Jaane kya tune kahi-जाने क्या तूने-प्यासा review in marathi
जाने क्या तूने….प्यासा

गुरुदत्त- फार थोड्या काळासाठी चित्रपटसृष्टीला लाभलेला परीस.परिसस्पर्शातून १९५७ साली निर्माण झालेली नितांतसुंदर कलाकृती ‘प्यासा’. (तहानलेला)
सिनेमाचा नायक विजय, त्याची प्रेयसी मिना- तिचा दुसऱ्याशी विवाह होतो.
गुलाबो विजयवर,त्याच्या लिखाणावर भरभरुन प्रेम करणारी वेश्या.
प्यासा सिनेमाचे लेखक अब्रार आल्वीच्या आयुष्यात घडलेली ही व्यथित करणारी कथा.
त्यांच्या आयुष्यात आलेली ‘गुलाबो’ आणि अब्रार यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. लेखकाची स्वअनुभूती असल्यामुळे चित्रपटाला जिवंतपणा येणे स्वाभाविक होते.
प्यासामधील जाने क्या तूने गीता दत्तच्या आवाजातील हे गाणे.
गुलाबोला पेपरच्या रद्दीत विजयचे लिखाण सापडते. त्याचे लिखाण तिला भुरळ घालते.ती त्याने लिहिलेल्या तरल काव्याच्या प्रेमात पडते.
दुःखी विजय एकटाच अंधारात बसून असतो.निरव शांततेचा भंग करीत त्याच्यापर्यंत त्याच्याच ओळी पोहचतात
फिर ना किजिए मेरे गुस्ताख नजरोका गिला
देखिए आपने फिर प्यारसे देखा मुझको
विजयचे लक्ष तिच्याकडे जाते. ती पाठमोरी असते.माझे काव्य तिच्याजवळ कसे….तो अचंबित होतो.आणि म्हणतो
,सुनिए…
ज्याच्या काव्यावर ती लुब्ध झाली तो कवी हाच आहे हे तिला माहित नाही.ती मान वळवून त्याच्याकडे बघते
जी मैने कहाँ
आणि पडद्यावर सुरु होतो शब्द, भावना,आणि अभिनयाचा अविष्कार.
शब्द पेरीत शब्दमाळ बनवणाऱ्या जादूगर साहीरचे शब्द कानावाटे थेट ह्दयात उतरतात.
…जाने क्या तूने कही..
कुमार अवस्थेतून नुकताच यौवनात प्रवेश झालेला.आपल्यावरही कोणी प्रेम करावे असे वाटणारे वय. एकमेकांवर प्रीत उधळणारे दोन जीव भेटतात.
ह्दयाची तार वाजते. काळजातील धडधड वाढते.
दिवसरात्र बस् त्याचे आणि त्याचेच स्वप्न मनी रुंजी घालते.स्वप्न सत्यात उतरते अन् प्रेमाचा प्रवास सुरु होतो.
डोळे लाजेने खालच्या दिशेने वळतात. चाल हळूवार होते.
पावले त्याच्याजवळ येऊन अडखळतात.
त्याच्या प्रेमात आकंठ डुंबल्यावर तिचा जणू दुसरा जन्म होतो. केसांची लट तिच्या खांद्यावर रुळणारी केसांची लट आणि तिचा सुगंध प्रेमाचे गुपित बाहेर पडायला पुरेसा असतो.
जाने क्या तूने कही
जाने क्या मैने सुनी
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
सनसनाहट सी हुई
थरथराहट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
नैन झुक झुक के उठे
पाँव रुक रुक के उठे
आ गयी जान नई
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
ज़ुल्फ़ शाने पे मुड़े
एक खुशबू सी उड़े
खुल गये राज़ कई
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …

पडद्यामागे गाणारी गीतादत्त आणि पडद्यावर गाणारी वहीदा दोघीही जबरदस्त.
जाने क्या…
काय अवखळ ,मधाळ आवाज दिलाय गीता दत्तने.
आणि गाण्याच्या शब्दानुरुप विभ्रम करणारी साधी पण लावण्यवती दिसणारी वहीदा…तिच्या चेहऱ्यावरचा एकेक भाव दिलखेच आहे.
तिचे मोहक रुप, खुल गये राज कही….म्हणतांना तिचे भूवई उडवणे,तिची मान हलवण्याची अदा …सगळेच आकर्षित करणारे.
साहिरच्या दमदार लेखणीतून उतरलेल्या मधाळ गीताला सचिनदा बर्मन यांचे तेवढेच मधूर संगीत आहे.
Black and White सिनेमात भावनांचे कित्येक रंग असायचे.माणूस यंत्र न बनलेल्या काळातील सिनेमेही आताही जिवंत वाटतात. मनाला स्पर्शून जाण्याची ताकद एवढ्या वर्षानंतरही जुन्या गीतांमध्ये आहे…….
प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..








खूप सुरेख रसग्रहण.
सुंदर रसग्रहण.. वाचतांना अलगद तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला.
Wahh khupch chan