सुमी तिच्या पूर्वस्मृतीत गढून गेली .तिला आठवले,
मी नोकरीत इथे रुजू झाली तेव्हा माझे वय जवळपास पंचवीस वर्षे व बाळाचे दीड वर्ष होते. नोकरीला एक महिना झाला.पहिला पगार झाला. एवढी मोठी रक्कम मी प्रथमच बघत होते आणि माझा नवराही.तो म्हणाला,
मी तुला नोकरी लावून दिली. मीच तुला शिकवले. जर तुला मी बी.एड करु दिले नसते तर तुला ही नोकरी कधी मिळाली नसती. हा पगार माझा आहे .
झाले.. तेंव्हापासून दरमहाचा पगार तोच घेत असे .मला गरज पडेल तेव्हा मागितल्यानंतर तो पैसे देत असे. आता त्याला त्याचे नातेवाईक, भाऊ इत्यादी आठवायला लागले.. तो तीन-चार महिन्यात झालेल्या सर्व पगाराचे पैसे घेऊन गावी जायचा. तिकडे पंधरा दिवस ते एक महिना राहून मग परत माझ्याकडे यायचा. तो गावी आपल्या भावांना कोणाला घर बांधण्यासाठी, कोणाला व्यवसाय करण्यासाठी, कोणाला शेतीसाठी , भावाच्या मुलांना शिक्षणासाठी, कपड्यसाठी व इतर विविध करण्यासाठी पैसे पुरवीत असे.
कोणाला किती मदत करायची हे सासूबाई च्या सल्ल्याने तो ठरवित असे. पण त्याची वाच्यता माझ्यासमोर कधीच करीत नसे. तो कुठे जातो, कुठे राहतो हे पण कधी मला सांगत नसे. विचारले तर
तुला काय करायचे आहे? तु आपले काम कर, नोकरी कर .
अशी दमदाटी करीत असे. हे असे नियमितपणे सुरू होते. मी फक्त वर्षातून दोन वेळा माझ्या माहेरी व सासरी जात असे. दिवाळीच्या सुट्टीत व उन्हाळ्याच्या विद्यार्थिनीच्या परीक्षा संपल्यानंतर. तेव्हा तो सासरच्यांना सांगून ठेवत असे की, त्यांनी मला काही सांगू नये. म्हणून जावा पण जपूनच बोलत असत. पण त्यांच्या लहान मुली मला सांगत,
काका आले की एक दोनच दिवस राहतात. त्यांना गावी राहणे आवडत नाही.
मग मला प्रश्न पडे की, माझा नवरा मग एक एक महिना कुठे राहतो पण विचारायची हिम्मत होत नव्हती.
दरम्यान माझ्या कार्यालयात एक अपंंग तरुण “पहारेकरी” या पदावर रुजू होण्यासाठी आला. तो कार्यालयात आला त्यावेळी हातातील नियुक्ती आदेश माझ्याकडे देत म्हणाला,
” मी तुमच्या कडे नोकरीवर रुजू होण्यासाठी आलो जी.. मी आणि ही माझी बायको. अतीदुर्गम जंगली भागात लहानशा गावी राहतो. तिथे आम्ही भीक मागून खात होतो जी.. आता आमच्याकडे पैसे किंवा कपडे काहीच नाहीत आता तुम्हीच आमचे मायबाप मदत करा जी..”
मी त्याच्याकडे बघितले .दोघेही उणेपुरे साडेतीन ते चार फूट उंचीचे , नाकी डोळी नीटस. अंगावर मळकट जीर्ण झालेले कपडे.पण त्याचा आवाज भारदस्त होता. त्याच्या अंगावर फुल शर्ट व हापपॅन्ट तर बायको नऊवारी मध्ये .त्याच्या हापपेंटमधून त्याचे दोन्ही बाहेरच्या बाजूने वाकलेले पाय दिसत होते.
मी विचारले,
जेवले का? तो म्हणाला
नाही… पण खूप भूक लागली जी..
मी माझ्या घरी त्यांना जेवावयास पाठविले. जेवण झाल्यानंतर त्याचा रूजू अर्ज लिहून दिला व रुजू करून घेतले. त्याला काही पैसे दिले व दुसऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या सोबत पाठवून भाड्याने खोली करण्यास सांगितले. तसेच कपडे ,अन्नधान्य इत्यादी आवश्यक साहित्य घेऊन देण्यास सांगितले व सायंकाळी आपल्या कामावर हजर होण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने राहण्याची व जेवणाची सोय होताच सायंकाळी आपल्या कामावर हजर झाला. आणि कृतज्ञ भावनेने म्हणाला,
मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही जी…
मी म्हणाले फक्त आपले काम प्रामाणिकपणे करा. अजून काही अडचण असेल तर सांगा.
त्याला त्याचे काम समजून सांगितले. तो अत्यंत प्रामाणिक पणे आपले काम करीत असे. रात्री परिसरात गस्त घालणे, तासांचे ठोके देणे, विद्यार्थिनींवर देखरेख ठेवणे, सकाळी झाडांना पाणी देणे इत्यादी कामे करू लागला. काही दिवसातच त्याला कळले की माझा नवरा नेहमी बाहेर गावी राहतो. मी घरी मुलांना घेऊन एकटी राहते. सकाळी मुलांना सांभाळून घरची कामे करून कार्यालयात काम करीत असताना कार्यालयीन कामात अडथळे येतात .तेव्हा तो सकाळी सहा वाजता घरी जाई व आंघोळ वगैरे करून नऊ वाजता कार्यालयात येऊन माझ्या घरी मुलाला सांभाळत असे.
त्याला जेवण देणे, पाळण्यात घालून झोपाविणे,व पाळणा हलवत तिथेच थांबत असे.मुलगा उठला ,रडला व मी कामात असले की मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात असे.मला त्याची खूप मदत झाली.माझ्या मुलाला तो जीव लावी तसेच माझ्या मुलाला पण त्याचा लळा लागला.मला मात्र या अनोळखी ठिकाणी ए नातेवाईक मिळाल्याचे समाधान मिळाले.तसेच तो मला कार्यालयीन कामात मदत करत असे.इथल्या विद्यार्थीनीं व त्यांचे पालक गोंडी,तेलगू, छत्तीसगडी भाषांमध्ये संवाद साधत.मला ते अजिबात कळत नव्हते.पालकांना तर मराठीपण येत नव्हते. विद्यार्थिनींना मराठी यायची पण त्यांचे उच्चार विचित्र वाटायचे.भातभाजी म्हणताना बातबाजी असा उच्चार करायच्या.कारण त्यांची मातृभाषा मराठी नव्हती.हळुहळू मी त्यांचे उच्चार नीट करण्यासाठी प्रयत्न केले.परंतू त्यांच्यातील संवाद मला कळावे म्हणून माझा पहारेकरी मला मदत करायचा.हे खूप महत्वाचे होते.
मी संस्थेची आहरण संवितरण अधिकारी असल्याने वेतन देयके माझ्या स्वाक्षरी ने मंजूर होत असे.महिनाअखेर त्याला पगार देताना त्याची प्रतिक्रिया तशीच होती जशी माझ्या पहिल्या पगार झाला त्यावेळी माझी होती. मला हसू आले.
क्रमशः
वाचत रहा….पुढील भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/१३-गुंता
कथा आवडल्यास like,share करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल.
(प्रिय लेखक,वाचक तुम्हीही शब्दपर्णवर लिखाण पाठवू शकता.)







सूमीचा गुंता कधी सुटणार ?
उत्तम कथानक.
आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झालेली सुमी नव ऱ्या पुढे मात्र अगतिक वाटते.