थेंबफुले’-पुस्तक समीक्षा
थेंबफुले’-पुस्तक समीक्षा

थेंबफुले’-पुस्तक समीक्षा

नाते आणि संस्काराचे मर्म सांगणारा कवितासंग्रह ‘ थेंबफुले’
_____________________

श्री. एकनाथ डूमणे यांचा नुकताच प्रकाशित झालेला बालकविता संग्रह मराठी साहित्य जगतात वाचकांवर गारुड घालतो आहे. बालवाङ्ममयाचा तितकासा सोपा प्रांत नाही. बालमनाला, भावविश्वाला शब्दात सामावताना त्रेधातिरपीट उडालीच म्हणून समजा. त्यांच्या आशा आकाक्षा अमर्याद असतात. त्या खोलीचा अंदाज जीवघेणा ठरू शकतो. अथांग सागरी मनाचा निर्मळपणा,परी, प्राणीपक्षी अद्भूत रमणीय विचारविश्व अन् एवढ्या तेवढ्यावरचं दिव्यत्वाच्या प्रचितीचं भासमान क्षणिक सत्य हेच बालमनाच्या रममानाची सौंदर्य स्थळं. त्याची सुयोग्य योजना(बांदेसुद्ध) साचेबद्ध शब्दरचना, साधी सरळ भाषा मुलांच्या मनोरंजना बरोबर अंतर्मुख करायला लावणारी कवींची अनुभव सिद्धता वाखाणण्याजोगी आहे.
सेवेच्या तीसेक वर्षात जे अनुभवता, जगता आलं, त्यालाच प्रवाही केलं आहे. वर्गा बाहेरचं विश्व मुलांच्या चेहऱ्यावर असतं. दुःख, दैन्य, गरीबी-श्रीमंती हा चढता ताप त्यांच्या मनाला भिडणारा नसतोच. वास्तवापेक्षा कल्पनेला शब्दपंख दिले, की ‘थेंबफुले’ निरागस भाववृत्तीला चिंबचिंब करतात. संस्कार करणे, समाजातील दुष्ट-दुर्जनांची ओळख व्हावी. हा हेतू दृग्गोचर कवितेतील प्रतिमा प्रतिकांच्या रूपकातून होते. ती जाणीव मुलांना करून देणे, हा साहित्य निर्माणाचा हेतू सजग होताना दिसतो.
‘बाचाबाची’ कवितेत कोर्ट, न्यायाधीश, या शब्दांची ओळख मुलांना होते. आभार, शहाणी मुले आणि या बालकविता उल्लेखनीय ठरतात.
आजघडीला कुटुंब व्यवस्थाच मोडीत निघाली आहे. आजी-आजोबा, काका-काकू, आत्या-मावशी ही नाती आता उरली नाहीत. मग संस्कार कुठे ? कवींचा विश्वास नात्यांवर आहे. नाती जपली ,की विश्वकुटुंबाची छान गट्टी जमते. स्नेह, प्रेमाचा वाहता झरा घरीच अनुभवता आला, की बंधुत्वाची ओळख प्रबळ होते. मानवी नातेसंबंध आणि भूतदयेचा जन्म आकार प्राप्त करू पाहते. ही काव्याचबंधाची वैशिष्ट्ये आहेत.
बालमनाला, का ? कळत नसते आई. तिचे राबवून राट झालेले हात .आईच्या पंखात मिळणारी सुरक्षितता. हा मोठ्यांच्या भावविश्वाला पुरुण उरणारा विचार वाचकांना अंतर्मुख करते. आई ही कविता ,कवीची अनुभव सिद्धता होय.

धावाधाव तिची
किती बरं होई
दिसभर तिला
उसंतच नाही

ग्रामीण जीवन, तिथल्या संकल्पना चितारताना बालभावनेने प्रवाहीत करणं सोपे नसले तरी, ते पेलण्यास सज्ज होताना कवी दिसतो. तोचतोचपणा असला तरी नव्याची किनार प्रत्येक कवितेत दिसते. छत्तीस कविता आशयाला समृद्ध करणारी चित्रे, देखणे मुखपृष्ठ प्रा.प्रमोद दिवेकरांनी कवींच्या शब्द मंदीरावर कळस चढवलाय ,असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मलपृष्ठावर दा. मा. बेंडे गुरुजींची पाठराखण नवकविंना बळ देणारी ठरते. तेजश्री प्रकाशनाने काळाच्या मागणी नुसार बालकांच्या चेहऱ्यावर निरागस भावांच्या अक्षरमळयाची राखण केलीय.
बालकविता ही प्रबोधनापेक्षा मनोरंजन, संस्कारांशी जवळीक करणारी असावी. शतप्रतिशत सर्वच कविता मनोरंजनाशी नाते सांगतात.
मुलांच्या जडणघडणीत जे काही करा.का ? कसे ? या प्रश्नांच्या क्षितिजापलिकडे कविता पोहचते. यात शंका नसावी. भावी लेखनास शुभेच्छा !

थेंबफुले
(बालकविता संग्रह)
एकनाथ डूमणे
तेजश्री प्रकाशन
कोल्हापूर.

चंद्रकांत गायकवाड,
मुखेड.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!