धनश्री लेले, एक विद्वान व्यासंगी विदुषी.
धनश्री लेले, एक विद्वान व्यासंगी विदुषी.

धनश्री लेले, एक विद्वान व्यासंगी विदुषी.

मुख्य विषयापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी
धनश्री लेले, एक विद्वान व्यासंगी विदुषी-प्रसाद कुळकर्णी 
नमस्कार वाचकहो !
निवेदन, सुसंवादन, सूत्रसंचालन या क्षेत्राची थोडीफार समज मला लहान वयात आली आणि आवडही निर्माण झाली.  याचं मूळ कदाचित मी कीर्तन श्रवणातील घेत असलेल्या आनंदात असावं असं मला मनापासून वाटतं.  मी लहान असताना, म्हणजे साधारण 1964-65 चा काळ, आम्ही दादर या मुंबईच्या मध्यवर्ती भागात राहात होतो.  दादर चौपाटी आमच्या घरापासून पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर होती.  घराजवळ खेळायला जागाच नसल्यामुळे आम्ही चौपाटीवरच खेळायला जात होतो.  मनसोक्त खेळून घरी परतायचो.  मी मात्र आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी चौपाटीवरून सरळ घरी येत नसे.  चौपाटीच्या अगदी जवळच ज्ञानेश्वर मंदिर होतं.  अजुनही असावं.  प्रशस्त सांभामंडप असलेल्या त्या मंदिरात शिरल्यावर डाव्या हाताला गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाईच्या काळ्याभोर सुबक मूर्ती होत्या आणि त्याच्यापुढे ज्ञानेश्वरांची पंढरीशुभ्र ध्यानमग्न मूर्ती होती. 
आठवड्यातून एक दिवस देवळात वेगवेगळ्या कीर्तनकारांचं विविध विषयांवर कीर्तन असायचं.  माझं वय लहान असल्यामुळे कीर्तनामधला पूर्वरंग मला फारसा लक्षात येत नसे, परंतु उत्तररंगात पूर्वरंगातल्या विवेचनाचा दाखला देण्यासाठी किंवा ते अजून सोपं करण्यासाठी एखादी पुराणातली कथा सांगितली जायची.  ती ऐकायला मला फार आवडायचं.  परंतु ती ऐकत असतानाच कीर्तनकारांचे हावभाव, गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत, गोष्टीच्या मध्ये अभंग, श्लोकातून संतांचे दाखले देत ती खुलवत पुढे नेण्याची त्यांची हातोटी आणि या सगळ्याबरोबर त्या गोष्टीचं नाट्यमय सादरीकरण हे सगळं मला फार भावायचं. 
कीर्तनातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये रमत आणि गमत मी घरी परतत असे.
  आमच्या घरात वाचन श्रीमंती होती.  अर्थात हे मी माझ्या काही लेखातून सांगितलं आहे.  माझ्या वडिलांच्या संग्रहात आध्यात्म, साहित्य, कल्पित साहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र अशा निवडक मराठी, इंग्रजी भाषेतील दीड दोन हजार पुस्तकं होती.  त्यामुळे आम्हा भावंडातही वाचनाची आवड निर्माण झाली. 
पुढे एका हौशी नाट्यसंस्थेशी काही वर्ष नातं जुळलं.  या संस्थेतर्फे आम्ही एक सुगम संगीताचा कार्यक्रम बसवला होता.  त्या कार्यक्रमातील गीतांच्या अनुषंगाने संहिता लेखन मीच केलं होतं, आणि त्या कार्यक्रमाचं निवेदन रंगमंचावरून करण्याचा मी पहिला प्रयत्न केला.  आणि तो काही अंशी तरी सफल झाला. 
निवेदन, सुसंवादनातील माझे Idol होते आणि आजही आहेत सुधीरजी गाडगीळ.  त्यांची संथ आणि खालच्या सुरात चेहऱ्यावर मिश्किल हसरा भाव ठेवत निवेदन करण्याची पद्धत मला फारच आवडायची.  मी ज्या काही थोड्याफार संगीत कार्यक्रमांसाठी निवेदन केलं त्यावर सुधीरजींचा पगडा होता.  अजुनही त्यांची भेट घेण्याचा योग मात्र जुळून आलेला नाही, परंतु इच्छा मात्र मनापासून आहे.
पुढे प्रदीप धोंड या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या काही सुगम संगीतावर आधारित कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि कार्यक्रमाचं सुसंवादन करण्याचा योग आला.  तसंच त्यांच्या गीतगीतांमृत या भगवदगीतेचा गीतमय आविष्कार असलेल्या आणि गीतरामायणाची संकल्पना असलेल्या, कविवर्य नारायण दातार यांच्या गीतगीता या पुस्तकावर आधारित आणि प्रदीप धोंड यांच्या अप्रतिम संगीतानी सजलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मिळाली.
 मुख्य विषयापूर्वी ही सगळी पार्श्वभूमी विस्ताराने लिहिण्याचं कारण असं की आज मी ज्या एका लेखिका, रसाळ निवेदिका, उत्कृष्ट वक्त्या, संस्कृत भाषा आणि साहित्याच्या , तसंच संतसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक,  विविधांगी आणि व्यासंगी व्यक्तिमत्व, विदुषी धनश्री लेले यांचं शब्दचित्र माझ्या कुवतीनुसार मांडणार आहे, त्यातला त्यांचा रसाळ निवेदक हा पैलू मला खूप जवळचा आहे.  त्यातलं रसाळ सोडून फक्त निवेदन या क्षेत्रातला मी ही एक अगदी बारीकसा ठिपका आहे.
मुख्य विषय
धनश्री लेलेएक विद्वान-व्यासंगी-विदुषी.
धनश्रीजींची व्याख्यानं, भाषणं ऐकण्यापूर्वी (अर्थात ती ही अजून प्रत्यक्षात ऐकण्याचा योग आलेला नाही.  ध्वनीमुद्रित झालेलीच ऐकली आहेत )मी शिवाजीराव भोसले यांचं स्वामी विवेकानंदावरचं भाषण ऐकलं होतं.  अर्थात खूप जुनी गोष्ट आहे ही. 1975सालची असावी.  आमच्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यांत त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं.  थोडावेळ ऐकून जाऊ असं मनाकडे ठरवून मी ऐकायला बसलो, आणि त्यांच्या संथ आणि ओघावत्या शब्दकळेने अक्षरशः आणि शब्दशः भारावल्यासारखा बसून ते संपूर्ण भाषण मी ऐकलं. 
पुढे बाबासाहेब पुरंदरे, बाबामहाराज सातारकर,  वसंत पोतदार, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचीही प्रत्यक्ष आणि ध्वनीमुद्रित अनेक व्याख्यानं ऐकण्याचा योग आला.  प्रत्येकाचा विषय निराळा, शैली निराळी.  विषय भिन्न असले तरी या प्रत्येक थोर वक्त्याचा अवाका, व्यासंग आणि विषय श्रोत्यांच्या मनात उतरवण्याची कुवत प्रचंड होती.
आणि एक दिवस मी धनश्री लेले यांचं विश्वरूपदर्शनयोग या विषयावर किंवा गीतेतील या प्रकरणावरचं, माझ्या मते ठाण्यात आयोजित केलेलं ध्वनीमुद्रित व्याख्यान ऐकलं, आणि मी आनंद, अचंबा, आश्चर्य, थक्क, भारावणं, गुंगून जाणं, भरून येणं, म्हणजे जितक्या म्हणून सुखसंवेदना आहेत त्यामध्ये न्हाऊन गेलो.  याचा अर्थ असा अजिबात नाही की यापूर्वी धनश्री लेले हे नाव मी ऐकलेलंच नव्हतं.  शांत बसून ऐकण्याचा योग मात्र आला नव्हता. 
काय होतं त्या व्याख्यानात?  एक प्रसन्न हसरा चेहरा जो आपल्या गोड वाणीने श्रोत्यांशी संवाद साधत होता.  गोड वाणी म्हणजे काय याची जाणीव मला धनश्रीजींना ऐकताना झाली.  त्यांची ओघवती वाणी अंगावर येत नाही आणि श्रोत्यांना थकवा सुद्धा आणत नाही.  ( हो ! काही वक्त्यांचं भाषण ऐकणाऱ्यालाही थकवा आणणारं असतं अहो .) तर उन्हाळ्याने काहीली होतं असताना अकस्मात आलेला मोगऱ्याचा सुगंध जसा मन प्रसन्न करून जातो तशीच ती मनसोक्त आनंद देत जाते.  त्यांच्या बोलण्यात कुठेही आपली विद्वत्ता दाखवण्याचा अविर्भाव
(हा बऱ्याच निवेदकांच्या निवेदनात हमखास जाणवतो जो कार्यक्रमातली आपली भूमिका विसरून गेलेला असतो.)जाणवतही नाही, तर विषय जास्तीत जास्त सुंदर, सोपा आणि सुगम होऊन श्रोत्यांच्या हृदयी उतरावा इतकाच भाव जाणवत असतो.
आता हे सगळं वाचून कुणी म्हणेल,
“अहो हे तुम्ही आज सांगताय ! आम्हाला हे खूप आधीपासून जाणवलंय.  तुम्ही उशिरा जागे झालायत.”
हो ! अगदी बरोबर आहे, परंतु उशिरा जाग आल्यावरही जागेपणी मिळालेला अनुभव मांडल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही ना. 
मी विश्वरूपदर्शनयोगाचा व्हिडिओ पाहिल्यावर न रहावून अगदी दुसऱ्याच दिवशी धनश्रीजींना फोन केला आणि व्हिडिओ पाहून आणि ऐकून झालेला आनंद त्यांच्याशी शेअर केला.  साधारणपणे कार्यक्रमात ज्या मनोहारी पद्धतीने वक्ते बोलत असतात त्याच्या नेमका उलट अनुभव फोन केल्यावर येतो.  अर्थात आपल्या अवेळी फोनमुळे त्यांच्या साधनेत व्यत्ययही येत असेल.  पण हा अनुभव इथे मला अजिबात आला नाही.
पुढे मी त्यांचे विविध भाषण, व्याख्यानांचे ध्वनीमुद्रित व्हिडिओ ऐकण्याचा सपाटा लावला.  म्हणजे अगदी नादच लागला म्हणां ना. 
सांगे कबीर,  मेघदूत आषाढस्य प्रथम दिवसे,  दासबोधातील सौंदर्यस्थळं, इबादत भक्तीची, नुकतच ऐकलेलं गंगालहरी,  युगंपुरुष स्वामी विवेकानंद,  संशोधनाच्या नव्या वाटा, गुरुमहिमा, ओवी ओवी गुंफिली,  कथाकथन……. आणि अजून खूप खूप बाकी राहिलंय ऐकायचं.
परंतु जेव्हढं ऐकलं किंवा मी म्हणेन पाहून ऐकलं त्याने प्रभावीत नाही म्हणणार तर त्या व्यासंगाच्या, वक्तृत्वाच्या आणि विद्वत्तेच्या मी प्रेमात पडत चाललोय.  प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती मुळे आपण थोडे दबून जातो.
धनश्रीजींना ऐकताना हे होत नाही.  त्यांचा व्यासंग विद्वत्ता आपल्याला त्यांच्यापासून एका अंतरावर उभं करत नाही तर त्यांच्या जवळ आणते.  तसंच भाषेची शुद्धता, सहजता आणि स्वच्छ शब्दोच्चार याचबरोबर जडजंबाळ शब्दांची जराही साथ न घेता त्यांची भाषा कानावर पडते आणि म्हणूनच ती आपली, जवळची वाटते. 
मराठी भाषेच्या शुद्ध शब्दोच्चारांमागचं कारण त्यांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम, अभ्यास आणि त्यावरचं प्रभुत्व हे असावं असं मला मनापासून वाटतं.  अगदी सहजपणे बोलता बोलता संस्कृत सुभाषितं, श्लोक, यांची पखरण धनश्रीजी करतात.  कोणत्याही विषयावरचं त्यांचं भाषण ऐकताना त्यांचा व्यासंग, विषयावरची पकड जाणवते. त्यांची विषय मांडण्याची पद्धत ही ओघवती असली तरी त्याचा ओघ आपल्यावर येऊन धडकत नाही, तर समजून घ्यायला वेळही देतो. 
इबादत भक्तीची या विषयावरील त्यांचे विचार ऐकताना, त्यांच्या मुखातून येणारे अस्खलीत उर्दू शब्द ऐकताना असं कुठेही जाणवत नव्हतं की हे श्रोत्यांसमोर मांडणारी ही एक मराठी व्यक्ती आहे, इतके ते चपखलपणे आणि नेमक्या उच्चारासह येत होते.
 एखाद्या शास्त्रीय संगीत गायकाची खयाल गायकी जशी रागाची नेमकी बांधणी स्पष्ट करत आणि त्या रागाला आपल्या गानप्रतिभेने सजवत, अप्रतिम सौंदर्याचं रूप घेऊन रसिकांसमोर येते अगदी त्याचप्रमाणे धनश्रीजींच्या मुखातून येणारे शब्द विषयाची बांधणी स्पष्ट करत आणि त्यामधल्या आशयाला आपल्या शब्दकळेने सजवत, चारही अंगानी हळुवारपणे फुलवत आणि नेमकेपणाने मांडत त्या विषयाला सुगमतेचं मूर्त स्वरूप देत श्रोत्यांसमोर येतात.  म्हणूनच त्यांना मी वाकपटु म्हणणार नाही.  ते कुस्तीपटु सारखं वाटतं. 
इथे भाषेचं शब्दांच सौंदर्य आहे नजाकत आहे.  इथे भाषा शब्दांचं लेणं घेऊन श्रोत्यांच्या कानी, कानातून मनी आणि मनातून हृदयी उमंलते.  धनश्रीजींनी आजच्या तरुण पिढीसाठी व्यक्तिमत्व विकास या अत्यंत महत्वाच्या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत केलेल्या मार्गदर्शनाचा व्हिडीओ ज्या युवकांनी पाहिला ऐकला नसेल त्यांनी तो youtube वर जरूर पहावा.  काहीही शिकवण्याचा, धडे देण्याचा अविर्भाव नाही.  सहज गप्पा मारल्यासारखं काहीतरी छान, सुंदर पण महत्वाचं देऊन जाणं.
एखाद्या सुगम संगीत कार्यक्रमाचं निवेदन करताना सुद्धा गीताच्या ओघाने येणारे किस्से, अनुभव आपण यापूर्वीही ऐकलेले असतात, तरीही ते धनश्रीजींच्या मुखातून एक वेगळा आयाम घेऊन येतात आणि आनंद देऊन जातात.
धनश्रीजीं! आपण रूप पाहता लोचनी या कार्यक्रमाच्या निवेदनात दहा चंचल मकार सांगितले होते जे नेहमी एकाच दिशेने धावत असतात.  आणि अकरावा मकार जो एकाच वेळी चारही दिशांना धावत असतो तो म्हणजे चंचल मन.  परंतु हे चारही दिशांना धावणारं मन तुमचं एखाद्या विषयावरील विवेचन ऐकायला बसल्यावर आपला स्वैरपणा, अस्थिरता, चंचलता आवरून शांत होतं, स्थिर होतं, एकाग्र होतं तुमच्या रसाळ वाणीची अनुभूती घ्यायला.”
अखेर मला मनापासून एक जाणवलंय की धनश्री लेले यांचा विविध विषयांचा व्यासंग, अभ्यास, त्यावरची पकड आहे हे निर्विवाद.  परंतु त्याचबरोबर मला वाटतं की त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा त्यांच्यावर आशिषही आहे असं त्यांना ऐकताना मनापासून वाटत रहातं.
भगवंतांनी अर्जुनाला अलिंगन दिलं,  आणि या अलिंगनाच्या स्पर्शाचं फळ म्हणजेच,
हृदया हृदय एक झाले,
ये हृदयीचे ते हृदयी घातले.
द्वैत न मोडता केले,
आपणा ऐसे अर्जुना.
त्याचप्रमाणे धनश्रीजी सुद्धा आपल्या रसाळ, गोड शब्दकळेच्या माध्यमातून आपल्याला जाग आणणारे , जागं करणारे आणि विचार करायला लावणारे, त्यांनी अभ्यासलेले, त्यांना भावलेले विचार आपल्या विवेचनामधून  (प्रवचन नाही म्हणणार मी कारण प्रवचनाचं स्वरूप हे उपदेशपर असतं, तर विवेचन अनेक गोष्टींची उकल करत, शंकसमाधान करत आपल्यासमोर येतं.) त्यांच्या मनीचं, हृदयीचं आपल्या हृदयी घालण्याचा मनापासून प्रयत्न करतायत, आणि नकळत आपलीही हृदयं त्या परमत्म्याच्या हृदयाशी जोडली जातायत.
खरच ही हृदयं माणुसकीच्या भावनेने माणसाशी जोडली गेली तर देव आणि मनुष्य यामधलं द्वैत सरून माणसांतल्या देवत्वाचा प्रत्यय प्रत्येकाला येईल आणि सारीकडे अद्वैताचीच अनुभूती आपल्याला जाणवू लागेल.
धनश्रीजींनी बोलत रहावं आणि आम्ही तृप्त होऊन ऐकत रहावं यापेक्षा दुसरा आनंद काय असणार?
खूप खूप शुभेच्छा ! 
प्रासादिक म्हणे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णवर  इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

4 Comments

  1. अतिशय सुंदर आणि छान लिहिलंय . धनश्री लेले यांना ऐकणं जितकं मंत्रमुग्ध तितकंच तुमचं लिखाण वाचणं तोडीस तोड ! अप्रतिम लिहिलंय,थोडा मोठा झालाय लेख पण धनश्री ताई शब्दबध्द करणं केवळ अशक्य ! प्रसाद जी खूप खूप अभिनंदन असेच लिहीत रहा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!