आजि सोनियाचा दिनु
आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु

 

जाणिवेचे अभ्यंतर खुलले की पलीकडे काळजाच्या ऋजुतेचा गाव असतो, मांगल्याचा भाव असतो, पंढरीचा ठाव असतो. अंतरंगातील निरामय जाणीव ज्या क्षणी निराकार होईल, विश्वाकार होईल तो क्षण मुक्तिचा क्षण असेल. तो मनोभाव देहात उतरावा, काळजात पाझरावा, ती निळीसावळी धारा तृप्ततेचे दान देत मला वैकुंठाचा मार्गावर येणारी असावी असे सातत्याने वाटत होते.

त्याकरिताच विठ्ठलाची निशिदिन आळवणी करत होतो, आराधना करत होतो आणि त्या तपाला कैवल्य लगडले.
तो फलश्रुतीचा क्षण आला. तो सोनियाचा दिन आला! ”

वैष्णव हा खरा मुमुक्षु असतो. तो विठ्ठलाशिवाय इतरत्र गुरफटत नाही. एकदा विठुरायाच्या चरणी आपली भक्ती समर्पित केल्यानंतर त्याला कोणतीही कठोर साधना, कोणतीही व्रतवैकल्ये करण्याची आवश्यकता नसते. केवळ नामस्मरणाच्या अखंड प्रवाहात स्वतःला झोकून दिले की तो आपला विठुराया नक्कीच वैकुंठाच्या द्वारापर्यंत आपल्याला घेऊन जातो हे त्याला उमगलेले असते. अशी ही वैष्णवाची नेणिवेच्या पातळीवर पोहोचलेली ती अवस्था म्हणजे मी आज निरपणासाठी घेतलेला अभंग “आजि सोनियाचा दिनु.”

आजि सोनियाचा दिनु
आज माझी पंढरी गजबजलेली, गलबललेली. आज मन आषाढवारी झालेले. ‘पुंडलिक वरदा..’ च्या जयघोषाने दुमदुमलेले. माय चंद्रभागेचा काठ वैष्णवांच्या मांदियाळीने फुलून आलेला. वाळवंटात रिंगण रंगलेले. भगवा पताका फडकत आहेत. माऊलींच्या डोईवरच्या तुळशी उत्सुकतेने वैष्णवांचा मेळा निरखत आहेत. मार्गावरील दुतर्फा दुकाने सजली आहेत, ओसंडून वाहत आहेत. गुलाल, अबीराला वैष्णव भेटीचा अधीर रंग चढला आहे. तुळशीच्या माळा खुणावताहेत. चहूकडे केवळ उत्सव आणि उत्सव!!

आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे.

दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो. पावले हळूहळू मंदिराच्या दिशेने पडायला लागली. ते पावलांचे चालणे केवळ यंत्रवत होते. मी तर कधीचाच मनाने तिथे पोहोचलो होतो. रांग पुढे सरकत होती. जयघोष उमटत होता. काय ते भारलेले वातावरण! तो सोहळा खरंच अगदी अद्भुत! दर्शनाची प्रतीक्षाच इतकी मनोहारी तर ते प्रत्यक्ष रूप किती विलोभनीय असेलआणि पावले हळुवार पडता पडता यथावकाश गर्भगृहात पोहोचलो. आणि ज्या निदीध्यास मनाने अट्टाहास केला होता तो क्षण सार्थक झाला. जीव शिवाशी पोहोचला. ज्याचे त्यात मिसळले. अंतर्बाह्य एक झाले.

आजचा दिवस खरा सोन्याचा दिवस! मेघातून अमृताचा वर्षाव होण्याचा दिवस! केवळ माझ्या विठ्ठलाचे रूप पाहिले आणि मनात दिवाळसण फुलला.

सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी
दृढविटेवनमुळी, विराजीत वनमाळी

तो विटेवर उभा असलेला माझा देव डोळे मिटून आणि मंदस्मित करत वाटच बघत होता. त्याने कटेवर ठेवलेले दोन्ही हात शेला लपेटून घेतलेले, त्याने घातलेली बाराबंदी, नेसलेले पिवळे पितांबर, भाळी लावलेला गोपीचंदनाचा टिळा, डोक्यावरचा तो लखलखता मुकुट, कानातील ती मत्स्याकार कुंडले, त्याची ती सजलेली महिरप, सुमनांचा घमघमाट. काय वर्णावा तो थाट!

ते निळे सावळे रूप मनात साठवले. डोळे भरून पाहिले. गुळगुळीत झालेल्या त्याच्या पावलांवर हलकेच हात फिरवला आणि साश्रूनयनांनी डोके टेकवले. आजवरचा प्रवास फलद्रूप झाला होता. सार्थकी लागला होता. आयुष्याचे सोने झाले होते. त्या दोन चार क्षणांमध्ये कित्ती कित्ती बोललो त्याच्याशी आणि तो माझ्यापाशी! ह्या अंतरीचे त्या अंतरी पोहोचले. खरेतर तिथून पाऊल निघेना. परंतु नाईलाजाने पुढे सरकलो.

मनात विचार यायला लागला की मी आजवर अनुभवलेला विठ्ठल केवळ एवढाच होता का? त्याचे रूप केवळ एका मूर्तीत सामावले होते का? तो केवळ एक दगडाचा देव होता का?.. तर नाही. निश्चितच नाही. तो यापेक्षा खचितच खूप खूप वेगळा होता. पंढरी तर केवळ एक निमित्त होते. केवळ त्याच्या अस्तित्वाचा एक पैलू होता. तो पैलू आज अनुभवला; हे ठीकच.

परंतु मी त्याला कित्येक जागी, कित्येक क्षणी अनुभवले आहे, त्याच्याशी संवाद साधला आहे, बोललो आहे, रागावलो आहे, त्याच्यासोबत वादविवाद घातला आहे. तो मला जागोजागी शब्दातून भेटला, ओव्यांतून भेटला अभंगांमधून भेटला, नामस्मरणातून भेटला, जयघोषतून प्रकटला. कित्तेक रूपे होती त्याची! आजवर अनुभवलेली!

मी त्याला कवितेत रेखाटले आहे. त्याला रानफुलांसमवेत बसलेले पाहिले आहे. मी शिवारात त्याला डोलताना पाहिले आहे. पिकांची राखण करताना पाहिले आहे. पाखरांना घास देताना जवळून पाहिले. त्याला माणसांमध्ये पाहिले आहे. माणसांमधील माणुसकीत पाहिले आहे. ही पंढरी तर केवळ एक प्रतिरूप आहे. येथे येणे हे नक्कीच सोनियाच्या दिवसाचे देणे आहे परंतु असे दिवस अगोदर देखील अनुभवले आहेत. हा प्रत्यंतर वारंवार अनुभवला आहे.

बरवा सन्तसमागमु, प्रगटला आत्मारामु
कृपासिंधू करुणाकरू, बाप्रखुमादेवीवरु.

मी पारावर कीर्तन करायला बसलो की सर्वात अगोदर तो येऊन बसायचा. कधी टाळ, कधी वीणा, तर कधी मृदंग घेऊन बसायचा. तोच अभंगाची पाठराखण करायचा. तोच गळ्यातून देखील उमटायचा. तो गजबजाटात भेटायचा, तसाच एकांतात देखील भेटायचा. तो आईने दिलेली हाक होता. तोच इवल्याशा लेकरांचे बडबडणे होता. तोच नदीच्या खळाळात होता.

बारवेच्या थंडगार पाण्यात होता. तो कुठे नव्हता?
पण हे पंढरीतील रूप पाहायचे होते ते देखील आज बघून झाले. जीवाची सार्थक झाले. त्याला चहूबाजूंनी अनुभवले. दिवस सार्थकी लागला. दिवस सुवर्णमय झाला.
मंदिरातून बाहेर आलेली पावले हळूहळू रखुमाईच्या मंदिराकडे वळली. आईच्या भेटीशिवाय लेकराची आस कशी पूर्ण होणार? ती माऊली देखील मला भेटायला तितकीच उत्सुक असेल. तिने माझ्यासाठी काही तरी राखून ठेवले असेल. काहीतरी रांधून ठेवले असेल. कितीही वेळ झाला तरी आई आहे ती! तिला माहित आहे लेकरू येणार आहे. ती नक्कीच माझ्यासाठी जेवायची थांबली असेल!
संतोष जगताप.

रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
error: Content is protected !!