पाऊस कथा-हरवले ते गवसले
भाग-१
प्रिया देशपांडे
नुकताच आषाढ संपून श्रावण लागला होता. यावर्षी मात्र पावसाने गेल्या २-३ वर्षाची कसर भरून काढली होती. अगदी घर-दार वाहून जावीत एवढा पाऊस.शेतीत केलेल्या पेरणीचे साऱ्या होत्याचे नव्हते होत होते. तर गरिबांच्या चुली चुली अद्याप पेटलेल्या नव्हत्या. त्या पेटतील की नाही याची पण शंकाच होती. सारी घर गळायला लागली होती. बसायला हातभार जागा कोरडी कुठे दिसत नव्हती.
घरात नातू शिवा जेवायला मागून सगळं घर डोक्यावर घेत होता.पण घरातल्या टोपलीत भाकरीचा तुकडा नव्हता.पोरगं रामा म्हणजे शिवाचा बाप तापीन फंफणत होता.अन बाप्या मात्र आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी काही तडजोड करून कुठं सुख गवसत का ? याच्या पाठीमागे लागला होता.
ती खाष्ट सून, ते गेलेलं वैभव,संपत्ती,अब्रू,घरात भाकरीच्या तुकड्याची रडणार, आकांड-तांडव करणारा नातू,अन तापान फंफणारा पोरगा तोही एकुलता एक..कोणत्या क्षणी त्याचा जीव जाईल सांगता येईना. त्यातून डोक्यावर परिणाम झालेली बायको सखू…पळून गेलेली..ती कोठे असेल?आयुष्यात कोण्यातरी वळणावर पुन्हा एकदा भेटेल या एकाच खुळ्या आशेला सोबत घेऊन जगणारा बापूसाहेबांचा झालेला ‘बाप्या’.
गेली २५ वर्ष गावात बापूसाहेब म्हणून रुबाबात वागणारा बाप्या आज हतबल तर झालाच होता,पण जीवनाच्या खेळात त्यानं हार पत्करली होती.एकेकाळी त्याचा रुबाब काही औरच होता.ती बागायती जमीन,शेती,ते नागवेळीचे मळे, ती नदीकाठची पणभरीत जमीन. त्याचा शेताची नावं मात्र फार मजेशीर होती.पश्चिमेकडचा भाग म्हणे ‘पैशाचं शेत’ ,उत्तरेकडचा भाग म्हणे,’रेघालीचे शेत’, पूर्वेकडच्या भागास,’ भैरवीचे शेत’ , आणि दक्षिणेकडच्या भागास ,’मात्र्याच शेत’.कदाचित तिथं सगळं धान्याचं मात्रच होत असावं. शिवाय बैलबारदाना वेगळाच.एक दावन तर काहीच नाही.एवढी जनावर होती.घरातले दोन तर शेतावरचे ४ गडी मागेपुढे राबत होते.
पण ते सारं वैभव त्याला पाठ फिरवून गेलं होतं. आज त्याच बापूसाहेबांला बसायला घर सुद्धा शिल्लक राहिले नव्हते.पाऊस तर मुसळधार सुरू होता.अश्या स्थितीत ढाळजाच्या एक कोपऱ्यात साठी उलटलेला बाप्या ,त्याच्या उजव्या मांडीवर त्याचा सहा वर्षाचा नातू शिवा, अन दुसऱ्या मांडीवर डोक्यावरचा पटका, जी त्याची इज्जत,अब्रू होती. तर कवाड चौकटीवर उंबर्याच्या आत-बाहेर पाय टाकून अंग चोपून सून जानकी आपल्या माहेरची गडगंज संपत्ती आणि सासर च दारिद्र्य यांची तुलना करून बापूसाहेबांची सून झाल्याबद्दल नशीब फुटक्के असल्याचं खापर बापूसाहेबवर आणि नवऱ्यावर फोडत होती.पण बाप्या मात्र अगदी शांत होता.,जणू मेलेलं मड बसल्यागत….!
गेल्या ५-७ वर्षात म्हणे, एकदा पोळ्याच्या निमित्ताने क्षुल्लक कारणावरून गावच्या पाटलाची अन बापुसाहेब ची वादावादी झाली होती. आणि त्यातून बापूसाहेब काही थोडेफार पाटलांचे देणे लागत होते. याच एक संधीचा फायदा घेऊन पाटलांनी बापूसाहेबांचा दावा धरला. आणि देशमुखांच्या संसाराची पार होळी पेटून दिली. या ना त्या प्रकारे त्यांचे जगणे असह्य केले.
देण्याचे व्याज म्हणून देणेसाहित व्याजाची,शेतीची आणि घराची भरपाई करून सारी जायदात हडप केली.अन बापूसाहेबांना रस्त्यावर आणून बाप्या केले.
याच प्रकारातून बापूसाहेबांची बायको सखू, हिच्या मानस वेळोवेळी मानसिक त्रास होऊ लागला. परिणामी, तिच्या डोक्यावर परिणाम झाला. बापूसाहेबांनी तर नियतीपुढे हातच टेकले. शेवटी होते, नव्हते तेवढे सारे दागदागिने मोडायची वेळ आली.या मनःस्ताप सखुला सहन झाला नाही, नव्हे ती यातून सावरलीच नाही. शेवटी एक दिवस डोक्यावर परिणाम झालेली सखू कोठेतरी निघून गेली ,ती कायमचीच…मग घरात बाई-माणूस पाहिजे म्हणून सून जानकी ला घरी आणले.सखू गेली तेव्हापासून बापूसाहेबांचा सुख-दुःखाचा वाटेकरीच राहिला नव्हता.म्हणून तो खूप एकाकी पडला होता.
आज या सर्वांना भूक भागवण्यासाठी एक भाकरीची व राहायला निवाऱ्याची गरज होती. देव सावध जणू त्यांचा अंत च पाहत होता. रामा दुसऱ्याच्या शेतावर रोजगार म्हणून जात होता. पण भाकरीची भ्रांत होतीच. करण सगळं रोजगार लोकांची देणी देण्यातच जात होता.
साठी ओलांडलेल्या बाप्या, पूर्वीसारखं काम करत नव्हता. घरातच घुम्यासारखं एकटक बघत बसत होता. कोणीही काही बोलत तरी फक्त नशीब आणि कर्म याच्या पलीकडे तो जात नव्हता.
क्रमशः
पुढील भाग खालील लिंकवर वाचू शकता.
पाऊस,भाकर आणि सौभाग्य यावर आधारित ही कथा तुम्हाला कशी वाटली….अवश्य कळवा.आवडल्यास Share करा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




वास्तव कथा.
पाऊस,भाकर आणि सौभाग्य तिन्ही संबंध जोडून वास्तव कथा लिहिली प्रिया. लिखाण नेहमीसारखेच दर्जेदार.
खुप छान कथा प्रिया मॅडम
पाऊस हवाहवासा आणि नकोसा , यामधली कथा उत्तम मांडली
छान कथा