उमेद-लेख-marathi article
पहाटे उठून Morning walk ला जायचा माझा फार पूर्वीपासूनचा शिरस्ता. फार प्रसन्न वाटायचं. मग अचानक कोरोनाचं संकट आलं आणि सारं काही बंद झालं. काही दिवस घरात बंदिस्त राहिल्यावर जीव घुसमटायला लागला, तब्येतही बिघडली आणि मग ठरवलं बाहेर नाही जाऊ शकत तर घराच्या गच्चीवर तर जाऊच शकतो. जरा भीतीदायकच होतं, असंख्य विचार मनात होते पण तरीही जायचा निर्णय घेतलाच.
पाहिल्याच दिवशी जेव्हा walk संपवून घरी यायला निघणार तोच समोर आसमंतात सुंदर केशरी गोळा काळोखाचे पांघरूण सारून प्रकाशाची किरणे उधळताना पाहिला आणि मनातली भीती जणू पळून गेली. सूर्यनारायण जणू नवीन आशा घेऊन उगवला होता. कवी मन माझं अशा वेळी गप्प कसं बसेल… लगेच चार ओळी बोलून गेलं..
चीर अंधेरा आज फिर
बिखरा है रंग केसरिया
जैसे नई नई उम्मीदोंका
परचम हो लहराया
ह्या सूर्याचं मला फारच अप्रूप वाटतं. फार शिकण्यासारखं आहे ह्याच्याकडून. रात्र कितीही काळी भयाण असली तरी सकाळी पुन्हा नव्या आशा घेऊन दिशा उजळायला तयार. कितीही मातब्बर काळेकुट्ट ढग येऊ देत, ह्याला पूर्णतः निःप्रकाश करणं अशक्य (अपवाद फक्त खग्रास ग्रहण). ढगांनी चंद्र झाकोळला जाईल पण सूर्य? छे! अशक्य कोटीतली गोष्ट. मग अशावेळी मला त्या ढगांनाही सांगावंसं वाटत…
ऐ बादलों, इसे बस में करने की कोशिश न करना
ये माहताब नही…आफताब है।
आज आकाश निरभ्र होतं. गुलमोहराच्या फांद्यांच्या मधून वाट काढत सूर्य आपल्या पूर्ण अवतारात उगवता झाला… केशरी लाल रंग, जणू अग्नीचा गोळाच. पुन्हा माझ्याच ओळी मला आठवल्या…
अग्निगोल भासमान तू
व्यापिले अखंड आसमान तू
फाडुनी सारी सावट काजळी
परतला घेऊनि आसकिरण कोवळी
ह्या अशा नवं चैतन्य घेऊन येणाऱ्या सूर्याकडे मी भान हरपून पहात असता मनात केवळ एकच विचार येत होता… ह्या दिनकराने आपल्या सहस्र बाहूंनी जे असंख्य चैतन्यमयी किरण आसमंतात विखुरले आहेत, त्यातला निदान एक किरण.. नाही.. नकोच.. एका किरणातला केवळ एक कण जरी मी माझ्यात सामावून घेऊ शकले… तर? हा विचार मनात आला आणि कोवळ्या सोनेरी किरणांची एक तिरीप थेट माझ्या चेहऱ्यावर आली. मी डोळे मिटून घेतले आणि डोळ्यासमोर फक्त दाट सिंदूरी रंग आणि मधोमध तळपणारा एक ठिपका… आणि मग…
तेजाळले चित्त माझे
उजळला देह सारा
कण एक तव प्रकाशाचा
प्राशीला मी भास्करा…
त्या भारावलेल्या अवस्थेत नकळतच माझे हात जोडले गेले आणि त्या सुर्यनारायणापुढे मी नतमस्तक झाले…
हे भास्करा, हे दिनकरा,
हे चराचराच्या पोषका
हे तमोरी, हे मार्तंडा,
हे तेजाच्या दायका
हे पुषणा, हे महाद्युती,
हे अग्नीच्या गोलका
नमन तुजला, वंदन तुजला,
हे सृष्टीच्या पालका…
–©मेघना
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
https://marathi.shabdaparna.in/लेख
Chan