..पावसाची संततधार होती. काळ्याकुट ढगातून विजेचा कडकडाट होत होता. समदं घर गळत होतं भिंतीला ही वल चढली होती. आता घरावर काही टाकून बंदोबस्त करणं गरजेचं होतं. नाही तर हे घर कधीही खाली बसणार हे सांगणे कठीण होते. यामुळे भर पावसात सगुणा अंगावर पाऊस झेलत माळरानावर निघाली. घर शाकारायला पळसाचा व्हरका आणायला तिचे पावलं झपाट्याने पडत होते. पाऊस तर आभाळ फाटल्यावाणी कोसळत होता . तिने पटपट झावळ्या कापल्या. मोठा भारी भारा बांधला. तो जोर लावून उचलला. आधीच ओली त्यात पाऊस मग काय सांगायलाच नको. कशी बशी घर गाठल. पायावर पाणी घातलं. कापड बदलायला घरात दुसरी कापड कुठं होती. तिने अंगावरच जुन्यार करकचुन पिळून झडकल. घरात खाटवर शिरपा पहूडला होता. खाटत तो दिसतही नव्हता. सगुणा तशीच त्याच्याजवळ गेली. आज थोडा अधिकच गळाला होता शिरपा. तिच्याकडे अगतिक होऊन बघत होता. त्याने आयुष्यात तीला काही असं दिलच नव्हतं. कारण परिस्थितीच तशी होती. ती त्याचा हात हातात घेतला आणि हलकस हसत म्हणाली….. “चहा करू का गुळाचा.”… त्याला गुळाचा चहा फार आवडायचा. तो आनंदला… कारण तोच एकमेव मार्ग होता भूक भागवण्याचा…कमावणारी फक्त सगुणाच. बाकी सारी खाणारी..त्याला चहा देऊन ती छप्पर शाकारायाला खापरावर गेली. शेवटची डहाळी तिने छप्परावर टाकली. तितक्यात बबन्या ओरडतच बाहेर आला…. “आई.. आई … लवकर ये… बघ बा कसा करतोय.? ” सगुणाच्या पायातला जिवच गेला. ती शिरपाला तळहातावरचा फोड जपावं तस जपत होती. ती धावतच त्याच्याजवळ गेली. तिचा लई जीव होता शिरपावर…. तो कष्टाने श्वास घेत होता… पाऊसाचा जोर आधिकच वाढला… सगुणाची नाव पावसाच्या पाण्यात वाहून जात होती… तिच्या हातात तो शेवटचा श्वास घेत होता… बबन्या अन शारदा पायत्याला बसून रडत होती.. संध्याकाळ होत आली तशीच भावकीची मंडळी जमा झाली. सगुणा आता थोडी सावरली कारण आता सांगायलाच पायजे… नाय सांगितलं तर ही भावकी माझं नाक कापून इज्जतिची धिंडवडे साऱ्या गावभर काढतील. तिन साऱ्या भावकीला शिरापाच्या शवसमोरच बसायला सांगितलं… आणि आपण तीन महिन्याची पोटुशी असल्याचे सांगितलं..तिची चुलत सासू दिवस मोजून सगळया भावकीला सांगितलं कि हितन सहा महिन्यात ही बसायला पायजे.. सगुणाचा जीव भांड्यात पडला…शिरपाच्या जाण्याचं दुःख आता जबाबदारी झाली होती. कसा का असना पर धनी असावं असं तीच म्हणणं होत.. पर कोणाला सांगतिया कर्माचा भोग भोगावच लागत.. दिवस जात होते सगुणाच पोट चांगलच दिसू लागलं.. पर तिला याची भीती वाटत नव्हती.. इतर कधी तिची भाऊकी सोबत केली नाही पण या बाबतीत सारे तिच्या बाजूने होते…. सगुणाचे दिवस भरत येत होते. ती चिमणी सारखं सार जमवा जमव करत होती.. दाइ तिची दोस्तीन होती… तिनेही तिला मदतीचा हात म्होरं केला. तशी सगुणा गावाच्या तोंडातच होती. फार कष्टाळू होती ती.. मोल मजुरी, धुण भांडी, भाजीपाला विकण असो कोणतही काम ती करायची… सगळ्याच्या येळकाळाला धावायची.. दाइ व सगुणा सारख्याच वयाच्या अन दोघीही विधवाच. समदुःखी असल्याने अधिक जमायचं…सगुणा नेहमी म्हणायची तिला “अक्का आता कस व्हायचं हो…. मला कायतर खायला द्या म्हणजे हे लेकरू जाईल पडून. अन म्या मोकळी होईल..”. पर अक्का तिची समजूत काढायची अन म्हणायची “पाप लागत ग सगुणा…”. दोघी सोबतच कामाला जायच्या… त्या दिवशी सगुणा थोडं गळली होती.. अक्का न ओळखलं कि आज ना उद्या ही बया बसते… आणि तसच झालं…. रात्री उशिरा बबन्या अन शारदा अक्काला बोलवायला आले… अक्का सगुणाचाच इचार करत होती. ती पटकन चप्पल न घालताच शारदा सोबत बबन्याला हाताशी धरून निघाली… गरम पाणी करून तिला प्यायला दिल. ती दाइ अक्का कोणाची कोण पर देवासारखी धावली … शारदाला आणखी गरम पाणी ठेवायला सांगितलं… घटकाभर असाच गेला… थोड्याच वेळात बाळाचा आवाज आला. त्याही परिस्थितीत सगुणान विचारलं.. “अक्का काय झालया ” तिने तो मासाचा गोळा धडप्यान पुसला… अन सगुणा ला म्हणाली मरत कुळाला मायबहिण झाली ग… त्या सरशी सगुणा चा चेहरा पडला. ती तशीच उठली. धडपडत जात्याजवळ गेली. अन जात्याचा एक पाळू उचलला. आणि म्हणाली अक्का आणा तिला इकडं हे जात घालून तिला मारून टाकते… इथं आमची पोट भरायचं पडलय उद्या हीच लगिन शिक्षण कस करू…. अक्कान… “नकोशी “असलेल्या नाळाच्या बुडग्याला अधिकच बिलगून म्हणाली, “अग मी पोसातो गे हिला… चार दिस दूध पाज अन धाड माह्या घरी..”. सगुणा चा जीव थोडा कळवळला…ती आई होती तिची… तिने नकोशी ला पदराखाली घेतलं अन पान्हा पाजउ लागली… सगुणाच अंतःकरण भरून आलं… दिवसामागून दिवस जात होते… नकोशी मोठी होत होती…. सगुणा ला तिचा हातभार लागत होता… कालांतरानं नकोशी च लग्न झालं… तिच्या लग्नात आईसाठी दिलेलं पोट झाकण नावाचं पातळ सगुणान दाई अक्काला दिल….. तेव्हा अक्काचे अन सगुणाचे डोळे भरून वाहू लागले… आता नकोशी हवी हवीशी वाटू लागली…
@राजश्री विभुते






सुंदर