६-हरवून गेल्या जाणिवा
दर्शना भुरे
आत्याच्या डोहाळजेवणाची जय्यत तयारी चालली….
पुढे वाचा
भाग-६
आजूबाजूच्या गोंगाटाने वैकुंठाला जाग आली तशी डोळे चोळत ताडकन अंथरूणावर उठून बसत ती आजूबाजूला बघायला लागली. सकाळ होवून एव्हाना सूर्य बराच वर आला होता.. घरातील सर्वांच्या आंघोळी जवळपास उरकल्या होत्या…
रत्ना आत्या नवीकोरी साडी घालून आरशासमोर उभी राहून केसांचा अंबाडा घालीत होती..
स्वयंपाक घरातून पोह्यांचा खमंग वास दरवळत होता.. सोबतच चहापाण्याची धूम चालली होती.सगळे धावपळीत वाटत होते.
विनायक सुध्दा नवीन सदरा आणि डोक्यावर टोपी घालून पाहुण्यांसोबत ऐटीत बसून होता.
तिच्या कडे तिरप्यानजरेने बघत मोठ मोठा आवाज करत फुरक्या मारत चहा पित होता. वैकुंठाला तो तिलाच चिडवत आहे असे वाटत होते.त्याला तसे करताना बघून तिला त्याचा भयंकर राग येत होता पण ती मोठ्या प्रयत्नाने कसाबसा आपला रागआवरत होती
थोडावेळ अंथरुणात बसून ती उठली.तिच्या आईला शोधू लागली.. तिला भल्या पहाटेलाच उठून मैत्रिणींसोबत मेंदीची पाने आणण्यासाठी मळ्यात जायचे होते पण आईने लवकर उठवलेच नाही, तिचा सगळा बेत फसला होता..
आणि वरून विनायकपण लवकर उठून तिला चिडवत होता.. तिला एकदम हुंदका दाटून आला तशीच ती आईला शोधण्यासाठी स्वयंपाकघराकडे आई-आई आवाज देत धावली..
नर्मदा आत्या,आई , काकू चहा नाश्त्याची तयारी करण्यात गुंतल्या होत्या..त्याही नवीन साड्या नेसून तयार झाल्या होत्या..वैकुंठा सर्वांना नवीन कपड्यात बघून कोड्यात पडली,
तिच्या माहिती प्रमाणे कार्यक्रम तर उद्याला होते.
ती आईजवळ जावून काही बोलणार तितक्याच आई तिला पाहून म्हणाली.
काय हे वैकु..तुला माहीत आहे ना आज कापड खरेदीसाठी तालुक्याला जायचे आहे..एवढा उशीर उठायला.. मुलीच्या जातीला हे शोभते का? तो विनायक खरेच किती हुशार मुलगा आपल्या घरचा पाहुणा असूनही बघ..
मला त्या विन्याचे काही सांगू नकोस.. नुसता चिडका आहे..मला नुसता चिडवत राहतो.. मला मुळीच आवडत नाही तो. मी उशिरा उठले तर मुद्दाम माझ्याकडे बघून जोरजोरात आवाज करत चहा पीत होता. त्याला पाठवून दे परत त्याच्या घरी.
तिचा तोरा पाहून आई म्हणाली.
असे बोलू नाही वैकू आपल्या घरचा पाहुणा आहे तो. राग येईल त्याला.
येवू देत आला तर तसाच आहे तो खोटारडा कुठला
मला म्हंटला होता.. आपण सर्व लवकर उठून मेंदी ची पाने आणण्यासाठी मळ्यात जाऊ. आणि मला उठवले पण नाही. तसे मीपण त्याच्या सोबत मुळीच जाणार नव्हते त्या खोटारड्या विन्यासोबत.
वैकुंठाला गाल फुगलेले पाहून
आता काय केले आमच्या विनूने असे म्हणत रत्नाआत्या स्वयंपाकघरात आली..
बघा ना आत्याबाई मला मळ्यात जायचे होते.. पण कोणी उठविले नाही..
एवढेच ना वैकु.. काही काळजी करू नको विनायकने रामूकाकासोबत जावून मेंदी आणली.. आता तू पटकन तयार हो.. तुला नवीन परकर पोलके घ्यायला बैलगाडीतून यायचे ना तालुक्याला . घरी आलो की मी सुरेख मेंदी काढून देणार माझ्या वैकुला.
तिची समजूत काढत रत्नाआत्या म्हणाली..
तशी वैकुंठा..काही नको मला विन्याने आणलेली मेंदीबिंदी नुसता भांडत असतो माझ्यासोबत.
मी फक्त नवीन कपडे च घालणार… असे म्हणत फणकाऱ्याने निघून गेली..
विनायक-वैकुंठा सतत भांडत असतात.आत्या आईकडे बघून हसत म्हणाली.
लहान आहे वैकु अजून…आई बोलली.
क्रमशः
छोटी अबोध वैकुंठा कशी बदलत जाते…वाचत रहा
हरवून गेल्या जाणिवा…
प्रिय वाचक,वैकुंठाची ची ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे?
comments मध्ये नक्की कळवा.
Next part link
https://marathi.shabdaparna.in/७-हरवून-गेल्या





छान लिहिले
Chhan likhan
कथा मालिका आवडली