बहारो फुल बरसाओ…..
इतके सुरेल गाणे ऐकून फुलांनाही बहर यावा
चौदहवीं का चाँद हो…गाणे ऐकून प्रेयसीची आठवण यावी.
क्या हूआ तेरा वादा....ऐकून डोळे भरुन यावे
तेरे मेरे सपने अब एक रंग है……प्रेमाची अनुभूती यावी…..
कर चले हम फिदा…..देशप्रेम उफाळून यावे
जाने कहाॕ मेरा जिगर गाया जी.….ऐकून आपसूक चेहऱ्यावर हसू उमटावे.
बाबुलकी दुआँए लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले
आजही हे गीत प्रत्येक पित्याला रडवून जाते.
त्यांनी गायलेले कुठलेही गीत ऐकले तरी गाण्याशी जवळीक साधली जाते.
ही गीतकाराची,संगीतकाराची किमया तर आहेच पण प्रत्येक गीतकाराच्या प्रत्येक गीताला न्याय देणाऱ्या ,प्रत्येक गाणे आगळ्या उंचीवर नेवून ठेवणाऱ्या ,सुरांची ताकद लीलया पेलणाऱ्या,मखमली आवाजाची देण लाभलेल्या गायकाचीही ही जादू आहे.
सुरांवर तब्बल तीन दशके अधिराज्य गाजवणारा ,हजारो गाण्याला आवाज देणाऱ्या सर्वांचा लाडका मोहम्मद रफी.
रफीचे एकेक गाणे म्हणजे कानसेनांना पर्वणीच.
रफीचे गाणे पडद्यावर अभिनयसम्राट गातोय कि सुमार अभिनेता गातो .साईड हिरो गातो कि विनोदी अभिनेता….फरक पडत नव्हता.त्या त्या कॕरेक्टरला अनुसरुन गाणे गायचे कसब,आवाजातून सर्वोत्तम अभिनय करण्याची कला फक्त रफीमध्येच होती.
गाणे रफीने गायले…बस्स एवढेच पुरेसे राहायचे. सुमार सिनेमेही रफीच्या गाण्यांमुळे चालले.
४०- ७० च्या दशकातील संगीत दिग्दर्शक,अभिनेते आणि रसिक सर्वांचा आवडता गायक,
कव्वालीभजन,देशभक्ती गीत,दुःखी गीत,प्रेमगीत,प्रेरणा देणारे गीत….कुठलेली,कुठल्याही भाषेत तन्मयतेने गाण्याचे वरदान लाभलेले रफी.
पहाडी आवाज,शास्त्रीय संगितात तरबेज
हजारो गाणी आणि विविध प्रादेशिक भाषेत गाण्याची किमया साधणारे ,दैवी सूर घेऊन पृथ्वीवर अवतरलेले मोहम्मद रफी.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांनी गायलेल्या आवडणाऱ्या गीतांवर लिहायचा केलेला हा प्रयत्न.
गाणी निवडता निवडता पाच,दहा,पन्नास,शंभर…
त्याच्या संपूर्ण कारकार्दीतील आवडत्या गाण्यांची निवड करणे अशक्य आहे.
रफीचे रंग और नूर कि बारात किसे पेश करुँ…हे गीत आवडते सांगतांनाच पत्थर के सनम आठवते मग हूई शाम उनका खयाल आ गया, छू लेने दो नाजूक होठोकों…..
अनेक आवडती गाणी आठवायला लागतात.
हे पण आवडते ते पण आवडते…..लिस्ट लगेच शंभरी पार करते.
म्हणून आजच्या लेखामध्ये रफीची एकट्याने गायलेली दहाच गाणी घेतली आहेत
ओ दुनियाके रखवाले..…
१९५२ मध्ये आलेल्या बैजूबावरामधील ह्या गाण्याबद्दल काय बोलावे?
रफीच्याच शब्दात तारीफ करु क्या उसकी जिसने तुझे बनाया…..
भक्तीरस,शोकरस औतप्रोत भरलेले हे गीत ऐकतांना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही
रफीशिवाय हे गीत कोणी गाऊ शकले असते?
बैजुचे दुःख ,यातना आपल्यापर्यंत पोहचवण्याची ताकद रफीच्या आवाजात आहे.शेवटी रखवाले….रखवाले…..शब्दातीत आहे.
बहारों फूल बरसाओ
मेरा महबूब आया है
१९६६ मध्ये आलेल्या सुरजमधील हे सदाबहार गीत आहे.हसरत जयपूरीने लिहिलेले आणि शंकर जयकिशनने संगीत दिलेले हे गीत आजही लग्नात वाजवले जाते.
गीतकाराचे सुरेख शब्द आणि रफीचा मधासारखा मधूर आवाज
५७ वर्षानंतरही गाण्याची गोडी अवीट आहे.प्रत्येक लग्नात हे गाणे आजही वाजवले जाते.
तब्बल तीन पिढी हे गाणे ऐकत आहे. आयुष्याच्या जोडीदाराचे स्वागत करायला यापेक्षा उत्तम गाणे नाही यावर आजच्या पिढीचाही विश्वास आहे.
छलकाए जाम आइए आपकी आँखों के नाम
होठों के नाम
मेरे हमदम मेरे दोस्त सिनेमातील हे गीत
मजरुह सुलतानपुरीचे गीत,संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलालचे.इतके नशिले गाणे कधीही नशा न करणाऱ्या गायकाने गायले यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी सत्य तेच आहे.
अभिनेत्याचे भाव गीतात अचूक उतरवण्याचे कसब मोहम्मद रफीमध्ये होते.
चौदहवीं का चाँद हो या आफ़ताब हो
जो भी हो तुम ख़ुदा की क़सम लाजवाब हो
१९६० साल
गीतकार- शकील बदायुनी
संगीत -रवी
गुरुदत्त-वहिदाच्या सिनेमातील हे गाणं.
वहिदा जास्त सुंदर कि रफीचा आवाज?
आजही हे गाणे तेवढेच ताजे.काही गोष्टींचे वय वाढत नाही.
रफीने गायलेली गीतेही तशीच. आजच्या मोबाईल युगातही सदाबहार,तरुण,मधाळ
मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं, मेरे यार सा हसीं
चाँद ने कहा, चाँदनी की कसम, नहीं, नहीं, नहीं
आनंद बक्षीने शब्दात गुंफलेल्या आणि R.D,बर्मननी स्वरांनी सजवलेले हे गीत १९८० साली आलेल्या अब्दुल्ला सिनेमातील आहे. ह्या गाण्याचे शब्दच किती गोड आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत.
जगात सर्वात सुंदर म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना प्रियकर त्याची प्रेयसी किती सुंदर आहे हे सांगत आहे,
चाँद,बाग,जाम,शायर….सगळे कबूल करतात.तिच्यासारखी तीच.तिच्याएवढे सौंदर्य कशातही नाही.
गाण्यातील प्रेयसीचे सौंदर्य जसे वादातीत आहे तेवढ्याच सुंदर आवाजात रफीने हे गीत गायले आहे.
गाण्याच्या शब्दाशब्दात ते जाणवत राहते.
नही नही नही…..सारखे शब्द पण तीनही दा.वेगवेगळे आणि सारखेच सुंदर गायले आहे.
मैने पुछा चाँदसे पासून सुरु झालेले हे गीत रफीच्या आवाजात कुठे कुठे फिरवून आणते.
एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो
शम्मी कपूरच्या सिनेमातलं. १९६१साली आलेला ‘जंगली’ हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमातलं ‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे गाणं. गीतकार शैलेंद्र यांची भारदस्त लेखणी, आणि शंकर जयकिशन यांच संगीत सुंदरच पण रफीमुळे गाणे खूप उंचीवर गेले.
मर भी गये तो देंगे दूआएॕ….ओळ ऐकली तर लक्षात येईल आपल्या.
दोनों ने किया था प्यार मगर
मुझे याद रहा तू भूल गयी
सोनीक ओमींचे संगीत, कमार जलालाबादीचे गीत. सिनेमा महूआ
मोहम्मद रफीचा स्वर्गीय आवाज गायला कठीण असलेल्या या गाण्याला मिळाल्याने गाण्याचे अमर झाले.नायिका नायकाला सोडून गेली.तिला परत आणण्यासाठी नायकाने गायलेले हे गीत.
नायकाची व्याकुळता, दुःख आणि तिला परत आणण्याचा अट्टाहास …सर्वच भावना रफींमुळे गाण्यात पुरेपुर
उतरल्या आहेत.
अब क्या मिसाल दूँ मैं तुम्हारे शबाब की
आरती सिनेमातील हे गीत.मजरुह सुलतानपुरीने अप्रतिम शब्दात रचलेल्या ह्या गीताला रोशन यांचे संगीत आहे.नायक,नायिकेची हळूहळू ओळख होते.दोघेही एकमेकांना आवडायला लागतात.
नायक तिच्यासाठी हे गीत गातो.ती किती सुंदर आहे यासाठी वेगवेगळी उदाहरणे देतो.नायिकेचे सौंदर्य वर्णन करतांना गाणे अधिकाधिक सुंदर होत जाते ते रफीच्या आवाजामुळे.
मस्त बहारों का मैं आशिक़ मैं जो चाहे यार करूँ
फर्ज सिनेमातील आनंद बक्षीने लिहिलेले आणि लक्ष्मीकांत प्यारेलालचे संगीत.
ओ दुनिया के रखवाले गायलेल्या गायकानेच हे गीत गायले हे खरे न वाटण्या इतपत हे गाणे वेगळे आहे.
गाण्याची चाल वेगवान आहे. कुठल्याही प्रकारचे गाणे असो ते रफीने गायले की त्याचे सोने व्हायचेच.
अकेले हैं चले आओ जहाँ हो
कहाँ आवाज़ दे तुमको कहाँ हो
राज…राजेशखन्ना बबिताचा सिनेमा, संगीत कल्याणजी आनंदजी यांचे.गीतकार शमीम जयपुरी.
.संगीत कमी असलेले हे गाणे रफीच्या सुरांमुळे अंगावर शहारे आणते.
ये तनहाईका आलम…..ऐकतांना आपण आपसूक रफीच्या सुरात खोल खोल बुडात जातो.रफीचे स्वर थेट अंतर्मनाला छेदून आत आत जातात…..
रफी चले आओ जहाँ हो
कहाँ आवाज़ दे तुमको कहाँ हो
जाता जाता रफीच्या आवाजात….मोहम्मद रफी वाढदिवसानिमित्य लिहिलेला हा पहिला भाग .त्याची सांगता रफीच्याच गाण्याने
तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
हाँ तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे
हाँ तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
चाहत्यांना अपार आनंद देणारा,त्यांच्या मनातील भावना गाणाऱ्या या गायकाला विसरणे कदापि शक्य नाही.दुःख ,आनंद,प्रणय…अशा कितीतरी भावना व्यक्त करणारी गीते रफीने गायली आहेत.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन.
……प्रिती…..
अतिशय सुंदर
खूप सुरेख लेख
अप्रतिम लिखाण.
अप्रतिम,
रफी चे गाणे सगळ्यांनाच आवडते
वाह ss