मराठी कविता संग्रह शब्दपर्ण स्पेशल
चांदण्या तुझ्या उशाला
सूनेत्री पापण्यांचे,करून दोन पक्षी
पंखांत साठवावी सारी आभाळनक्षी
बुबुळांच्या जलाशयावर सुखाशृंच्या लाटा
वाहवा सागरकिनारा धुवून जाव्या वाटा
पादाक्रांत व्हावे भरजरी हरित गालिचे
हुंगुन गवत फुलला ,स्पर्श हे मखमलीचे..
कर्ण तृप तृप्त रोज किलबिलती वृक्ष नि वेली.
पहाट ओली ओली दवबिंदूत शहारलेली..
हे सारे गाणे ,तराणे मन उधाण आनंदाने
बिजांकुरण होता खुले धरेचे मातृत्व लेणे..
हे जीवन सुंदर आहे डोळ्यात पाणी कशाला?
बघ हसून खिडकीत चांदण्या तुझ्या उशाला..
ज्योती जाधव
फुलपाखरू
काल उडता उडता एक
फुलपाखरू माझ्याशी बोललं
बोलता बोलता रंगाचं
गुपित त्यानं खोललं
मी विचारले………..
तुझ्याजवळ इतके रंग कुठून आले
गाली हसत हसत त्याने
मला एक उत्तर दिले
माझा एक छंद आहे
फुला फुलांवर उडण्याचा
त्यांच्याशीच गोष्टी करत
रंगांमधे गढण्याचा
तसं झालं की येतो रंग
थोडा माझ्याही पंखांना
रंगबिरंगी पंख पाहून
उधाण येतं शंकांना
तुला सांगतो………
तू ही घे, फुलांकडून थोडा रंग
पहा त्यांच हसरं रूप
सुवासात होऊन दंग
मग तुलाही विचारेल कोणी
तुझ्या रंगांचं गुपित
माझ्यासारखं तू ही सांग
ठेऊ नकोस कुपीत
बघ तू ही एकदा तुझ्या
मनातलं गाणं गाऊन
जग क्षण अन् क्षण
आनंदाच्या रंगांमध्ये नाहून.
सुवर्णा पाटुकले
प्रेमाचा गुलमोहर-प्रेम कविता
आयुष्याच्या वळणावर चालताना
कुठे भेट आपली व्हावी
साखरझोपेत स्वप्न पहाताना
कशी चटकन जाग यावी
खंत तिला न भेटल्याची
डोळे मिटून पुन्हा एकदा
अर्धवट स्वप्न पूर्ण करण्याची
प्रेमात ठेचाळलो कैकदा
इच्छा तिच्या सहवासाची
अपेक्षा निखळ प्रेमाची
भिती वाटते स्वप्न भंगाची
आठवण तर राधाकृष्णाची
रखरखत्या उन्हात भाजताना
पलाश कसा फुलत होता
प्रेमाच्या गुलमोहरात भिजताना
जीवनात सुगंध दरवळत होता
शिवसांब कल्याणकस्तुरे
मोरपीस
कुठे गेले असेल ते,
बालपणी पुस्तकात ठेवलेले मोरपीस..
पुन्हा भेटला असेल का?
त्याला माधवाचा शिरपेच
कि भटकत असेल
रानोमाळ वावटळी सारखे..
पुस्तकात ठेवलेले गुलाबाचे काटे
आता बोथट झाले असतील
तुझ्या आठवणी सारखे व
माझ्या भावना सारखे…
तु केसात माळलेला गजऱ्याचा सुगंध,
अजूनही दरवळतो अंगभर
पुन्हा मला घेऊन जातो,
तुझ्या जवळ अगदी जवळ
ह्दयातील स्पंदना सारखं..
चिमणी च्या दाताने तोडून दिलेल्या,
गोळी ची चव अजूनही रेंगाळते ,
जिभेवर..
अजूनही चुकते वाट,
तुझ्या घराजवळ…..
शारदा
.बघ अक्षरे उमटली
काल माझ्या लेखणीने
मूक आक्रोश तो केला
शाई च्या आसवातूनी
बघ अक्षरे उमटली….
तोलताना मी सुखाला
संपले होते जरी
लोपल्या हास्यातूनी
बघ अक्षरे उमटली….
तू खोलताना गुपित
का मी भाळले अशी
गुंतल्या श्वासातूनी
बघ अक्षरे उमटली….
त्या तोडताना शृंखला
लोचनी धारा किती
सोसल्या घावातूनी
बघ अक्षरे उमटली….
आज या वाटेवरी
मी एकटी आहे जरी
मजसवे येण्यास ही
बघ अक्षरे उमटली….
संपता आयुष्य मागे
नाव हे उरते म्हणे
त्या द्यावया अमरत्व ही
बघ अक्षरे उमटली…..
तुझ्याचसाठी
स्नेहभाव डोळे न लपविती
प्रतिवंचनातून फुलते प्रीती
मृदुभावांचे माणिक मोती
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
शब्दाविण कां हृदय न कळते
माझेही मन बघ तळमळते
तव नामाची साखर ओठी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
देवघेव शब्दांची झाली
कणाकणांना वाचा फुटली
शतजन्मीच्या बांधल्या गाठी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
आहे मी रे तुझीच दासी
नयनी माझ्या तूच राहसी
करकमलांची सोज्वळ मिठी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
प्रेम रसाची ओढ जिवाला
समजावू रे कशी मनाला
धावत येते सत्वर भेटी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
कविता
.कविता सुचते
समाधानी असलेल्या मनात
किंवा भरलेल्या पोटावर
ज्यांचे जगण्याचे प्रश्न असतात गहन
ज्यांच्या रोजच्या भाकरीचाच प्रश्न असतो मोठा
ज्यांना कवितेपेक्षाही
जटील प्रश्न असतात
आयुष्याचे
त्यांची कविता आपसुक
जाते दुय्यम स्थानावर
असतो जो अति संवेदनशील
शब्दांवरच जो जगु शकतो
तो लिहित जातो उपाशी पोटीच
अतिशय अस्वस्थ मनाने,
मग
कविता त्याची होते
जहाल
कोणाही वाचणाऱ्याला करते
अनुत्तरित
डोक्यात अनेक प्रश्नांचे
मोहोळ उठवित
वाचणाऱ्याला करते अंतर्मुख
कविता,
अथांग शब्द सागरातला एक मोती
जो असतो नशीबवान त्यालाच होतो प्राप्त
कविता करता येणं
कविता वाचता येणं
ही जरी असली अनोखी
बुद्धिसंपदा
तरी न येऊ दयावी काव्यात कधी संतृप्तता
नसते ती जीवनातीलही
परिपूर्णता
जीवन संघर्षात कधी
हात सोडेल कविता
कधी शोधावं लागेल
शब्दांना,
असतो सर्वस्वी अनभिज्ञ आपण
मात्र
सरस्वतीचं देणं हे लाभावं
आजीवन
शब्दांनी दयावी सोबत
आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर
ही आस
आहे मनापासुनची
सौ वीणा विश्वास चव्हाण
चंद्र लाजला
पाहते प्रतिबिंब
संथ जलात
दंग होऊनि
चंद्रासवे पाण्यात।।1।।
लेऊनिया पातळ
जरतारीचे
लक्ष वेधती
रुपवती साऱ्यांचे।।2।।
घेउनिया कळशी
आली सुंदरी
विसरूनिया
भाळली चंद्रावरी।।3।।
मनीचे गुज तिच्या
नयनी दिसे
खळी गालात
पाडीत मनी हसे।।4।।
पाहुनी लावन्येस
आज चंद्रहा
जणू लाजला
सांजवेळी तो पहा।।5।।
✍️सौ.पद्मजा जोशी
पुसद
हातावरील रेषा
नको धन दौलत
दोन शब्दांची आस
चार चौघां सारखा
नको म्हणूस खास… १
सामान्य माणसांचे
अतिसामान्य स्वप्ने
माझे म्हणून कुणी
भावनांना जपणे… २
न मागणी कशाची
न हवा सहवास
राहो -हुदयी थोडा
मनात अधिवास… ३
बांधिले न वचने
चांदणे तोडणार
स्वयंवर समयी
धनुष्य तोलणार… ४
त्याग असतो श्रेष्ठ
नसते अभिलाषा
पाहून ओढतो मी
हाता वरील रेषा… ५
रघू देशपांडे
नांदेड
चंद्र सूर्य
दिनकर भास्कर मित्र रवी तू
चराचाराचा प्राणसखा तू
रोज प्रकटसी नभो प्रांगणी
तरी भाससी नित्य नूतन ही
पसरती किरणे दशदिशांनी
तेजोमय ही झाली अवनी
प्रमाद सारा जळुनी जाई
अवतरता तू या भूमी
हीन थोर दिन असो कुणीही
प्रकाश देशी सर्वांनाही
कर्मयोगी अन महारथी तू
तेजःपुंज असा जगत सखा तू
दातृत्व तुझे जगा वेगळे
देत राहणे तुला ठावे रे
बंधू तुझा ही तुझ्या सारखा
तव अस्ता नंतर प्रकटी नभांगणा
शीतलता मनमोहक जयाची
वेड लावीतसे कवी हृदयाला
चंद्र आकाशी सुधांशु म्हणती जयाला
भरती ओहोटी देई दर्याला
कलेकले ने रोज वाढतो
पुनवेला मग प्रगट होतो
चंद्र सूर्य ही भगवंताची विभूती
जगत कल्याणा अवतरलेआकाशी
सौ रक्षा(अंजली ) पत्राळे
प्रतिबिंब
निळसर स्थिर जल
शांतता सर्व शिवारी,
सुंदर नव तरूणी
बैसली बघ किनारी…!
साडी पिवळी काठाची
पदरी सुरेख नक्षी
पायी पैंजण शोभती
करा धरी वाम कुक्षी…!
केसात माळली वेणी
हातात हिरवा चूडा
पदर लोंबता खाली
जलास स्पर्शते कडा…!
बघता ती प्रतिबिंब
नेत्र दोन्ही स्थिरावले
चंद्राचे आणि तिचे गं
रुप समान भासले….!
मनु अतुल
नाशिक
सुक्ष्मरुप-कृष्णकविता
खेळे बालपणी
राधाकृष्ण संगे
रासलीला रंगे
गोपीसवे!
निरंतर राही
ध्यानीमनी हरी
असा मुरारी
बाळकृष्ण!
निर्मळ भाव
एकमेकांसाठी
माने जगजेठी
ह्रदयात!
भक्तीत लीन
राहे सदोदित
कृष्णाशी अद्वैत
पावलीसी!
जिथे कृष्णनाम
तिथे राधाजाण
दोघे एकप्राण
जाहलेत!
शुद्ध आत्माराधा
कृष्ण होयकाया
न जाय विलया
सूक्ष्म रुप!
मनु अतुल
शकुनी
हळूहळू बोलणे
कानी कुजबुजने
शेती बुजगावणे
करी भास सारा… ||१||
अहंकार जोपतो
मनी द्वेष पोसतो
उच निच राखतो
भेदभाव सारा…||२||
तुझे माझे वागणे
लागे असे बोलणे
रडी डाव साधणे
करी त्रास सारा…||३||
मारे कोपरखळी
तोडी घरे वेगळी
आढी दिसे कपाळी
डावपेच सारा …||४||
असे राजकारणी
दोन अर्थी बोलणी
सदा करे करणी
बुध्दी भेद सारा… ||५||
गोलमोल बोलतो
खाली हात चोळतो
अन्ने विष घोळतो
कलीयुग धारा… ||६||
रघू देशपांडे
नांदेड
माझे घर
चाराक्षरी…
माझे घर
तिथे दूर
ते सुंदर
क्षितिजाशी…
अंगणात..
सांजवात..
रोज लावी..
मायबाई…
कौले लाल
हा महाल..
दारी वेल..
गंधाळली…
माझे घर
रे माहेर..
सावलीही…
चोहीकडे…
वृंदावनी..
दाटेमनी…
मंजिऱ्या या
हऱ्याभऱ्या…
ज्योती जाधव
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा