खरा मित्र-मराठी मित्रकथा
सौ. प्रिया….
नांदेड
श्रीकांत ने बाबांचे नाव आज हास्यक्लब मध्ये नोंदवले आणि उद्यापासून सकाळी सहा वाजता हास्यक्लब मध्ये जाण्याची विनंती केली.उद्या पहिल्याच दिवशी तो बाबांना सोडवायला जाणार होता.हे ऐकताच काकांनी नुसतीच मान हलवली.
७५वर्ष असलेले गजानन पांडे काका.अतिशय शांत व्यक्तिमत्व.कचेरीत होते,आता रिटायर्ड होऊनही बरीच वर्षे झाली होती.काकूचे कॅन्सर ने ४वर्षांपूर्वी निधन झाले.आणि काका एकटे पडले होते.अबोल झाले होते,आयुष्यातला महत्वाचा गडी बाद झाला होता.एकटेपणा जाणवत होता त्यांना.कशातच मन रमत नव्हते.
श्रीकांत त्यांचा एकुलता एक मुलगा.तो त्याच्या संसारात चांगला स्थिरावला होता.त्याची बायको मोहिनी एका कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होती.आणि श्रीकांत पण इंजिनिअर होता.लग्नाला १२..१३ वर्ष झाली पण अपत्य नव्हतं म्हणून हे दाम्पत्य दुःखी होत.आणि पत्नी शोकाने गजानन काका दुःखी असायचे.असं एकूण ३ माणसाचं कुटुंब पण सुखापासून दूर होतं.
या वयात शारीरिक त्रास नको,मन प्रसन्न राहावं म्हणून श्रीकांतने काकांना हास्यक्लब join करून दिले होते.असं हे अहमदाबाद चं एक कुटुंब.गावाकडची सारी शेतीवाडी विकून इथेच स्थायिक झाले होते.पैसा, घरदार,सोनंनाणं, सारं मुबलक पण सुख आणि समाधान या पासून वंचित.जीवनात साऱ्याच गोष्टी मनासारख्या होत गेल्या तर सुख दुःख नावालाही उरणार नाही.
तसं श्रीकांतचाही जन्म खूप उशिरा झाला होता. त्याची आई सुमातीकाकू खूप नवस सायास ,उपास तापस करायची,डॉक्टरांच्या सल्ल्याने शेवटी लग्नानंतर ७-८वर्षाने श्रीकांतचा जन्म झाला होता.
एकूणच सारं बेचव आयुष्य झालं होतं.काका नेहमीप्रमाणे लवकर उठले.तसे ते रोजच ५वाजता उठतं. जवळपास फिरून येण्याचा त्यांचा नित्य दिनक्रम असे.
सुनबाई मोहिनी नोकरीची.होतील ती आणि जमतील ती कामे काका स्वतःच करत असत.मोहिनी लाही त्यांच्या कामात लुडबुड नकोच असायची.आलेले दिवस घालवायचे असेच एकूण काकांचे जगणे झाले होते.
श्रीकांतही सकाळीच जिमला जात असे…जात जाता तो काकांना हास्यक्लब ला सोडणार होता.
“बाबा, निघूया का?”
श्रीकांत बोलला.
“अरे, नको रे.असं हास्यक्लबला जाऊन कुठे बळजोरीने हसल्यावर काय होतं?” काकांनी नकार दर्शवला.
“बाबा,चला तर,mood change होईल,fresh वाटेल.तुमच्या वयाची कितीतरी मंडळी येतात तिथं.गप्पामध्ये मित्र-मंडळी वाढेल.मन रमेल तुमचं
म्हणत त्याने काकांना शेवटी घराबाहेर काढलेच.
एका आलिशान कॉम्प्लेक्स समोर श्रीकांतने गाडी थांबवली….गाडी पार्क केली…घरापासून अवघ्या 10 मि. अंतरावर हे हास्यक्लब होतं…. तसं काका बोलले,”मी रोज फिरत फिरतच येईल रे बाबा,जवळच तर आहे…माझी रपेट सुद्धा होईल छान…!!”
जेमतेम 10 पायऱ्या चढून वर गेले की मोठा प्रशस्थ हॉल होता….5-50 मंडळींचा आवाज कानात घुमला हा$$$$$हा$$हा$$हा….
काकांचा चेहरा असा होता की,असं कुठं उसनं हसू विकत घेतल्याने जीवन बदलते का?उगाच काहीतरी…इति…
श्रीकांतने तिथल्या काही एकदोन व्यक्ती ची भेट घालून दिली आणि म्हणाला,”बाबा,मी तुम्हाला 2 तासाने घ्यायला येईल,इथेच थांबा हं….!!
काकांनी पुन्हा मान डोलावली…
राणे सर,तिथले प्रमुख…त्यांनी काकांची स्टेज वर बोलावून अचानकसर्वाना ओळख करून दिली,
आणि आजचा दिवस फक्त तालीम बघण्याची सूचना राणे सर ने काकांना केली…साऱ्यांचे चेहरे उंसने हसताना पाहून अचानक काकांना पत्नीची आठवण झाली,ती नेहमी म्हणायची,’नशिबाचे भोग कितीही असोत,ते हसतच भोगावेत,रडत बसल्याने मार्ग निघत नाहीत,त्यापेक्षा हसत भोगले तर वेदना दूर पळतात… आणि शरीराला झळ पोहोचत नाही..
.’सुमातीची हि वाक्य आठवून खरंच तिच्या बोलण्यात तथ्य होतं, हे काळानुरूप काकांना खरं वाटू लागलं…इथल्या वातावरणाचा परिणाम की काय?पण त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा इतरांकडे पाहून हसू फुलले होते…2 तास कधी सरले, कळलेच नाही…श्रीकांत पुढ्यात येऊन उभा राहिला पण काकांच लक्षच नव्हतं,त्यानं बाबा हाक मारताच ते भानावर आले..
.ते निघताच त्यांच्याच वयाची मंडळी त्यांना येऊन चिकटली…राजूरकर,साने काका,कुलकर्णी,काळे,दिवाण सारे एकत्र जमा झाले….त्या प्रत्येकाला भेटून काकानाही छान वाटले…दिवसाची सुरुवात कशी छान झाली होती…एक नवीन विश्व पाहायला मिळालं होतं…रोजच्या रटाळ जीवनात सुद्धा काहीतरी नवीन करता येतं, हे काकांच्या लक्षात आलं होतं..!!
आता दुसऱ्या दिवशी ची ओढ काकांना लागली होती….आजही श्रीकांतने आग्रहाने गाडीतूनच काकांना क्लब ला सोडला होते….त्यांची नजर वयोमानाने कमजोर झाली होती…..आपण त्यांना नातवाचे सुख देऊ शकलो नाही,हे शल्य श्रीकांतचा मनात होते,यातून बाहेर काढण्याचा त्याचा हा प्रयत्न होता…आता हळूहळू काकांच्या सर्वांशी ओळखी झाल्या होत्या….हास्यक्लब एक त्यांचं कुटुंब बनत चाललं होतं…
.काका या सर्वा मध्ये छान रमले होते….त्यांना गायनाची आवड पूर्वीपासूनच होती..एका नवीन मित्राच्या कुलकर्णी च्या सोबतीने ते मंदिरात भजन किर्तनास जाऊ लागले…हे सारे पाहताना श्रीकांतचा आता मनमोकळा श्वास घेत येत होता…. त्याच्या डोक्यावरचे ओझे हलके वाटतं होते…!!
एके दिवशी काका हास्यक्लब मधून येण्यापूर्वी घरी कोणीतरी आलेले होते….काकांनी घरात पाय ठेवताच आवाज ओळखीचा वाटत होता,पण लक्षात येत नव्हते….काकांना लवकर ओळख पटली नाही,वयोमानाने नजर कमजोर झाली होती…मेंदूला ताण दिला तसे लक्षात आले ,”अरे,तू तर माझा वर्गमित्र विनायक पाटील….आडनाव प्रमाणे आपल्या दोघांचे नंबर परीक्षेला जवळ जवळ म्हणजे एकामागे एक यायचे.
आणि तू माझा जवळपास 40 मार्कचा पेपर पाहून सोडवत होतास,बरोबर ना?पण तू,अचानक इथे कसा??”
श्रीकांतने आता बोलायला सुरुवात केली….”बाबा,यांचा मुलगा माझ्यासोबत काम करतो,एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही यांच्या घरी गेलो तेंव्हा गप्पा रंगात आल्या आणि तुमची ओळख यांनी सांगितली… तुमची आस्थेने विचारपूस केली…मी तुमच्या बद्दल सांगितलं..आणि त्यांनीच तुम्हाला हास्यक्लब मध्ये पाठवण्याचा सल्ला दिला…
आणि मी दुसरेच दिवशी तुमचे नाव हास्यक्लब मध्ये नोंदवले…एकदा घरी येऊन तुमची भेट घ्यावी अशीही विनंती मी त्यांना केली होती ,म्हणून ते आले आहेत….”त्याने साऱ्या गोष्टीचा खुलासा केला…
आता काकांचा चेहरा खुलला…खरंच मित्रशिवाय आयुष्य नाही…सोबती हरवला तरी मित्रानेच सावरले आज….विनायक एवढा उनाड मुलगा,इतका हुशार आणि समंजस कसा आणि कधी झाला त्यांना समजलेच नाही….दुसऱ्याला सावरण्या चे आत्मबळ त्याच्यात आले होते…परीक्षेत मी त्याला सावरत होतो,आज आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यानेच मला सावरले होते..मित्र कसाही असला तरी तो साथ सोडत नाही ,हेच खरे…!!
काकांनी विनायकला मिठी मारली….काकांना मनोमन आनंदी पाहून श्रीकांत मात्र मनोमन सुखावला होता….!!
आता बालपणीच्या पोटभर गप्पा झाल्याशिवाय या दोघांनाही नाश्ता नको होता…
सौ. प्रिया….
नांदेड
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://marathi.shabdaparna.in/अद्भुत
सुंदर मित्रकथा
हर एक फ्रेंड जरुरी होता है l
छान लघु कथा
खुप सुंदर लिखाण
Khupach chan
सुंदर.. लिखाण