article in marathi-नवा पाहुणा
सौ. प्रिया देशपांडे
परसातील जाई, जुई डोलाने मान डोलवत होत्या. कुंडीतल्या तुळशी दिमाखात हसत होत्या. चाफ्याचे स्मितहास्य मोठमोठया पानात बसले तरी लपत नव्हतं.
माझे बारीक निरीक्षण सुरू असतानाच अचानक एक ओळखीचा सुगंध मनाला स्पर्शून गेला. मंद वाऱ्याची झुळूक ,पूर्वेकडून डोकावत असलेला सूर्य, वातावरण कसं प्रसन्न…त्यात हा मोहक सुगंध…!!
अंगावर शिरशिरी आली. काही सुंदर क्षणांची आठवण सुद्धा देऊन गेला हा क्षण….!!
ओळखीचा सुगंध.मी बारकाईने पाहिले,-तर नवा पाहुणा आला होता, “मोगरा”…
तो कुठून आणि कसा आला अवचित? काहीच कळेना . मध्यंतरी खूप सारी रोपटी रुजवली, त्यातलाच हा अवचित आलेला पाहुणा असावा असं वाटतं. जवळ जाऊन त्याला हात लावला, तसं त्यानं अंग चोरून घेतलं. चपापला की लाजून बसला?कळलचं नाही…पण सारं अंग आकसून घेतलं त्यानं…एवढं मात्र खरं…!!
एका फांदीकडे माझी नजर गेली, दोन बारीक अश्या कळ्या
दोन डोळे असल्यागत जवळ जवळ बसलेल्या नजरेस पडल्या…”अरे , हे काय? कुठून आला हा असा अवचित? आणि कळ्या सुद्धा लागल्या?समजलेच नाही!!” मी मात्र मनस्वी आनंदले…’मोगरा’ माझा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय.
आणि गजरा त्याहूनही अधिक…!! शिवाय आईच्या कडेवर मूल, आणि स्त्रीच्या डोक्यावर फुल शोभुनचं दिसत …परमेश्वराच्या चरणाशी ,डोक्यावर दोन जरी फुल वाहिली म्हणजे मन कसं प्रसन्न होत….मनःशांती मिळते त्यातूनच.
वर्धिष्णू होत असलेल्या त्या मोगऱ्याच्या दोनच कळ्या मध्ये माझा जीव आज दिवसभर रमून गेला….दिवसभरात जवळपास १० ते १२वेळा जाऊन डोळ्यात मन भरून साठवली त्यांची बाल्यावस्था….आणि झोपतांना सुद्धा त्याची फुलण्याची वाटच पाहत झोपले,स्वप्नवत…..
दुसरे दिवशी मात्र सूर्यदर्शन अगोदर “मोगरा दर्शन”घेतले. आणि गंमत सांगू….मंद सुगंध घेऊन हे दोन जीव वर्धिष्णू रूपात दिमाखात डोलत होती.जणू प्रियकर-प्रेयसी खूप दिवसात भेटली आहेत आणि जवळ बसून प्रणयात मग्न आहेत, असेच भासले जणू. कित्येक दिवसात न भेटलेल्या या दोन जीवांचे हितगुज चालू होते, काय बोलत असावेत बरं ही..?
रोपटाच्या देहाला “जीव आणि शिव”अश्या दोन कळ्या लागल्या होत्या….जीवशिवाचा हा सृजन सोहळा मी “याची देही,याची डोळा”पाहतच राहिले..…..बागेतील पहिली मोगऱ्याची फुल परमेश्वराच्या मस्तकी अर्पण केली आणि जीवनातही सुगंध कायम ठेव म्हणून आपसूकच नतमस्तक झाले.











सुंदर लिखाण
छान सुगंधित मोगरा