गंगेचा नवस
गंगेचा नवस

गंगेचा नवस

प्रवास लांबचा होता . घरातील लहान थोर मंडळी अन जिवलगाची आप्तही येणार होती.फाटच्याला तांबडं फुटायच्या आत गाव सोडायला लागणार होता. म्हणून गणाबापुन गाड्या रातच्यालाच जुंपून ठिवाय लावल्या होत्या.लिंगामाय तर जायचं म्हणून ठरलेल्या दिवसापासून सगळी बांदाबांदी करीत होती.एक एक वस्तू आठवणीने ती बांधून घेत होती. आज तिचा हेत पूर्ण होणार होता. तिच्या नातवाचा नवस फिटणार होता. ती नवसाला पावलेल्या परतगंगेला नातवाला पायावर घालायला निघाली होती. सगळं घर कस गजबजल होत.सगळ्यां वाड्यात आनंदाला उधाण आलं होत. अनेक वर्ष झाली पोराच्या लग्नाला पर सुनंच कूस काही उजवत नव्हती. सगळे नवस झाले, धागे दोरे, वैद्य, हकीमही केले पर उपाय झाला नाही. मग एका गावातल्याच बाईनं सांगितलं अन म्हणाली सगळं केलंस फक्त हे बोलून तर बघ. जर झालं तर जा गंगामाईच्या भेटीला. अन नाही झालं तर मग नग जाऊस. आमची लिंगामाय लय भोळी. तिने चटदिशी मनात नवस बोलली. मला नातू झाला की आधी तुझ्या पायावर घालीन… पर नातू झाला तो मोठा बी झाला अन त्याचं लगीन बी झालं… गंगामाईचा नवस फेडायचा मात्र राहूनच गेला.

परसराम आता वीस बावीस वर्षाचा असेल. तो आजी लिंगामायचा लय लाडका. दही, दूध, तूप हे खाण्याच तर त्याला काही मापच नव्हत.बाप पहिलवान असल्याने परसरामलाही मातीत लोळावायला आवडायचं. तो ही कधी कधी चार डावं खेळायचा.गाव व पंचक्रोशीत खेळलेला एकही डावं परसराम हरला नव्हता. विजयाची लाल माती कपाळावर फासुनच फडाच्या बाहेर वाघ पडायचा.अशा ढाण्या वाघाला लिंगामाईन लग्नाची बेडी अडकवली. आणि देवदेव करता करता गंगेला दर्शना साठी जायचं. त्याशिवाय काही परसरामच्या पलंगाचा सत्यनारायण व्हायचा नाही. असं ठणकावून लिंगामायन सांगितलं. आजीची आज्ञा होती ती. मग काय घरातील सगळेच तयारीला लागले.

स्वयंपाकासाठी लागणार सगळा पुरणाचा शिधा, पाण्यासाठी दोन मोठी हांडे, शिजवायला लागणारी मोठाली भगोणे, पळे, थाळ्या, सरपण, चटया, सतरंज्या, तूप, लोणचं, तेल – मीठापासून ते मसाल्यापर्यत, अन पत्रावळी -द्रोणापासून जेवणानंतर चघळायला लागणाऱ्या पानसुपारी पर्यंत सगळी जमवाजमव झाली… तांबडं फुटायच्या आतच सगळी लेकरं उठवली, बायापोर, शेजारी, आलेली नातेवाईक असे 25-30लोक,चार- पाच बैलगाड्या, असा सगळा लवाजमा निघाला… सगळ्यां बैलगाड्या नव्या नवरीवाणी सजल्या होत्या. नाही म्हणायला परसराम अन त्याची पत्नी भागीरथी हे नवं जोडपं होतच की त्यांच्या जोडीला… पण गाड्या मात्र मस्त डुलत, डौलत चालल्या होत्या. बैलांच्या एकाच ठेक्यात होणाऱ्या हालचालीमुळे एक वेगळाच नाद वातावरणात उमटत होता. त्यामुळे सकाळची येणारी गार हवा अन हा मंजुळ घुंगरांचा गोड आवाज एक मधुर संगीत कानावर उमटवत होता. सकाळ होत होती पण डोळ्यांची कमळ मात्र विकसित होऊ पाहत नव्हती. बैलगाडीच्या पाळण्यात मिळणारा तो झोक्यांचा अनुभव एक विलक्षण आनंददायी होता.

इकडच्या तिकडच्या गप्पा चालू लागल्या.हसत खेळत, मजल दरमजल करीत बैलगाड्या अंतर कापीत होत्या. दीस चढू लागला तशी लहान पोर आईला चापळू लागली अन थोडी मोठी भूक लागली म्हणून कांगावा करू लागली. त्यामुळे पाण्याचा आधार पाहून गाड्या थोड्या वेळासाठी थांबल्या. पोरंटोरं तोंड खंगाळली अन शेजारच्या फडातून काही धांडे मोडून आणली. तसा गणाबापू त्यांच्यावर खेकसलाच. कारण त्याला ही असली लूट पटत नसे. सगळ्यांना त्यांन गाडीत हाकारलं अन गाडीवानाला गाड्या काढा रं असा इशारा केला.तश्या बैलगाड्या नागमोडी वाटणं निघाल्या. आजूबाजूला पसरलेला सगळा परिसर कसा प्रसन्न दिसत होता, सगळीकडे शेत कशी हिरवीगार बहरली होती. शेतात पीक मावत नव्हत… कुठं म्हणून काळी जमीन दिसत नव्हती, नजर जाईल तिथवर सार रान हिरवंगार. ही सारी किमया त्या गंगामायची होती. तिच गंगामाय जिनं लिंगामाईच्या पदरात नातवाचं दान टाकलं होत….

पोहचता पोहचता सूर्य डोक्यावर आला होता. काळा संक डोह परतगंगेचा समोर पसरलेला होता. बैलगाड्या मोकळ्या केल्या. सगळं सामान खाली केलं. झाडाच्या विसाव्याला राहाटी ठोकली. बायानी आधी आंघोळी उरकल्या, परसराम मात्र दुरूनच आपली नवी नवरी पाण्यात चिंब झालेली न्याहळत होता. तिचा गोरा देह कापडातूनही उन्हा -पाण्यात चमकतं होता.सगळ्याच बायका पटापटा वर आल्या. कारण स्वयंपाक करून, जेवण आटोपून घरी परतायचं होत.पोर, गडी मात्र उन्हाच्या वेळेला गार पाण्यात मस्त डुंबत होते. ती मजा काही औरच…

दोन चुली मांडल्या. मस्त पुरणाचा रसरशीत स्वयंपाक तयार होऊ लागला, भागीरथी नविन होती पण स्वयंपाकात सुगरण, म्हणून ती थोडी पुढचं होती, तिने झणझणीत कढीला फोडणी दिली, तिचं ते स्वयंपाकातील कसब परसराम चोरट्यावाणी बघतं होता. त्याच्या मनात कधी आपण घरी जातो अन कधी भागीरथीला आलिंगन देतो असं झालं होत. लग्न झाल्यापासून तो तिला एकदाही निवांत भेटलाच नव्हता. सगळीकडे कढीचा घमघमाट सुटला होता. गंगेला नैवद्य झाला… नमस्कार झाला.”चला रे बाबा पंगत बसू दया बर झटकन “लिंगामाय बोलली. तसे सगळेच झाडाभोवताल पंगत करून बसले. वाढणं झाली, रानावर केलेले पुरणाच जेवण पण त्याची सर पंचतारांकित हॉटेल मधील जेवणालाही येणार नाही इतकं चवदार अन रुचकर वनभोजन झालं होत ते… हळूहळू बायकांनी ही आपापल् जेवण आटोपलं. सगळी आवरा आवर चालू झाली, सगळं सामान, भांडे, बर्तन, चटया सतरंज्या सगळं आवरलं, गाडीवान गाडी जुंपायला लागले. तेवढ्यात” मी एक शेवटची उडी घेऊन येतो ” म्हणून परसराम डोहात उडी मारला. गणाबापु आर थांब नको जाऊ, उशीर होतोय म्हणे पर्यत हा डोहात… गाड्या भरल्या, माणसं, बाया पोर सगळेच बैलगाडीत बसले, भागीरथी ची नजर मात्र परसराम ला शोधत होती. आले कारे सारे म्हणतं असतानाच लिंगामाय जवळजवळ किंचळलीच, “परसराम कुठाय? “… तसा गण्या बापू अन दुसरी दोन तीन गडी डोहाकडे गेली… परसराम, परसराम म्हणून जोरात आवाज देऊ लागली, तसा सारा गंगेचा डोह लाटा शिवाय संत वाहत होता… तसा गणाबापु चरकला. त्यानं गाड्या सोडायला सांगितल्या. तडगी बांड चार पोर नदीत उतरली. तळाशी जाऊन शोध घेतला. पण परसराम कुठंच भेटला नाही, सगळं नदीचं पात्र खवळून काढलं पण नाही सापडला.जवळच्या गावात जाऊन कोळी लोकांना बोलावून आणलं… त्यांना शोध घ्यायला सांगितलं…. पण हे सगळं करे पर्यत खूप उशीर झाला होता. अंधार पसरला होता. रातकिडे किरकिर करीत होते.तशीच कशीतरी रात्र त्या नदीच्या डोहाच्या काठावर काढणं भाग होत.रात्र वैऱ्याची होती. मोठा बाका प्रसंग नियतीनं वाढून ठेवला होता. आता मरतकुळाला हे असलं नशिबात येईल असं लिंगामायला अन गणाबापूला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

चिमण्या किलबिलाट करू लागल्या तसा जेमतेम लागलेला बापूचा डोळा लागलीच उघडला तशी म्हाताऱ्याने डोहाकडे धाव घेतली. चहूकडे बघतो तर काय त्याचे डोळे उघडेच राहिले. नदीच्या कडेला एक मृतदेह पडलेला होता.त्याचं सार अंग फुगलं होत, जागोजागी लचके तोडलेले होते… त्याच्या सगळ्यां बांध्यावरून अन अंगावरच्या दागिन्यावरून परसराम असल्याचे स्पष्ट दिसत होत. परसरामच्या कमरेला चांदीचा करदोडा, पायात वाळ, हातात एक एक तोळ्याच्या दोन अंगट्या अन कानात बिगबाळी होती. हे बघून गणबापू ला भोवळच आली… तशी डोहाकडे हळूहळू सगळीच जमली. म्हातारी तर आसमंत कापून जाईल असा टाहो फोडून रडू लागली. गंगेने दिलेला नातू गंगेच्या पायावर घातला म्हणून आक्रोश करत होती. भागीरथी च्या तर दुःखाचा पारावरच नव्हता. तिची हळद अजून उतरली नव्हती, त्याचा पुरता स्पर्शही झाला नव्हता तिला अन तिचा सखा असा दूर देशाला व्यापाराला परत नं येण्यासाठी निघून गेला. त्याचं गंगेच्या काठावर आजूबाजूची लाकडं आणून परसरामची चिता रचली. त्याला भडाग्नी दिला. अन त्याचं गंगेत पाय धुवून जड अंतःकरणानं सगळे माघारी फिरले.गंगेनेच दिलेला नातू परत गंगेला जाऊन गंगेलाच परत देऊन लिंगामाय नुसती परत येतं होती. कालच हिरवंगार वाटणार रान आज परत येताना तिला वनव्यासारखं पेटून होरपळत होत…..

*@*राजश्री विभुते*

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Generic filters
Generic filters