११-गुंता एका स्त्री मनाचा
११-गुंता एका स्त्री मनाचा

११-गुंता एका स्त्री मनाचा

११-गुंता एका स्त्री मनाचा

सुमीला नोकरीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीचे आईवडिलांच्या घरी घालवलेले दिवस आठवले.
माझी बीएडची परीक्षा संपली तेव्हा माझे बाळ आठ महिन्याचे होते .परीक्षा संपल्यानंतर लगेच आम्ही आईबाबांच्या घरी ,जे माझ्या वाट्याला आले होते, तेथे राहावयास आलो. इथे आल्यानंतर बाबा माझ्याकडे व व आई बहिणीकडे राहत होते .आई अजूनही बाहेर कामाला जायची .माझ्या बहिणीची व माझी सुद्धा आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती.नवरा आता कोणतेही काम करीत नव्हता. माझी बहीण व मी एकाच घरात वेगवेगळ्या भागात राहत होतो. माझ्या नवऱ्याने माझ्या साठी आणखी एक काम शोधले .मी त्याच्या सांगण्यावरून बाळाला घरी ठेवून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हायस्कूलला तासिका तत्त्वावर विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झाले. जरी पगार कमी होता पण अनुभव येईल असे नवऱ्याने सांगितल्यामुळे मी तेथे रुजू झाले. सकाळी बाळाचे व घरचे आवरून सकाळी नऊ वाजता च्या बसने धोत्रा या शाळेच्या गावी जाण्यासाठी निघे . तेथील बस स्टँड वरून शाळेला एक किलोमीटर पायी जावे लागत असे. परत येताना सुद्धा तेवढेच अंतर पायी येऊन बस पकडून मला घरी यावे लागे. घरी आल्यानंतर सायंकाळी बाळाला सांभाळून रात्रीच्या स्वयंपाकाला लागे. दिवसभर बाळाला माझा नवरा, माझी बहीण व छोटी सांभाळत असे. मला घरी पोहोचायला सायंकाळचे सात वाजत असे. मी दिसल्याबरोबर बाळ एकदम माझ्याकडे झेप घेई, तेव्हा त्याला सोडून दिवसभर राहावे लागले याचे फार वाईट वाटे. पण इलाज नव्हता.
मी घरी असले की नवऱ्याच्या डोळ्यात खूपत असे. तो लहानसहान गोष्टीवरून भांडणे उकरून मारहाण करायला सुरुवात करे. आई-वडिलांच्या समोर असे होऊ नये म्हणून मी खूप काळजी घेत असे. पण तो मुद्दाम त्यांच्यासमोर भांडण उकरून काढे.माझे आई-वडील मध्ये पडले तर त्यांच्या अंगावर मारायला धावून जाई.माझ्या बहिणीशी असलेल्या संबंधामुळे त्याने संपूर्ण घरावर दहशत निर्माण केली होती.

सुमीला हा प्रसंग आठवून हातापायात कापरे भरले.

एकदा मी धोत्रा येथे शाळेत असताना, रस्त्यात अज्ञात वाहनाचा माझ्या वडिलांना धक्का लागून ते पडले. त्यात माझ्या वडिलांचा पाय फ्रॅक्चर झाला. घरी आल्यानंतर मला ही परिस्थिती कळली. त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. तिथे वय जास्त असल्यामुळे ऑपरेशन करत येत नाही असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना बँडेज वगैरे करून सात आठ दिवस हॉस्पिटलला राहावे लागले.त्यावेळी नवरा माझ्यासोबत हॉस्पिटलला यायला तयार नसल्यामुळे मी बाळाला त्याच्याजवळ घरी ठेवून हॉस्पिटलला बाबांचा डबा घेऊन पायी जात असे. दवाखान्यात बाबांजवळ माझी आई होती. एक दिवस मी बाळाला नवर्‍याजवळ देताना तो म्हणाला बाळाला हॉस्पिटल ला सोबत घेऊन जा मी सांभाळणार नाही . त्यावेळी बहीण तिच्या कामावर आणि छोटी शाळेत गेली होती. मी डोळ्यात पाणी आणून मुलाला कडेवर घेऊन तीन किलोमीटर पायी चालत हॉस्पिटलला गेले. घरी त्याने मुद्दाम एकांत निर्माण केला होता. शेजारची अकरावीत शिकत असलेली मुलगी एकटी बघून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.तीने यातून कशीबशी सुटका करून घेतली व आम्ही घरी येईपर्यंत ती तीच्या मैत्रिणी कडे थांबली. सायंकाळी मी घरी आले तेव्हा ती मुलगी आणि माझी बहीण यांनी मला तो प्रसंग सांगितला . माझा नवरा डोळे वटारुन माझ्याकडे पाहत होता. तो बहुतेक मला मारण्याच्या तयारीत असावा असे दिसत होते. तरीसुद्धा मी हे अतिशय घाणेरडे ऐकून संतापले,मन अत्यंत दुःखी झाले . अशा अवस्थेत मी त्याला बोलण्यासाठी तोंड उघडले तोच, तो अत्यंत निर्लज्जपणे म्हणाला
मी तुझ्यासमोर पन्नास बायकांना…. करतो तू काय करशील?
एवढा नीच , बेशरम आणि चरित्रहीन माणूस माझ्याच नशिबात का?
अशा विचाराने मन विचलित झाले. मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण बाळाकडे आणि म्हाताऱ्या आई-वडिलांकडे बघून मन घट्ट करून हा कडू घोट गिळला.मी जर आत्महत्या केली तर माझ्या आई-वडिलांना किती दुःख होईल या विचाराने फक्त जिवंत राहिले. अचानक सुमीच्या डोळ्यातून अश्रु बरसले .
अशाप्रकारे सात-आठ महिने आईबाबांच्या घरी राहतांना फार वाईट मनस्थितीत दिवस काढावे लागले. त्यानंतर इथेच मला या नोकरीसाठी मुलाखत पत्र आले. आणि मुलाखत होऊन नियुक्तीपत्र मिळेपर्यंत आम्ही इथेच राहत होतो. त्या वेळी माझी बहीण माझ्या सोबत चांगली वागायची, सहानुभूती दाखवायची. मी नवऱ्याकडून दुखावली असल्याने मला तिचा आधार वाटायचा. पण त्याच्या समोर त्याच्याविरोधात ती कधी काही बोलली नाही. तिने कधीही माझ्या अत्याचाराबद्दल एका शब्दाने त्याला हटकले नाही .जेव्हा मला नोकरीच्या ठिकाणी जायची वेळ आली तेव्हा माझ्या वडिलांच्या राहण्याविषयी तिला विचारले असता, ती म्हणाली
अरे ते काय माझे वडील नाहीत काय? तु जा निश्चिंतपणे .त्यांची काळजी करु नको.
हे ऐकून मला बरे वाटले. आई मला सोडायला बस स्टॅन्ड पर्यंत आली होती. तिला सोडताना माझ्या डोळ्याच्या धारा थांबत नव्हत्या आणि तिच्या सुद्धा….

क्रमशः

पुढील भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/१२-गुंता
कथा आवडल्यास like,share करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!