विषय एक कथा अनेक मध्ये यावेळी विषय आहे
पावसाची चिंब रात्र.
ढग रिते करुन आकाश निरभ्र करणारा पाऊस…अनेकांच्या अनेक आठवणी साठवणारा.
कधी बेफाम कोसळणारा,कधी रिमझिम चा नाद करत लयीत पडणारा,येतांना भरभरुन घेऊन येणारा,जातांना रितेपण देऊन जाणारा,कधी सुखावणारा तर कधी दुखावणाराही….
पाऊस कथा क्र.१
पावसाळी संध्याकाळ
निकुंजसोबत लग्न करुन घरात आलेली श्यामल आता घरात रुळली होती. श्यामलचा लग्नानंतरचा हा पहिला पावसाळा.घरात ती,निकुंज,निकुंजची आई मुक्ता असे तिघेच.श्यामलचा लग्नानंतरचा हा पहिला पावसाळा.
नेहमी गंभीर भासणारी तिची सासू मुक्ता पाऊस बरसायला लागल्यापासून खुलली होती.पावसात चिंब भिजत होती.पावसाकडे टक लावून बघत होती.
हा असाच कोसळत रहावा.हे क्षण इथेच गोठावे पण पाऊस थांबू नये. असे काहीशी बोलत होती.कालपासून पावसाचा जोर जास्तच वाढला होता. दिवसभर त्याचे बरसणे सुरुच होते.संध्याकाळ झाली.
ढगांनी त्यांच्या आड लपवलेला सूर्य अस्ताला जावू लागला.
मुक्ताने पायात चप्पल सरकवली आणि घाईघाईने बाहेर पडली.
निकुंज आई कुठे गेल्या? श्यामलने निकुंजला विचारले.
काही सांगून नाही गेली. जवळपासच गेली असेल.
कुठेही न जाणारी सासू अंधारलेल्या रात्री कुठे गेली असेल.श्यामलला जरा नवलच वाटले.
मुक्ताला परतायला वेळ लागला.रात्र झालीच होती.तिला बघून श्यामलने म्हंटले,
आई एवढ्या रात्री सोबत तरी न्यायचे कुणाला.
पाऊस रोज कोसळत होता. पाऊसच तो.कोसळून आकाशाला निरभ्र करणारा.
पावसाळ्याच्या सुरूवातीला खुललेली मुक्ताची कळी आतामात्र हळूहळू मिटू लागली.
आई,किती आनंदी होत्या तुम्ही काल दिवसभर.आज पुन्हा…..
हो ग श्यामल
असे म्हणत मुक्ता घरात गेली.
श्यामलला आश्चर्य वाटले.सगळे रुटीनमध्ये बिझी झाले.
पुन्हा पावसाळा सुरु झाला. मुक्ता खुलायला लागली.श्यामलला मागचा पावसाळा आठवला.
काय नाते असेल आई आणि पावसाचे…ती विचार करत राहायची.
पुन्हा मागच्यासारखीच मुक्ता एकटी पावसात भिजत निघाली.
आई मी येऊ का सोबत?
नाही ग मी जाऊन येते पटकन
पण कुठे ?
श्यामलचा प्रश्न मनातच राहला.तिला राहवले नाही तीही मुक्ताच्या पाठोपाठ निघाली.
मुक्ता बरसणाऱ्या पावसात बकुळीच्या झाडाखाली
थांबली. तिच्या आधी कोणी उभे होते त्याच्या मिठीत शिरली.
तो पुरुष तिला थोपटवू लागला.
श्यामलसाठी धक्कादायक होते हे सगळे.
जरा जवळ जाऊन ती त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करु लागली
मुकुंद वर्षभर या एका दिवसाची वाट बघते रे मी.
मुक्ता माहित नाही पुढला पाऊस येईल तेव्हा….
का रे?असा नको बोलू
मुक्ता घरचे सगळे यु.एस.ला सेटल व्हायचे म्हणतात.आजवर तुझ्यासाठी मी टाळत आलो.पण आता अशक्य वाटते.
मुकुंद घरच्यासाठी तू माझ्यासोबत लग्न नाही करु शकला.माझी वर्षातली एक पावसाळी संध्याकाळ तुझ्यामुळे चिंब होते.फक्त ती संध्याकाळ तरी माझी राहू दे.ती नको हिरावून घेऊ .
मुक्ता परतीचा पाऊस सुरु होईल आता.
पुन्हा ती त्याच्या मिठीत विसावली. श्यामल शांतपणे घरी परतली.थोड्याच वेळात मुक्ताही आली.
आई,घ्या चहा. चहा पिता पिता श्यामलने विचारले
आई कुठे गेल्या होत्या आणि तो पुरुष?
मुक्ता चपापली
श्यामल तो मुकुंद.शेजारी राहायचा. प्रेमात पडलो.त्या झाडाजवळ भेटायचो आम्ही.त्याच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला.तो इथून निघून गेला.शेवटचे भेटलो तेव्हा पावसाळी संध्याकाळ होती. दोघांनी आपापले संसार थाटले पण मने जुळून राहली.पावसाच्या एका संध्याकाळी तो तिथे येतो फोन न करताही तो तिथे आल्याचे मला कळते….
श्यामल अचंबित झाली
.पण ही शेवटची भेट होती श्यामल…..
मुक्ताच्या हातून कप गळून पडला.बाहेर पावसाचे कोसळणे थांबले होते….
प्रिती
(तुम्हीही तुमचे लिखाण marathi.shabdaparna.in साईटवर वर पाठवू शकता.)








खूप मस्त
खूप सुंदर
छान लघुकथा
Mast
छान लघुकथा