असते का रे मी?- मराठी कविता
Marathi poetry-संध्याकाळ
त्या सांज सावल्या सरल्यावरही
असते का रे मी?
त्या स्वप्नं भारल्या नेत्रातून
कधी वसते का रे मी?
गंध पसरता हवेतूनी
दरवळते का रे मी?
सांग चंद्र साक्षीला नभातून
छळते का रे मी?
पाहता आकाशी चांदण्यात
लुकलुकते का रे मी?
बाव-या मनातून वावरता?
कधी चुकते का रे मी?
मंद तेवत्या दीपातून
फरफरते का रे मी?
ओठांवरल्या गीतातून
थरथरते का रे मी?
कधी एकांती असताना
तुज स्मरते का रे मी?
अलगद वारे श्वासातून या
भरते का रे मी?
शांत रात्रीला कानातून
कुजबुजते का रे मी?
आठवणींच्या पानातून
गजबजते का रे मी?
नकळत मिटल्या पापण्यातही
हसते का रे मी?
पुन्हा पहाटे तुला संगती
दिसते का रे मी?
एक ओसाड मन
संध्याकाळ झाली
पाखरांचे थवे च्या थवे
घरट्याकडे परतू लागले
त्यांची ती ओढ पाहून
त्या पक्षिणीचे डोळे पाणावले
असेच त्या दिवशीही……
पाखराची वाट पाहून पाहून
तिचे डोळे थकले अन्
हुंदका आवरताना नकळत
काही थेंब, पिलाच्या कोवळ्या
लुसलुशीत अंगावर टपकले,
पिल्लू बिचकलं, तिला बिलगलं
पुन्हा निजलं,
त्या थेंबांचा अर्थ त्यातील वेदना
त्याला कोठून कळणार?
तिचा आक्रोश, तिची तळमळ
त्या वेदनेची अव्यक्त सल
पाखराला तरी कुठं कळली होती?
दिवस, महिने, वर्ष संपली……
त्या पक्षिणीचं नेहमीचं
वाट पहाणही संपलं
उरलं फक्त……
ऐन तारुण्यात, चेहर्यावर आलेलं गांभीर्य….
आटलेल्या नजरेपुढं एक शून्य….
एक विस्कटलेलं घरटं……..
एक अधूरं स्वप्नं…..
एक ओसाड मन…..
आणि एकटेपण…
सुवर्णा पाटुकले
सातारा.
संध्या बावरी
गगनराज तो मवाळ झाला
क्षितिजा रेखी उभा लोपण्या
संध्या बावरी आसावली
प्रीती-शब्द देण्याघेण्या
अनुदिनी राही प्रीत अधुरी
हिरमुसते, परि ती ना रुसते
क्षण भेटीचा जवळी येता
संध्या केशरी शृंगारिते
पळ मोजकेच सहवासाचे
येती रोज वाटेस तिचिया
क्षणेक हरखते अन् विमुखते
काजळते…निरोपिते सखया
उगाच का ही कातरवेळा
भासते भावुक, भारवाही
अतृप्ततेची सल संध्येच्या
कोमल हृदयी सलत असावी
मेघना
अशीच एक संध्याकाळ
अशीच एक संध्याकाळ
गहिवरलेली,पाणावलेली,हिरमुसलेली
स्वप्नांचा चोळामोळा झालेली
अशीच एक संध्याकाळ
आसुसलेली,नटलेली
श्रुंगारलेली,बहरलेली
मिलनाला आतुरलेली
अशीच एक संध्याकाळ
वाट चुकलेली,पत्ता विसरलेली
न भेटताच परतलेली
विरह गीत गाणारी
अशीच एक संध्याकाळ
कुंदलेली,ढगाळलेली
तरसणारी,बरसणारी
जीवाचे पाणी पाणी करणारी
अशीच एक संध्याकाळ
दुपारीच संपलेली,धाय मोकलून रडणारी
अनंतात विलीन होणारी
पुन्हा कधीच न सांजवणारी
शारदा….
संध्याकाळ
डुबे नारायण
होई संध्याकाळ
गाई घेऊनिया
चालले गोपाळ,,,,
वाट चालताना
धेनु हंबरती
वासरा पिल्लांना
प्रेमाने चाटती,,,,
दिवे लागणीस
होता तिन्ही सांज
नमन भक्तीने
करुनिया रोज,,,,
संध्याकाळी होई
लक्ष्मी आगमन
प्रार्थनेने होई
सात्विक हे मन,,,,
होई ईश कृपा
गुरू देवतांची
हरिपाठासवे
सेवा विठ्ठलाची,,,,
निर्मोही मनास
मिळेल दिलासा
शुभं करोतीचा
चालवुनी वसा,,,,
सौ. पद्मजा जोशी
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा