ढोल
ज्योती रामटेके
आई, अग चल ग, निमिषा आवाज देत होती.
तू ना लवकर आटोपतच नाही. काय असते ग एवढे घरात? निघतांना सुध्दा हे बघ ..ते बघ.. झाडे तर बघणारच.. आपण वापस येईपर्यंत कोणती कळी फुलणार याचा अंदाज लावत असेल ती,निमिषा पुटपुटत होती. सखू मावशी आहे न घरी. बघते ती सर्व.
आरुष हसत होता.निमिषा.. तुझे काय.. निघेपर्यंत आरशासमोर बसायचे. त्या आरश्यासमोर काय.. काय करत असते देव जाणे.. काय ते सामान मला तर काही कळतच नाही.अरे दादा त्यालाच तर मेकअप म्हणतात.आणि तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हटल.
बर बाई.. आता फक्त आमचा मेकअपचा खर्च सहा महिने नंतर तू आणि साकेतराव. आम्हाला काय करायचे.
बापरे.. फक्त सहा महिने..दादा मला झेपणार का ती अमेरिका.. एवढे लांब.. तुला आणि आईला सोडून मी कुठे गेली नाही अजून. निमिषा चेहरा उतरला होता.अग वेडाबाई तो काही वर्षांत वापस येणारच आहे. खूप सुस्वभावी आहे साकेत. सुखात राहशील तू.
दादा मला बाबा आठवत नाही रे.. पण ते तुझ्यासारखेच असतील. मायाळू..प्रेमळ.. समजुन घेणारे.. त्यांचीच प्रतिकृती असणार तू.आई तर बाबा बद्दल कधीच बोलत नाही. दोंघाचा सहवास तरी किती वर्षांचा.. तुला आठवतात का रे बाबा… नाही ग.. मला पण नाही आठवत..
चला..मुलांनो.इश्वरी आली.. काय आई.. किती वेळ निमिषा ओरडली.
अगं बाई घरातून पाय निघत नाही ग.माझा तर बाई फारच गोंधळ उडतो.. एका क्षणाला तर वाटते की जाऊच नये.
मस्त झोपाळ्यावर बसुन राहाव.अरे माझ पिल्लू आरुष शांत. कधीच बोलणार नाही मला. बघ निमिषा तो कसा समजुन घेतो मला.. तुझ्यापेक्षा माझ्या भावना कळतात ग त्याला.
बर बाई.. आपका वही पुराना डाॕयलाग हो जाये..
आरुषचा अर्थ कळतो का तुला. सुर्याची पहिली किरण. सार जग त्याच्या प्रकाशात न्हाहून निघत.त्याच्या शिवाय सगळीकडे काळोख. आपल्या घरात ही तसेच आहे ग.. आरुष नसला की सारे काही शुन्य. हो.. बाई.. मी काय.. अशीच…निमिषा बोलत होती.
हा..हा..हा.. सगळे किती वेळ हसत होते. गाडी सुसाट वेगाने धावत होती.. आई.. दादाचा जन्म सकाळचा का ग
ईश्वरीला धस्स झाले. हो.. ग.. म्हणून तर आरुष नाव ठेवले नं…
आज कितीतरी वर्षांनी ती घराबाहेर पडली होती. मुले आग्रह करत होती म्हणून कशीतरी तयार झाली ईश्वरी.
गाडीतून उंचच उंच झाडे किती सुंदर दिसत होती. निसर्ग किती भरभरुन देतो आपल्याला फक्त आपल्याला त्याची सुंदरता कळायला हवी. इतकी वर्ष पिंजऱ्यातील पक्षा सारखे जगत होती. कोणाचेही बंधन नव्हते. फक्त होती ती मनातील सल. काय गुन्हा होता माझा. चारचौघीसारखा आनंदाने भरलेला संसार हवा होता मला.. पण नियती घडवते नं सारे.. पण खरेच नियतीचा खेळ कि अनुपचे स्वच्छंदी वागणे. अशा लोकांनी लग़्न तरी का करावे.
कुणाच्यातरी आयुष्याचे वाटोळे करण्यात काय आंनद मिळत असेल यांना. अनुप तु माझ्या हसण्याचे कारण कधी झालाच नाही. तुझी सुखावणारी एकही आठवण ठेवली नाही .तु माझ्या आयुष्यात नको यायला हवे होते.
ईश्वरीला भुतकाळ आठवू लागला.
आई.. वडिलांची लाडाची मुलगी. मोठा वाडा.भरपूर झाडे. दारासमोर भलेमोठे चिंचेचे झाड.. ईश्वरी सतत त्या झाडाखालीच असायची. झाडाच्या मध्ये ही पोकळ जागा काय असेल याचे कुतूहल वाटायचे तिला. आजुबाजूला बरेच पक्षी रुंजी घालायचे. दोन कावळे रोजच चोचीमध्ये गवत आणायचे. ढोलीच्या आत सुंदर..सुबक घरटे बांधायचे.अध्ये.. मध्ये कोकीळ दिसायची. बाबा कावळ्याच्या घरात काय.. काय असेल.. ईश्वरी विचारायची.
काहीच नाही.. शेवटी काय, ते पक्षी.. लहानपणी आई..वडिल चोचीने भरवतील. पंख फुटले की ते पक्षी आसमंतात उडुन जाणार,कायमचे.त्यांचा तेवढाच ऋनानुबंध.
पण बाबा.. ही कोकीळ तिथे काय करते.ते दोन कावळे बाहेर गेले की ते दोघे पटकन ढोलीत जातात आणि वापस येतात.ईश्वरीला नवल वाटायचे.
बाबा हसले. अग ईश्वरी हे कोकीळ नं आळशी, भांडखोर असतात.ते मेहनत घेऊन घरटे कधीच बांधत नाहीत. आपले अंडी लपवून कावळ्याच्या घरट्यात आणून ठेवतात. कोकीळेचे अंडी हुबेहूब कावळ्यांच्या अंड्यासारखे दिसतात.कावळ्यांची जोडी काळजी घेतात. त्यांच्या लक्षात येत नाही.शेवटी अंड्याच्या बाहेर आले की कोकीळेचे पिल्ले उडून जातात.कावळयांना काही कळायच्या आत ते नाहिसे होतात. ईश्वरीला नवल वाटायचे.दिवस पंख लावून वेगात चालले होते.. ईश्वरी मोठी झाली होती. रोज ढोलीत बघणे सुरुच होते. आता तिला कळायला लागले होते.कावळयांच कौतुक वाटायचे तिला.. नकळत का होईना कोकीळेचे मातृत्व
ते स्विकारतात..ते तर पक्षी आहेत त्यांना शेवटपर्यंत नाही कळत.पण कोणालाच असे मातृत्व नाही आवडणार. आणि असे आवडायला किती मोठे मन पाहिजे असेल.
अनुप श्रीमंत घरातील मुलगा.. घरात सर्वांना आवडला.
बघण्याचा कार्यक्रम आटोपला.दिसायला सुंदर होता अनुप
स्वभावाने सालस वाटत होता.. लग्न थाटामाटात पार पडले.निंघताना तिची नजर सारखी ढोलीकडे जात होती.
कावळ्यांची जोडी अंडयावर बसून होती.
ईश्वरीच्या संसारात सुखच.. सुख होते. अनुप बिजनेसच्या निमित्ताने बरेचदा बाहेर असायचा. घरी सासरे आणि ती.
अनुपचे बाहेर राहणे जरा वाढले होते. सासरे विचारायचे तेव्हा तो म्हणायचा..
बाबा बिझनेस आहे काय करणार असे सांगून निघून जायचा.बाबांना काळजी वाटायची. ईश्वरी साधी, भोळी
आहे. अनुप तिला फसवत तर नसेल?
ईश्वरी.. अनुपकडे लक्ष दे जरा. आजकाल बिझनेसच्या नावाखाली बरेचदा बाहेर राहतो तो.
बाबा.. तसे काही नाही. काळजी करु नका. लवकरच आपल्या घरी बाळ येणार आहे.मग बघा तुम्ही अनुप सतत घरी राहणार.दिवस चालले होते.अनुपचे बाहेर राहणे जरा जास्तच वाढले होते.बांळतपणात काही दिवस घरी राहून तो पुन्हा गेला.सासरे थकले होते. ईश्वरीला आता अनुपची काळजी वाटायला लागली होती.काही विचारले तर सांगत नव्हता. सासरे आजारी पडले तेव्हा तो आला. तापाचे निमित्त झाले. तो तेरा दिवस कसातरी घरी थांबला..कधी..कधी अस्वस्थ दिसायचा तो. सिंगापूरला जायचे असे सांगून निघून गेला.
ईश्वरी निमिषाकडे बघत जगायला शिकली होती. आई,बाबा
भावाकडे अमेरिकेत निघून गेले होते. एकटी पडली होती ती.
एका रात्री फोन वाजला. लवकर या.. तुमच्या पतीचा अपघात झाला आहे. शेवटचे तुम्हाला बघायचे म्हणून विनंती करत आहेत. ईश्वरी लगेच पोहचली. अनुप शेवटच्या घटका मोजत होता. त्याच्या शेजारी एक सुंदर स्त्री पडुन होती.. या दोघांचा अपघात झाला. सुदैवाने हा मुलगा वाचला.नर्स सांगत होती. ईश्वरी माफ कर मला. आपला साखरपुडा झाला आणि लिली माझ्या आयुष्यात आली. बाबा मुळे मी लग्न केले. तुझा अपराधी आहे मी. ईश्वरी आमच्या मुलाचा सांभाळ कर तू. लहान आहे तो.
नाही… ईश्वरी जोरात ओरडली. लहानपणी कावळा.. कोकिळेचा गंमत बघायची मी. मला कावळ्यासारखे नाही होता येणार. विनाकारणचे मातृत्व नको आहे मला. अनुप हात जोडत होता. शेवटच्या श्वासापर्यंत तो आशेने बघत होता. ईश्वरी घराकडे जायला वळली.मागुन कुणीतरी तिचा पदर गच्च पकडला होता.तिने वळून बघितले.. केविलवाणा चेहरा करुन तो बघत होता. जणू मी आता कुठे जाऊ म्हणून तिला विचारत होता. तिने पटकन त्याला उचलले.
त्याच दिवशी ते शहर सोडले..
नाव..गाव नसलेल्या त्या लहान जीवाला आरुष म्हणायला लागली. दोघे मोठे होत होते. सुंदर त्रिकोणी कुटुंब तयार झाले. आईला खूप जपायचा आरुष. ईश्वरीच्या आयुष्यात आता सर्व होते.मरगळलेल्या मनाला आज कितीतरी वर्षांनी उभारी आली होती. वेगाने गाडी समोर चालली होती.. खूप काही मागे सोडून गाडीने वेग पकडला होता. दूर एका झाडाला ढोल दिसत होती…..
कथा आवडल्यास नक्की सांगा
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/







सुरेख कथा.
कथेचे नावही समर्पक
छान हृदयस्पर्शी कथा. आईचं मन देवांनी खूप विचार करून बनवलं.
खूप सुंदर कथा