७-तिची आजी -मराठी कथामालिका
प्रभाकरला जरा लांब असलेल्या खेड्यातील एक मुलगी पसंत आली. ती होतीच कुणालाही पसंत येईल अशी.
गोरापान वर्ण, चाफेकळीसारखे नाक,टपोरे काळे डोळे,लांबसडक केस,उंची,बांधा….देवाने काहीही उणीव
ठेवली नाही तिच्यात.तिला बघताक्षणी प्रभाकरला ती आवडली.
दोन्ही घरची मोठी मंडळी एकमेकांशी बोलली आणि लग्न ठरले. घरात येणारी मोठी सून म्हणून सीताईने कसलीही कसर बाकि ठेवली नाही. दागदागिने,भारी पातळे सगळे शहरातून मागवले.
खूप दिवसांनी घरात आनंदमयी वातावरण निर्माण झाले होते.
सुगंधा सीताईच्या घराचे माप ओलंडून आत आली.
मनोहर,श्रीधर,गीता सगळ्यांना वहिनी आवडली.
दया लांब असूनही भावाच्या लग्नासाठी जोडीने आली.
सुगंधा घरात आली आणि सीताईची स्वयंपाकघरातून सुटका झाली. पण सीताईने स्वस्थ बसणे तिच्या स्वभावातच नव्हते.ती आता शेतीच्या कामात जास्त लक्ष घालायला लागली.सुगंधा सगळी कामे करायची पण हळूहळू आणि बोलायलाही अबोल होती. चपळता मुळीच नव्हती तिच्यात.
पण होईल हळूहळू सवय असे म्हणून सीताई गपचूप बसायची. तो जुना जमाना असूनही सीताईने सुनांना छळले नाही ना कधी टोमणे मारले.
शिवाय प्रभाकरला सुगंधा खूप आवडली होती,तो खूप जीव लावायचा तिला. सीताईला यातच आनंद होता. लग्नाला पाचसहा महिने झाले. प्रभाकरच्या जीवनाला स्थिरता आली होती.
प्रभाकर बाप बनणार होता.सुगंधाला दिवस गेले होते. ती प्रकृतीने नाजूक होतीच त्यात गर्भाचा भार. सीताईने पुन्हा एकदा स्वयंपाकघर ताब्यात घेतले. सूनेला जे आवडेल ते रांधत गेली. चुलीवरच्या गरमगरम भाकरी आणि ठेचा,भरीत सूनेला देत होती.त्याकाळात हे दृश्य दुर्मिळच होते. सुगंधाचे नऊ महिने भरले. कळा सुरु झाल्या,सुईणीला बोलवण्यात आले. सुगंधाने मुलीला जन्म दिला,बाळ वाचले बाळंतीण गेली.
प्रयत्न करुनही सुगंधा वाचू शकली नाही. काही तासाच्या मुलीची जबाबदारी सीताईवर आली.
प्रभाकरला सुगंधाच्या जाण्याचा जबर धक्का बसला.
लहानगीचा सांभाळ,श्रीधर आणि गीताची जबाबदारी ,शेती,घर आणि प्रभाकरला दुःखातून बाहेर काढणे या सर्व गोष्टी सीताईवर येऊन पडल्या. तिने कधीही तिच्या दुःखाचे भांडवल केले नाही.जे पुढे आले त्याला निमूटपणे समोरे जात राहिली.
बस्स आपल्या मुलांचे चांगले झाले पाहिजे हे एकच उद्दिष्ट तिच्यापुढे होते.
प्रभाकरने लहानगीचे नाव राजश्री ठेवले. राजश्रीला बघितले कि सगळ्यांना तिच्यात सुगंधाचा भास व्हायचा.
दिसायला ती सुगंधासारखीच देखणी होती.
सुगंधा गेल्यावर सीताईसमोर सगळ्यात मोठा प्रश्न राजश्रीच्या भुकेचा होता.
त्या एवढ्याशा,अश्राप जीवाची भूक कशी मिटवायची.काही दिवस कापसाचा बोळा दुधात बुडवून तो राजश्रीच्या तोंडात सीताई पिळायची पण त्याने राजश्रीची भूक जायची नाही.
तिचे रडणे सुरुच राहायचे. तिचा आकांत ऐकून सगळ्यांचेच काळीज हेलावून जायचे. सीताई कासावीस व्हायची. अशाच तिच्या रडण्याने तिच्याकडे बघून सीताईला पान्हा फुटला. आता राजश्रीची भूक भागत होती.
बिनआईच्या राजश्रीची सीताईला आई व्हावे लागले.
राजश्री एक वर्षाची झाली. ती आता घरभर चालत होती.बोबडे बोल बोलायला शिकली होती.सीताईला आता प्रभाकरने दूसरे लग्न करावे असे वाटत होते.उणापुरा एकदिड वर्षाचा त्याचा संसार झाला होता. प्रभाकर छोट्या राजश्रीमुळे लग्नाला तयार होत नव्हता.सावत्र आई राजश्रीला कशी वागवेल अशी धाकधूक त्याला वाटत होती.
सीताईने खूपदा सांगितले,
अरे तिची जबाबदारी मी घेते.तू लग्न कर.
प्रभाकर ऐकायला तयार नव्हता.
एके दिवशी अचानक राजश्रीला ताप आला आणि त्यातच ती गेली.सुगंधाची एकुलती एक आठवण संपली होती.प्रभाकरला अतीव दुःख झाले.
आणि सीताई जिच्यामुळे तिला पुन्हा आई बनावे लागले होते,तिला पान्हा फुटला ती राजश्री तिला सोडून गेली होती. सीताईच्या जीवनात पुन्हा रितेपण आले.
श्रीधरची सातवी संपली होती.आणि मनोहर मॕट्रिकमध्ये पोहचला होता.गीता चवथीत होती. आता श्रीधरला वसतिगृहात पाठवायची तयारी सुरु झाली.श्रीधरला जायची इच्छा नव्हती.त्याला मुळात शिक्षणात रसच नव्हता पण मनोहरच्या संगतीत होईल आपोआप सवय असा विचार करुन प्रभाकरने त्याचे न ऐकता त्याला वसतिगृहात पाठवायचे ठरवले आणि सीताईचा दुजोरा घेऊन पाठवलेही,आता घरी फक्त सीताई,प्रभाकर आणि गीता तिघेच होते.
संध्याकाळी दिवेलागणीला कधी एकटी बसली कि सीताईला जुन्या आठवणी छळायच्या. तिच्या जवळची किती माणसे तिला सोडून गेली होती.
तिची आई,वडील मग जन्मभराचा जोडीदार असलेला राम अर्ध्या वाटेवर सोडून गेला. जिला हौसेने घरात आणले ती सुगंधा प्रभाकरला एकटे टाकून निघून गेली. तिची एकुलती एक आठवण सीताईची लाडकी राजश्रीही तिला सोडून गेली. अवघ्या चाळीशीत तिला हे सगळे पचवावे लागले.
जीवाभावाचे तिच्याजवळ कोणी नव्हते.
कुणाजवळ दुःख व्यक्त करणार? सगळे दुःख आतल्याआत कोंडून घ्यायचे.त्याला बाहेर पडण्यासाठी वाटच मिळत नव्हती.
कधीतरी पूर्णाशी बोलणे व्हायचे तेवढेच.मुळात सीताईला दुःख उगाळत बसणे आवडायचेच नाही.
क्रमशः
Previous link
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सिताई च्या आयुष्याचा वनवास म्हणावा का हा ?
खूप छान कथा
मस्त!