आठवणीतील चिंब रात्र पाऊसकथा
आठवणीतील चिंब रात्र पाऊसकथा

आठवणीतील चिंब रात्र पाऊसकथा

आठवणीतील चिंब रात्र पाऊसकथा

एक नामांकित , सुरेख लिहिणारी प्रसिद्ध लेखिका सुनयना आज कमालीची अस्वस्थ झाली होती . बाहेर अंधार झाला होता त्यात लाईट पण गेली होती. मेघ दाटून आलेले होते , पाऊस आज हजेरी लावणारच यात शंका नव्हती. तिने हलकेच खिडकीचे दार उघडले आणि बाहेरच्या कवडशाचा स्वच्छ प्रकाश तिच्या डोळ्यावर चमकला .
दाटून आलेल्या मेघा सारखीच तिची अवस्था बेचैन झाली होती . तिने चहाचा कप हातात आणलाच होता , ती खिडकीपाशी आरामखुर्चीत विसावली.
रात्रीचे साडे सात वाजले होते. ढग दाटून आल्याने आज चंद्र चांदण्या ही सुट्टीवर गेल्या होत्या . चहाचे घोट घेता घेता तिच्याही मनातले मेघ दाटून यायला सुरुवात झाली. आणि बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला.
आपल्या संसारात रमलेली चाळीशीतली सुनयना, शब्दांशी तिची प्रचंड मैत्री . वय अर्ध सरलं तरी मन ताजंतवानं होतं . पाऊस यायला लागला म्हणजे तिला अस्वस्थ वाटायचं, कारण या पावसाशी तिचं एक वेगळं घट्ट नातं आणि आठवणी होत्या . आज याच चिंब पावसात ती आठवणीच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती. चहाचा शेवटचा घोट संपला, तसा पावसाचा जोर आणखी वाढला. तिच्याही मनातले मेघ बरसायला सुरुवात झाली होती. एक थंडगार शिडकावा मनाला स्पर्शून गेला तसं ती मनोमन मोहरली . पावसाचा एकच थेंब पण ‘त्याच्या’ स्पर्शासारखा भासला तिला अन् मन रोमांचित झालं. ती पावसातली चिंब रात्र तिला आठवली.
खिडकी बाहेरचा पाऊस आत येतो म्हणून दारं-खिडक्या बंद करता येतात पण मनात दाटलेल्या आठवांच्या पावसाचे काय करू ?
कोणती दारे लावू ?
कोणत्या खिडक्‍या बंद करू ?
मनाच्या किती साऱ्या गोड आठवणी फेर धरून नाचत होत्या. लगेच भोवती जणू मोरांनी पिसारा फुलवला आहे. खरं तर या आठवणींना कित्येकदा तिने बजावलं होतं.
नका ग येत जाऊ अशा अवचित ,
त्रास होतो मनाला . पण छे ! उलट त्याच म्हणाल्या, ‘आमच्या येण्यानं तर तू सुखावत असते ना ! मग अवचित कशाला म्हणतेस ? तुझ्या आनंदासाठी तर आमचे सारे खटाटोप.’
पावसात मध्येच वाऱ्याने ही प्रवेश केला. तो ही तिच्या गालावरुन हळूच फिरून गेला सोबत पावसाचे तुषार आणले होते त्याने . ती आठवणीतून भानावर आली आणि तिला आठवला सारा जीवनप्रवास आणि ती पावसातली चिंब रात्र…

तसा तो तिला भेटला होता खरा , पण जीवनातल्या अशा वळणावर जिथुन कोणीच माघारी फिरू शकणार नव्हतं, आणि ही वास्तवता दोघांनी स्वीकारली होती. दोष कोणाचाच नव्हता फक्त नियती रुसलेली होती त्यांच्यावर.
आता ती फक्त त्याच्या आठवणीत जगत होती .
देवाशीष उंचापुरा राजबिंडा योग्य वयात तिला आवडला होता . खूप अनुरूप होते ते दोघे एकमेकांसाठी .
अशातच त्याला आर्मीत जाण्याची संधी मिळाली आणि तो मागे हटणार नव्हता पण सुनयना चे सुख आई-बाबांना लग्नानंतर दहा वर्षांनी लाभले होते म्हणून ते तिला आपल्यापासून दूर पाठवायला तयार नव्हते . ती एकटीच असल्यामुळे आई-बाबांची जबाबदारी तिच्या वरच होती. कर्तव्य आणि प्रेम यातून तिने कर्तव्याला प्राधान्य दिले होते. विचारपूर्वक केवळ भावनेच्या भरात निर्णय न घेता तिने हे समर्पण केले होते .
पुढे आई-बाबांकडे पाहता येईल अशाच दृष्टीने तिने एक चांगल्या स्थळाला संमती देऊन संसाराची सुरुवात केली. पाहता पाहता या गोष्टीला २५ वर्षे उलटली .
पण देवाशिष च्या आठवणी तिच्या मनात होत्याच खोलवर रुतलेल्या.
सुनयना नावाप्रमाणे सुनयनी, सुकेशिनी , उत्तम कवियत्री उत्तम लेखिका. तिच्या प्रत्येक लिखाणावर त्याचा उस्फुर्त प्रतिसाद असायचा .
पाऊस होऊन बरसणाऱ्या प्रत्येक कवितेचा तो प्रचंड प्रेमवेडा .
एकदा अशाच पावसात त्याने तिच्या कविता ऐकण्याचा हट्ट धरला होता .
ही गोष्ट तिला आठवली आणि ती बेचैन झाली . लाईट मधेच चमकून क्षणभर थांबून विजेच्या कडकडाटाने पुन्हा गेली . तिच्या मनातल्या त्या प्रेमाच्या तारांची हीच अवस्था होती, लकलक हलत होत्या पण तुटणाऱ्या नव्हत्या . उलट झोके घेत होत्या आठवांच्या हिंदोळ्यावर ….!
त्या दिवशी पावसात तिला देवशीष चा फोन आला.
‘ सुनयना पाऊस येतोय , जाऊ या का बाहेर’
‘ आज तुझ्या चारोळ्यांचा पाऊस बरसू दे आणि हो मीही आज चारोळी म्हणणार आहे , तुझ्यासाठी ‘
त्यादिवशी शेवटचेच ती त्याला भेटून तिचा निर्णय सांगणार होती .
ती त्याला घट्ट बिलगून गाडीवर बसली आणि पावसाचे थेंब गालावरून ओघळू लागले तशी ती शहारून गेली हळूच ती त्याच्या पाठीवर विसावली .
मध्येच रस्त्यातल्या टपरीवरच्या चहाची सोबत तर हवीच. चहाचा आस्वाद घेत पावसाचा आणि एकमेकांचा आनंद. पुढे एका निसर्गरम्य ठिकाणी तो तिला घेऊन गेला. तशी ती पावसाच्या साक्षीने शेवटची त्याच्या बाहुत विसावली, पहिल्या चारोळी चा पाऊस त्यानेच पाडला…..

‘बंद डोळ्यातली स्वप्नं माझी
वास्तवाची वाट बघतय
तुझ्या प्रेम पावसाने सये
मन माझं न्हाहुन निघतय’….

आजवर त्याची पहिलीच चारोळी, पण मनात घर करून आहे . नकळत तिचे डोळे पाणावले पण आता तिला फक्त त्याला न दुखावता या वेळेचा आनंद घ्यायचा होता.
ती पुन्हा त्याच्या कुशीत विसावली . पावसाचा गारवा आता चांगलाच जाणवत होता आणि तिच्या मनात चांगलीच उभारी आली होती. तिला शब्द सुचले.

एक सर पावसाची आली
शब्दांचा पाऊस पाडून गेली
वाटा साऱ्या स्वच्छ धुऊन
कवितेच्या गावा घेऊन गेली
तुझा स्पर्श अन् थेंब पावसाचा
गोड गारवा स्पर्शुन गेला
नाद पैंजणाचा सख्या
मनात वादळ उठवून गेला…..

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा , मग पुढे !
अशी तिची अवस्था झाली होती . एक सुखाचा क्षण पण प्रेमाचा पाऊस बरसून गेला होता . आता ती आयुष्यभर त्याच्या आठवणीत जगण्यास तयार होती . पावसाच्या सरीवर सरीवर सरी बरसाव्यात तसा त्याचा प्रेमाचा वर्षाव तिला जगण्याची शिदोरी होती जणू.

सारे तिला आज आठवत गेले तसे तिच्या डोळ्यातला पाऊसही बरसून गेला आणि मन हलकं झालं.
 ती भानावर आली आणि पुन्हा खिडकीचा दरवाजा हवेने उघडला गेला तेव्हा तिला जाणवला प्रेमाच्या मातीतला सुगंध दरवळत होता आठवणीच्या हिंदोळ्यावर चिंब पावसातली रात्र होऊन……!
        सौ. प्रिया देशपांडे…..

7 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!