळुवारपणे जपलंय
आता एकटी म्हणून
मनानं नाही खचायचं
श्‍वासांच्या संगतीत
गोड जीवन गाणं रचायचं.

 

गंध

रणरणत्या उन्हानं
भेगाळली जमीन
त्यावर श्रावण सरी कधी
बरसल्याच  नाहीत
त्यामुळे पावसाची नोंद घेण्याचे
कष्टही कुणाला पडले नाहीत
पण काल तिथेच
मी मातीचा गंध घेतला
होय! मातीचा गंध…..
लोक हसले माझ्या वेडेपणाला
पाऊस झाला नाही
अणि मातीचा गंध?
मी ही माझ्या ओल्या पापण्या पुसल्या
अणि हसत म्हणाले…….
होय खरंच,……….
पाऊस झालाच नाही.

सुवर्णा पाटुकले
सातारा

 

का निराश होशी आज

का निराश होशी आज, रात्र असे झाली
सूर्य उद्याची पहाट, रंगवील सारी
जाईल हा क्षण मना, ग्रहण हे सुटेल
वठलेल्या वृक्षा तुज, पालवी फुटेल
आस हाच मंत्र खरा,अपयशास मारी
सूर्य उद्याची पहाट रंगवील सारी
उभी यशाची गिरीशिखरे, मान ताठ करूनी
ध्येय तू ही घे, असे नसानसात भरूनी
अंतरात घुमू दे नाद, छेड तू सतारी
सूर्य उद्याची पहाट, रंगविल सारी
का राहसी तू उदास, विसर हे आघात
यातूनच फुलते, जे अंकुरते आत
झटत रहा दिसतील तुज, सुखद दिशा चारी
सूर्य उद्याची पहाट, रंगविल सारी
आकाशच हे मुठीत, घेशील तू सारे
असतील तुज सोबतीस, सूर्य चंद्र तारे
हरू नकोस झुरू नकोस, घे आता भरारी
सूर्य उद्याची पहाट, रंगवील सारी

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!