शांता शेळके-साद पावसाची आली-रसग्रहण
आभाळाने भूईला आनंदी करण्यासाठी पाठवलेला पाऊस आणि त्याने चिंब होणारी भूई ही दरवर्षीच घडणारी गोष्ट पण प्रत्येक वेळी नवी अनूभुती देणारी.
मागच्या वर्षीच मी पाऊस बघितला आता नाही बघणार असे कोणीही म्हणत नाही. प्रत्येक वेळी नवे रुपडे घेऊन येणारा पावसाची जादू आहे ती.
निसर्गात नेहमी घडणाऱ्या गोष्टींची अपूर्वाई कधी संपत नाही.सामान्य जीवांना जिथे पावसाची नवलाई वाटते तिथे सगळीकडे सौंदर्य शोधणारे,त्या सौंदर्याला भावनांचे कंगोरे देणाऱ्या कवीमनाला पावसाने भूरळ न घातली तरच नवल.
भुई आणि आभाळ यांची प्रीती…कल्पनाच किती प्रणयरम्य आहे.
आभाळावर भूई कधी प्रीत करेल?त्यांच्यातील प्रेम कधी फुलणार?
आभाळ पावसाच्या प्रतिक्षेत भेगाळलेल्या भूईवर पाऊसधारांचा अभिषेक करेल तेव्हा,तिला पावसाने न्हाऊ घातले तरच ती आभाळावर प्रेमाचा वर्षाव करते.फुलते,बहरते,मोहरते,गंधाळे ते,तिच्या मृदगंधाने सगळ्यांना आभाळ बरसणार याची चाहूल देते.भूईवर असलेली एकेक गोष्ट पाऊस पाडणाऱ्या आभाळावर प्रसन्न होते. अवघ्या चराचरात चैतन्यमयी वारा वाहू लागतो.
प्रतिभावंत कवयित्री शांता शेळके यांनी शब्दसुमनांमध्ये गुंफलेली भूई आणि आभाळाची ही प्रेमकविता
साद पावसाची आली, शहारली माती ||
भुई सवे आभाळाची, जुळे आज प्रीती || ध्रु ||
उठावले घन घन घोर, नील कंठ झाले मोर ||
पिसार्यात लाखो डोळे, गगन न्याहाळीती || १ ||
निळामधे हीरक जडती, तसे शुभ्र बगळे उडती ||
कोसळती धारा धारा, दिशा धुंद होती || २ ||
चिंब चिंब जांभुळ रानी, मेघ मंद्र घुमती गाणी ||
मुके भाव हृदया मधले, शब्द रूप होती || ३ ||
तृप्त शांत झाली धरणी, मधुस्म्रिते हिरव्या कुरणी ||
पुसट चुंबना सम ओल्या सरी येती जाती || ४ ||
पाऊस… सरळ येत नाही. तो भूईला साद घालत येतो.
त्याची साद कानी पडली कि त्याची वाट बघून कोरड्या झालेल्या भूईचे अंग अंग शहारते. पावसाने चिंब होऊन ती आता सुगंधीत होणार असते.ही कल्पनाच तिला मोहरुन टाकते.पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली भूई बरसणाऱ्या आभाळाच्या प्रेमात पडते.
काळे काळे मेघ आभाळी जमा झाले कि नीळकंठ मोर पिसारा फुलवत नृत्य करायला सज्ज होतो.त्याच्या पिसाऱ्यात असलेले लाखो डोळे पावसाची वाट बघतात. पांढरेशुभ्र बगळे हर्षाने आभाळी उडायला लागतात.
आभाळातून टपोरे थेंब भूईवर कोसळू लागतात.त्या थेंबांच्या स्पर्शाने भूईची दिशा आणि दिशा रोमांचित होते.
चिंब झालेल्या रानीवनी पावसाच्या मनोहर रुपामुळे आल्हाददायक प्रसन्नता वाहायला लागते.ह्दयातील मुक्या,हळूवार भावनांना शब्दरुप मिळून त्याची गाणी बनू लागतात.
भूईला चुंबन देण्यासाठी आभाळ पावसाच्या सरींना पाठवून तिला हिरव्या रंगात रंगवतो.
आभाळातीत पावसाने भिजलेली भूई तृप्त होते.आभाळासोबतच्या मिलनाची तिची आस पूर्णत्वास जाते.
आभाळ आणि भूईच्या मिलनाने मुक्त प्रेमाचा उत्सव सुरु होतो.
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा









सुंदर …
सुरेख लिहिलेस ग ….
Chan
खूपच सुंदर 👌
प्रत्येकच रसग्रहण खूप छान लिहिते तू.
छान वाटते ,तू आमची मैत्रीण आहे.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
Chan lihile