यदा यदा ही क्रोधस्य
यदा यदा ही क्रोधस्य

यदा यदा ही क्रोधस्य

यदा यदा ही

रामचा आजचा दिवसच वाईट निघाला वैतागलेला. त्यात ऑफिसमधून घरी आल्यावर घराला भलं मोठं कुलूप बघितल्यावर तर तो अजूनच वैतागला. कुठे गेली ही रमा बिनडोक कुठली, तिला सांगितलं होतं की, मी घरी यायच्या वेळी कुठे जाऊ नकोस म्हणून, नेमकी मला पण आजच किल्ली विसरायची होती, कुठे उलथली ही रमटली, आल्यावर चांगली खबर घेतो तिची. अर्ध्या तासाने रमा घरी आली, ती खूप आनंदात होती, रामला समोर बघून तिला अजूनच आनंद झाला, तिने लगबगीने दार उघडले. घरात येताच राम तिच्यावर खूप चिडला, खूप रागावला तिला, ती काय बोलतेय हे ऐकून घेण्याची त्याची तयारीच नव्हती. रमाला त्याला गोड आनंदाची बातमी द्यायची होती पण तिच्या आनंदावर विरजण पडलं आणि रागाच्या भरात रामही या निखळ आनंदाला मुकला.
कुहू दोन तासांपासून मोबाईलवर गेम खेळत होती, आईने तिला दोन-तीन आवाज दिले पण तिचं लक्षच नव्हतं ती गेम खेळण्यातच मग्न होती, शेवटी आईने मोबाईल तिच्या हातातून हिसकून घेतला तेव्हा ती भानावर आली आणि आईला म्हणाली, काय ग ही तुझी सारखी-सारखी कटकट, मला माझा मोबाईल दे, असे म्हणून तिने मोबाईल आईकडून ओढून घेतला व परत गेम खेळायला लागली. आई तिला म्हणाली अगं केव्हाची तू त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलीय तेवढा वेळ जर अभ्यासाला दिलास तर छान मार्क्स मिळतील, आणि डोळेही खराब होणार नाहीत, हे ऐकताच कुहूने रागाने आईकडे बघितले आणि हातातला मोबाईल फेकून दिला. पंधरा हजारावर पाणी फिरले.
वरील दोनही उदाहरणांवरून आपणास असे दिसते की माणूस रागाच्या भरात सारासार विचार करण्याची शक्ती हरवून बसतो.
बहिर्मुख झालेला अहंकार म्हणजे राग. माणूस रागवायला चक्क शिकतो! माणसाला जन्मतः किंवा अनुवंशिकतेने राग ही भावना नसते. जन्मानंतर जस जसा अहं विकसित होत जातो तस तसा माणूस रागवायला शिकतो. ‘मी’ पणा वाढीस लागला, आणि स्वतःचे स्थान इतरांपेक्षा वरच्या स्तरावर समजू लागलो की इतरांनीही आपलेच ऐकावे अशी अपेक्षा निर्माण होते. अपेक्षाभंग झाला की राग येतो. मनासारखे घडले नाही किंवा घडवता आले नाही की राग येतो. राग ही नकारात्मक भावना आहे. ही भावना ताण निर्माण करते, राग वाढला की ताणही वाढतो.

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।

क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमाने विचारशक्तीभ्रष्ट होते, विचारशक्तीभ्रष्ट झाली की
बुद्धीचा नाश होतो, आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाचे पतन होते, म्हणून रागाला नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे.
माणसाला राग आला की तो अनेक तऱ्हांनी व्यक्त होतो. रागाने प्रचंड आरडाओरडा करून शिव्या बिव्या देण्यापासून ते अगदी अजिबात न बोलण्यापर्यंत अशा अनेक तऱ्हा असतात! भिंतीवर डोके आपटणे, हातातील वस्तू फेकून मारणे, स्वतःच्याच थोबाडीत मारून घेणे, दुसत्यांच्या अंगावर धावून जाणे, मारामारी करणे, मारणे, रागाने थरथर कापणे. अशा अनेकविध तऱ्हांनी राग व्यक्त होत असतो. एकदा रागाच्या भरात एक मुलगी श्वास रोखून काळी निळी पडली.
राग येण्याची अनेक कारणं आहेत. अपेक्षाभंग होण्यापासून ते स्वाभिमानाला ठेच पोहचण्यापर्यंत आणि अहंकारामुळे राग येण्यापासून ते भीती, चिंता निर्माणहोण्यापर्यंत.
राग येऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं पण तरीही यायचा तेव्हा राग येतोच. या क्रोधाला जिंकणं सोपं नाही याचा अनुभव ऋषीमुनींनी सुद्धा घेतल्याचं आढळतं. गौतमृषींच्या क्रोधामुळे अहिल्या शिळा झाली. जमदग्नीऋषींच्या क्रोधामुळे परशुरामांना मातृहत्या करावी लागली. अशी शेकडो उदाहरणे आपल्या समोर आहेत. राग हा विध्वंसक असतो. राग ही नकारात्मक भावना आहे, आणि ती शरीरावर व मनावर वाईट परिणाम करतेच तसेच नातेसंबंधातही गोंधळ निर्माण करते. बऱ्याचदा हा राग स्वतःकडे वळवला जातो आणि स्वतःचाच राग राग करून माणूस स्वतःची प्रगती खुंटवू शकतो.
या रागावर नियंत्रण कसं करायचं? तर राग आला की काहीही न बोलता १ ते१०० पर्यंत आकडे मोजायचे, राग कमी झाला नाही तर परत तेच करायचं. दुसरा उपाय म्हणजे रागाचा निचराकरण्यासाठी स्वतःला जे वाटतं ते कागदावर लिहून काढावं आणि कागद लगेच फाडून टाकावा. आणखी एक उपाय राग आला की दीर्घ श्वसन करावे आणि रोज पाच मिनिटं मांडी घालून डोळे शांत मिटून बसावे, हळूहळू राग कमी वेळा येऊ लागतो. आलेला राग आपण नियंत्रित करू शकतो. “रागावणे सोपे असते, शांत रहाणे कौशल्याचे काम आहे”. शांत राहण्यासाठी मनाची ताकद वाढविता येते.
आपली स्वप्रतिमा सकारात्मक आणि मोठी करणं, आपला आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढवणं असे उपाय केल्याने रागावर नक्कीच विजय मिळविता येतो. रागामध्ये सर्वनाश करण्याची ताकद असते त्यामुळे वेळीच जर त्याला आवरता आले नाही तर “विनाशकाले विपरीत बुद्धी” ही म्हण खरी होण्यास वेळ लागणार नाही.

प्रचिती विनायक जोशी.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

7 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!