२-पाऊस कथा-हरवले ते गवसले
प्रिया देशपांडे
वैभवात लोळणाऱ्या बापूसाहेबांची क्षुल्लक कारणावरुन पाटलासोबत वादावादी झाली. बापूसाहेब काही थोडेफार पाटलांचे देणे लागत होते. याच एक संधीचा फायदा घेऊन पाटलांनी बापूसाहेबांचा दावा धरला. आणि देशमुखांच्या संसाराची पार होळी पेटून दिली. या ना त्या प्रकारे त्यांचे जगणे असह्य केले.
देण्याचे व्याज म्हणून देणेसाहित व्याजाची,शेतीची आणि घराची भरपाई करून सारी जायदात हडप केली.अन बापूसाहेबांना रस्त्यावर आणून बाप्या केले.
आता पुढे वाचा.
भाग-२
आजच्या या मुसळधार पावसात रामा नुकताच शेतावर राबून ओलाचिंब होऊन आला होता. तेव्हा घरात पाय ठेवायला जागा नव्हती. मधलं देवाच दोन पत्र्याचा घर गळून गळून खाली भुईला पाय ठेवला तर जमिनीत जाईल इतका चिखल होऊन गेला होता. म्हणून पुढच्या ढाळजत एक कोपऱ्यात बाप्या अन छोटा शिवा बसला होता. उंबऱ्यात जानकी बसली होती. बाकी कोठेच जागा कोरडी शिल्लक दिसत नव्हती.पाऊस मात्र थांबायचे नावच घेत नव्हता. तिन्ही सांजा टळत आल्या होत्या…
तिन्ही संध्याकाळ टळते न टळते तोच रामाला सपाटून ताप भरला. थंडीने तो थडथड उडू लागला. कितीही पांघरूण टाकली तरी त्याचा काहीच उपयोग होईना…! तो डोळे पांढरे करू लागला. छोटा शिवा भुकेनं व्याकुळ झाला होता, पण घरात मात्र भाकरीचा….
जानकी मात्र जीवाचा त्रागा करवून घेत होती. नशिबाला दोष देत होती. रामाचं अंग तापान फंफणत होतं. पाऊस मात्र थांबायचे नावच घेत नव्हता. पाऊस आता थांबलं,मग थांबलं म्हणून वाट पाहत बसलेला बाप्या कसाबसा काठीच्या आधारे जोरात उसासा टाकत उठला,”अग, जानके, जरा दवापान्याला उसनेपासने पैसे मिळतेत का बघतो जाऊन…! “
तिचा पारा चढलाच होता,”आम्हा सगळ्यांना गिळल्याशिवाय नाही तुमचा जीव शांत होणार.स्वतःच्या बायकोला गिळून बसलात,अन आता….!”
जानकी बाप्यावर जोरजोरात खेकसत होती. अगदी उगाच, त्याचा काहीच कसूर नसताना…!
पण बाप्या मात्र अगदी निःशब्द होता. अगदी दोन शब्दातल्या रिकाम्या जागेप्रमाणे….! कारण त्याला जानकी च्या हाताखाली उरलेलं आयुष्य काढायचं होतं.
तो तसाच काही एक न बोलता पुढे सरकला. पावसामुळं डोक्यावर पोत्याचा कुंचा तेवढा करून घेतला. एवढा पाऊस होता की समोरची वाट पण दिसेना. रस्ता सुद्धा अगदी निरव शांततेत पावसात निपचित जागेवर पडून होता. कोणाच्याही पावलांच ओझं त्याच्या अंगा-खांद्यावर नव्हतं. शिवाय बाप्या सोडून.
एक सोडून चार घर त्यानं आपली व्यथा मांडली. ओळखीच्याकडे पैसे मागितले,पण काहीच उपयोग झाला नाही. व्यवहरिकता आडवी आली. तिकडे रामाच्या जीवाची तगमग बाप्याच्या नजरेसमोरून जात नव्हती. देवही जणू अंतच पाहत होता.
हतबल होऊन बाप्या माघारी घराकडे वळला.तसं त्याच्या पायाजवळ पडलेलं मंगळसूत्र त्याच्या दृष्टीस पडलं. एका बाजूनं वगळलेल्या कोण्या स्त्री च्या सौभाग्य होत कोण जाणे? पावसाच्या पाण्याने त्यावर माती जाऊन बसली होती. बाप्यान ते उचलून हातात घेतलं. आणि देवाने वेळ भागवली, या आनंदात तो घरी आला आणि देवापुढं चिमूटभर साखर ठेवली. आणि हात जोडले.
रामा निपचित खाटेवर पडून होता. बाप्या, त्याच्या जवळ येऊन बसला.
“राम्या, देवाला खरचं आपली काळजी हाय र…!कशी त्यानं येळ भागवून नेली बघ,कुणाच्या तरी सोभाग्यान तुजा जीव वाचविला बघ…!”
तशी जानकी मधेच नाक खुपसून त्याच्यावर खेकसली,
“कोण्या दिवशी खड्ड्यात घालतो की ह्यो म्हातारा…., माझ्याच नशिबी का माग राहिला,कोण जाणे?”
घरची लक्ष्मी जानकी कधी एक शब्दांन बाप्याला चांगलं बोलत नव्हती. बाप्या पुन्हा उठला, आणि शांतपणे दरवाज्याच्या कोपऱ्यात जाऊन बसला. त्या निर्जन,निर्मनुष्य रस्त्याकडे बघत.
एवढ्यात बाहेरून पुसटसा आवाज येत होता,
“माज मंगळसूत्र….? माज्या कुंकवाच्या धन्याला काय झालं…?माज सौभाग्य…?”
बाप्याला आवाज ओळखीचा वाटलं. झटकन मन वर करून त्यानं बाहेर पाहिलं…
तर सुन्या गळ्याची सखू,बाप्याची बायको आपलं सौभाग्य शोधत परत आली होती.. …!
सखुला समोर पाहताच बाप्या ला स्वर्ग ठेंगण झाला. त्याच्या शिरशिरी आली, सुनेकडे पाहून बाप्या मनाशीच बोलला,
आता पाऊस उघडून थोडं शिराळ पडलंय….!
सौ. प्रिया…
पाऊस,भाकर आणि सौभाग्य यावर आधारित ही कथा तुम्हाला कशी वाटली….अवश्य कळवा.आवडल्यास Share करा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
समाप्त
भाग-१ ची लिंक
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
व्यथेची कथा उत्तम मांडली