सुमीच्या हृदयाच्या अंधाऱ्या कोठडीत आठवणींच्या अनेक गाठोड्यापैकी एक गाठोडे हाती लागले. त्याचा एक एक पदर उलगडू लागला. सुमीला आठवले , माझी बहीण माझ्या आई सोबत वाद घालते आहे. मी कानोसा घेतला. नक्की काही कळले नाही पण बहिणीचे काही शब्द कानावर पडले,
तू मला शाळेत का घातले नाहीस? तुझ्यामुळे मी अडाणी राहिले . तू मला गावी सोडून शहरात राहायला आली आणि मी कसे जगले याची तू पर्वा केली नाहीस.
मी समजायचे ते समजले. यापूर्वी अनेक वेळा या विषयावर वाद झालेला होता.
झाले असे की पूर्वी माझे आई वडील माहूर या रेणुका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या गावापासून दहा किलोमीटरवर असलेल्या गावात राहात असत. घरात माझे आई, बाबा, आजी, काका व आम्ही दोघी बहिणी असे सहा जण राहत असू. शेजारी चुलते, चुलत आत्या व इतर आप्तपरिवार राहत असे. सर्वांची उपजीविका शेतीवरच अवलंबून असे.त्यावेळी सततच्या दुष्काळामुळे, कधी जास्त पाऊस येऊन ओला दुष्काळ तर कधी कमी पाऊस येऊन कोरडा दुष्काळ पडून अन्नधान्याचा तुटवडा पडे, त्यामुळे उपासमारीची वेळ आली होती.
घरोघरी केवळ अंबाडीच्या भाजी वर दिवस काढावे लागत होते. मुठभर ज्वारीचे पीठ मिळणे दुरापास्त झाले
.अशावेळी मी जवळपास एक वर्षाची असताना माझ्या आईवडिलांनी उपजीविकेसाठी शहरात येण्याचा निर्णय घेतला. माझ्या बहिणीला त्यांनी सोबत आणण्याचा प्रयत्न केला पण ती घर सोडून येण्यास तयार नव्हती .त्यामुळे आजी आणि माझी बहीण घरी राहिल्या. तत्पूर्वी काका घर सोडून निघून गेले होते .अशावेळी माझ्या बहिणीने खूप वाईट दिवसात गुजराण केली असे ती नेहमी सांगत असे.
माझे आई-वडील इथे शहरात आल्यानंतर त्यांना खूप संकटांना तोंड द्यावे लागले होते. इथे ना राहण्याचे, ठिकाण ना कामाचा पत्ता. अशावेळी त्यांनी जो संघर्ष केला त्याला तोड नाही. बाबांनी कसेतरी काम मिळवून भाड्याने खोली केली. त्यांना स्थिरस्थावर होण्यास वर्षाचा काळ लोटला .त्यानंतर त्यांनी आजीला व बहिणीला इथे आणले. सर्वजण कामावर गेल्यानंतर आजी मला सांभाळत असे. त्यावेळी संघर्षाचा फक्त जिवंत राहण्यासाठी जगणे हा एवढाच उद्देश होता.
माझ्या बहिणीचे लग्न तिच्या वडिलांनी त्यांच्या घरी ठरवले असल्याने तीला ते त्यांच्या गावी घेऊन गेले होते. माझे आई-वडील तिच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी वेळेवर गेले होते .अजूनही मला फक्त जमिनीवर अक्षदा पडल्याचे आठवते कारण माझ्या सभोवती सर्व झाडासारखे उंच उंच माणसे उभी होती त्यामुळे मला समोरचे काही दिसत नव्हते.त्या वेळी माझे वय चार ते पाच वर्षांचे असावे .
या सर्व घटनांमुळे माझ्या बहिणीला शाळेत घालने जमले नसावे. जेव्हा-जेव्हा माझी बहीण शाळेचा विषय काढून वाद घाली ,माझी आई हातबल होउन अपराधी चेहऱ्याने तिच्याकडे पाहत राही. ती काही बोलू शकत नसे. जिथे पोट भरणे व जिवंत राहणे कठीण होते, तिथे शाळेत मुलांना घालणे दुरापास्तच होते. हे तिला कळत होते. पण मी शिकायला हवी होती . असे तिला खूप वाटे. त्यानंतर तिची इच्छा बघून मी तिला मराठी मुळाक्षरे व पुढे मराठी लिहिणे, वाचणे घरी शिकविले. त्यामुळे ती थोडेफार लिहु व वाचू शकत होती.
“माझी आई ” सुमीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. किती सोशिक! किती कष्ट सोसले त्या माऊलीने! तिला आतून गलबलून आले. नकळत डोळ्यातून अश्रूंच्या धारा गालांवरून ओघळू लागल्या .माझ्या आईनेच केव्हातरी सांगीतलेले मला आठवले, तिची आई तिच्या जन्मानंतर वर्षाच्या आतच गेली.विनाआईची पोर वडिलांनी सांभाळली. सहा वर्षाची असताना तिचे लग्न लावून दिले. सासरी गेल्यावर सासू सासरे खूप मायाळू मिळाले.सासु दररोज अंघोळ करून द्यायची, वेणीफणी करून जेवू घालून खेळायला पाठवायची .खेळताना कोणी मारले ,धाकले तर तिची सासू तिची पाठराखण करी . असे ती सज्ञान होईपर्यंत चालले .त्यानंतर मात्र तिचे कष्टाचे दिवस सुरू झाले.
भल्या पहाटे चार वाजता उठून उद्याच्या जेवणाकरिता जात्यावर पीठ दळावे लागे. त्यानंतर सडा-सारवण भांडी स्वयंपाक पाणी, कपडे धुणे इत्यादी कामे करावी लागत. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे दिवसभर राबावे लागे. जरा उसंत म्हणून नाही. दरम्यान माझ्या आईचे चार अपत्यांपैकी तीन अपत्य चार ते सहा वर्षाचे होऊन गेले .त्यामुळे रडून-रडून तीची वेड्यासारखी अवस्था झाली. सकाळी दळताना तिच्या जात्यातून जसे पीठ पडायचे तसे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायच्या.
ती शरीराने काम करायची पण मनाने ती संसारात कुठेच नव्हती. त्यामुळे एक दिवस तिच्या नवऱ्याने अचानक दुसरी बायको घरी आणली .माझ्या आईच्या सासू-सासर्यांनी ते जिवंत असेपर्यंत त्या दुसऱ्या बायकोला घरात प्रवेश दिला नाही .परंतु ते दोघेही गेल्यानंतर मात्र तिच्या नवऱ्याने तिला हाकलून लावले व दुसऱ्या बायकोसह घरात प्रवेश केला. माझी आई माझ्या बहिणीला सोबत घेऊन तिच्या माहेरी राहायला आली.कालांतराने माझ्या वडिलांसोबत तिचा विवाह लावून देण्यात आला व ती आपल्या मुलीसह माझ्या वडिलांकडे आली.
अशा रीतीने ती माझी सावत्र बहीण झाली. पण माझ्या वडिलांनी किंवा घरच्या कुणीही सदस्याने तिला सावत्रपणाची, परकेपणाची जराही जाणीव होऊ दिली नाही. मी सुद्धा तिला सख्खी बहीण मानत आली. सावत्र हा शब्द कधीही मनाला शिवला नाही. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या बहिणीने मला तेल मालिश करून तिच्या पायावर न्हाऊ घातले असे ती सांगायची. घरातील हलाखीची आर्थिक स्थिती असल्याने माझ्या आईने कधी दुसऱ्याच्या घरची धुणी-भांडी ,कधी लाकडाच्या मोळ्या विकणे, कधी चणे-फुटाणे, फळे विकणे इत्यादी कामे केली. मी सुद्धा तिच्या याकामी तिला मदत करत असे.
माझ्या बहिणीच्या लग्नानंतर एखाद्या वर्षांनी माझे जीवन बदलून टाकणारी घटना घडली. होय ! माझ्या वडिलांनी मला शाळेत घातले. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. त्यासाठी माझ्या वडिलांचे जेवढे उपकार मानले पाहिजे तेवढे कमीच आहेत .तो काळच तसा होता मुलगी जरा मोठी झाली की तिला घरगुती कामाला लावत आणि त्यानंतर मजुरीला पाठवत.
दुष्काळ ,गरिबी ,अन्नधान्याचा तुटवडा , वेठबिगारी,कामाचा योग्य मोबदला न मिळणे इत्यादी अनेक कारणे होती. मुलींना आणि तेही गरिबांच्या मुलींना शाळेत शिकायला मिळणे हे तर कठीणच होते .त्या काळात माझ्या वडिलांनी मला शाळेत घातले. मी त्यांचे एकमेव अपत्य होते.अभावाचे जगणे तर होतेच पण वडिलांनी कधीही मला रागावले किंवा हात उगारला असे आठवत नाही
.रविवारी वडिलांना सुट्टी असे त्या दिवशी वडील मला पाटीवर अ आ इ ई…. अगदी वळणदार अक्षरे गिरवायला शिकवित असत .मला पण शिकायला खूप आवडे. माझ्या पहिल्या वर्गाची शाळा, शाळेच्या समोरचा पिंपळाच्या झाडाखालचा पार आणि पारा वरील आमचे खेळ ,नदी का पहाड, मामाचे पत्र हरवले ,लगोरी इत्यादी.वर्गातील सामुहिक बे चे पाढे म्हणण्याची पद्धत ,सर्वांचे अजूनही सुरीच्या पुढे जसेच्या तसे चित्र उभे राहिले. एका चष्मीस मुलाचा ७० चा पाढा म्हणतांना एकाहत्तर मधील ह चा जोर देऊन केलेला उच्चार आठवला आणि सुमीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले .किती सुंदर होते ते दिवस..
सुमी रोज सकाळ झाली की शाळेची वेळ केव्हा होते याची वाट बघायची. न चुकता रोज शाळेत जायची .शाळेत काही लागायचं नाही तिला. शाळेतील इतर मुले मुली गणवेशात यायची, दप्तर घेऊन यायची पण मी मात्र रोज त्याच फाटक्या मळकट कपड्यात, हाती फक्त पाटी व लेखणी . शिक्षक मला याबाबत कधी काही बोलले नाहीत .वर्गात शिक्षक जे शिकवायचे पाठ व्हायचे कारण पुस्तक वगैरे काही नव्हते. अशा रीतीने माझे शिक्षण सुरू झाले. शिक्षणात माझी प्रगती चांगली होती. वर्गात प्रथम क्रमांक यायचा. त्यामुळे निकालाच्या दिवशी बक्षीस मिळायचे. यामध्ये कोऱ्या वह्या, पेन, पेढ्याचा डबा इत्यादी वस्तू मिळायच्या.त्याचे अप्रूप वाटायचे. नवीन वह्या बघूनच खूप आनंद व्हायचा. …..
क्रमशः
https://marathi.shabdaparna.
कथा आवडल्यास नक्की Like,Share करा.
तुमचा प्रतिसाद आमचे प्रोत्साहन.
प्रिय वाचक,लेखक तुम्हीही लिहा.आणि मानधन मिळवा.
सुमीची नाव धक्क्याला लागतेय हळूहळू.
छान
छान
छान कथा