सुप्रियाच्या सासुबाईही जग सोडुन गेल्या, तशी तिला माधवची जास्त काळजी वाटू लागली. पुन्हा संसाराची घडी नीट व्हायला वेळ लागला. सुप्रियाची नोकरी सुरू असताना , कोविड काळात माधवला पुन्हा एक झटका आला. पुढे….
स्वयंसिद्धा : भाग १६ (अंतिम )
स्वयं सिद्ध ती
कोविड, लॉक डाऊन आणि वरून बरसणारा तुफान पाऊस , अशात माधवला आलेला झटका. सुप्रियानी त्याला कसंबसं स्कूटी वर बसवलं. सदानंद सर आणि डॉक्टर भाग्यश्रीच्या मदतीने दवाखान्यात दाखल केलं.
एव्हाना डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले होते, सोडियमची कमतरता आणि बी.पी.चा समतोल बिघडून तब्येत अचानक बिघडल्याचे डॉ.नी सांगितले. पुढे दोन दिवस दवाखान्याची वारी सुरूच राहिली. मुलींनी मात्र सारं काही सांभाळून घेतलं. एकीला धाकट्या बहिणीची जोड मिळाली होती. वरचेवर येणारे प्रसंग आणि सुप्रियाची होणारी ओढताण बघून दोघी कणखर, मजबुत बनल्या होत्या.
दोन तीन दिवसांनी माधवला घरी आणले. सुप्रियानी आठ दिवसांची रजा घेतली होती.
आता तिला नोकरीला जाताना त्याची काळजी वाटू लागली. कोणी ना कोणी तरी घरी थांबण्याची गरज होती. माधवची काळजी घेण्याची गरज होती.
सुख,शांती,समाधान हे जणू तिच्या शब्दकोषात शब्दच नव्हते. पण आता तिला मुलींचा मोठा आधार वाटू लागला होता.
आता या चिमण्या ही उडून जातील काही दिवसात आपल्या घरट्यातून हा विचार मनात आला . मुलींचे लग्न झाल्यावर आपले कसे होणार या विचाराने ती कासावीस झाली.
आणि तत्क्षणी ती भानावर आली. …..
कवितासंग्रह चा प्रकाशन सोहळा झाला त्या रात्री तिला आनंदाने समाधानाने झोपच लागली नव्हती. आराम खुर्चीत हेलकावे घेत अख्खा जीवनपट तिच्या डोळ्यासमोरून सरकला होता.
” अरे,हे काय? आपण तर पूर्णतः मागे गेलो होतो याची आठवण आणि जाणीव तिला भानावर घेऊन आली. आणि आजच्या कार्यक्रमातील कितीतरी गोड आठवणींनी मनावरचे मळभ दूर केले होते.
मागचा सगळा प्रवास आठवला म्हणजे आज जीवाचा थरकाप होत होता, त्या आठवणीत चांगल्या पेक्षा वाईटच आठवणी अधिक होत्या. संकटे आणि त्यावरचे मार्ग याव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते.
जीवन उन्ह-पावसाचा खेळ आहे म्हणतात पण सुप्रियाच्या प्राक्तनात उन्हच जास्त आले. जरा पावसाचा शिडकावा झाला कि उन्ह जीवाची काहीली करायला सज्ज व्हायचे.
पण उन्हातही तिने समाधान मानले होते. उन्ह संपणारं आहे यावर तिचा अतोनात विश्वास होता. आहे. आज ना उद्या तिचा विश्वास तिच्या दोन लेकी सार्थ ठरवतील ही आशा तिच्या मनाला प्रफुल्लीत ठेवते.
आता ते दिवस आठवण्याची तिची मानसिकता नाही. त्रास होतो मनाला.
दोन्ही लेकी कष्टाने पुढे चालल्या.
शिक्षणाबरोबरच छोट्या छोट्या नौकऱ्या करुन आईला संसाराचा गाढा ओढायला मदत करत आहेत.
परिस्थितीने बालवयातच त्यांना शहाणे केले. त्याही आता आईसारख्याच बिकट परिस्थितीवर मात करायला सज्ज झाल्या.
सुप्रिया नवऱ्याला मागे स्कुटीवर बसवून शेतात पण जाते. शेतीची कामे बघते.
सुप्रियाचे संपूर्ण जीवन येणाऱ्या अडचणींशी कसे लढायचे यात गेले. तिला असलेला फुलबागेचा छंद आतल्याआत सुकला.
कविता लिहिण्याची आवड मनातच गोठली.
पण आता तिचे मन पुन्हा उभारी घेत आहे. कविता आता पुन्हा तिची सोबत करत आहेत. तिच्या लिखाणाच्या छंदाने तिची साथ सोडली नाही.
पाणी धावते म्हणून त्याला वाट सापडते, जो प्रयत्न करतो त्याला यशाची , सुखाची, आनंदाची वाट सापडते.
खंबीर मनाची सुप्रिया कायम देवाने घेतलेल्या परिक्षेत पास झाली. दिवस कसे सरले ते समजलं नाही पण कोणत्या पद्धतीने ? ते तिला विसरता आले नाही.
आज आपण जिथे आहोत,जसे आहोत, तिथून माघार घ्यायची नाही. परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची सोबतच आपल्याला यश मिळवून देणार, ही तिची श्रद्धा सार्थ ठरणार हा आत्मविश्वास आज तिच्याजवळ होता.
आता
प्रश्नांना आता तिनं सांगितलं खडसावून,
यायचं असेल तर खुशाल या बाबांनो…..
स्वागत आहे तुमचं , पण हो,
उत्तरांना या सोबतच घेऊन.
असू देत वाटा बिकट पुढच्या
कुढत नाहीच बसणार,
जिथे संकट उभे राहिले तिथे
देवच पाठीशी असणार..
समाप्त
मोहिनी पाटनुरकर राजे
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/








पूर्ण bhag वाढली नाhi pan climax vachun lekhan aprtim असाv असे वाटते…
जबरदस्त लिखाण