भाव तिथे देव
एका छोट्या गावात राजू त्याच्या आई सोबत राहत होता. गावातून शाळेत जायचा रस्ता जंगलातून जात होता. लहानगा राजू जंगलातून जायला यायला घाबरायचा. सोबतही कोणी नसायचे त्याच्या. आई त्याला शाळेत सोडायला आणि घ्यायला जायची पण कामामुळे त्याच्या आईचं रोजच जाणे जमायचे नाही.
” आई ! मला भीती वाटते ग एकट्याला “.
” एक काम कर राजू तुला भीती वाटली ना, की जंगलात बन्सीवाले भैय्या राहतो, त्याला जोरात हाक मार “. राजू आनंदीत झाला. राजूचा दिनक्रम झाला होता. जंगलात शिरला की बन्सीवाले भैय्याला आवाज द्यायचा, त्याला सोबतही मिळायची आणि बोलता-बोलता शाळेपर्यंत केव्हा पोहोचायचा कळायचे पण नाही.
त्याची भीती केव्हाच पळून गेली होती. राजू रोज आनंदाने शाळेत जायला तयार असायचा.
शाळेतले त्याचे आवडते गुरुजी सेवानिवृत्त होणार होते. वर्गातली मुले मोठ्या घरची होती, सगळेजण गुरुजींसाठी मोठ-मोठी भेटवस्तू आणणार होते.
राजूची आई गरीब होती, मोलमजुरी करायची.
तो उदास झाला. त्यालाही गुरुजींना भेटवस्तू द्यायची इच्छा होती.
तो तोंड बारीक करून घरी आला. आईच्या लक्षात आलं.
” आई !अग मला पण गुरुजींना छानशी भेटवस्तू द्यायची आहे”
” अरे आपल्याकडे जे आहे तेच देऊ आपण गुरुजींना”.
पण राजू काही ऐकेना.
त्याला वाटलं सगळ्या मुलांच्या छान छान वस्तू समोर आपली वस्तू कशी दिसेल?
गुरुजींना आवडेल का ?
सगळे हसतील आपल्याला.
जाऊदे मी बन्सीवाले भैय्याला सांगतो उद्या आणि झोपी गेला.
शाळेत जाताना राजूनी बन्सीवाले भैय्याला रडत रडत हकीकत सांगितली.
” अरे किती छोटी गोष्ट आहे ही .
ही घे चांदीची वाटी, ही जादूची आहे बर का! यात गोड दूध आहे”.
राजू खुश झाला. भेटवस्तू गुरुजींना देताना त्याला दाटून आलं.
गुरुजींना दूध भरलेली चांदीची वाटी बघून आश्चर्य वाटले. त्यांनी वाटीतले दूध पिले तर कमालच झाली त्या वाटीत पुन्हा आपोआप दूध जमा झाले आणि दूध तर इतके मधुर होते की त्यांनी आजपर्यंत असे दूध कधी प्यायले नव्हते.
दोनदा तीनदा चारदा ….दूध पुन्हा पुन्हा वाटीत जमा होऊ लागले.
सगळे मित्र ओरडले या भिकारड्या राजूनी ही वाटी कुठून तरी चोरून आणली असणार.
सगळे त्याला बोलायला लागले. तो रडून रडून सांगत होता,”मी चोर नाही” त्यानी गुरुजींनाही सांगितलं, जंगलात बन्सीवाले भैय्या राहतो, त्याने दिली मला ही वाटी.
” वाटल्यास तुम्ही सगळे माझ्यासोबत जंगलात चला, मी भेट करून देतो तुमची”.
राजूच्या मागे मागे गुरुजी आणि त्यांच्या मागे रांगेत सगळी मुले जंगलात पोहोचले. राजुने नेहमीच्या ठिकाणी येऊन जोरजोरात हाका मारल्या,” बन्सीवाले भैय्या, ओ बन्सीवाले भैय्या! बघ तुला भेटायला कोण कोण आलेत आणि सांग त्यांना, ही चांदीची वाटी तूच मला दिली ना मला, गुरुजींना भेट म्हणून द्यायला”. सगळे शांत होते आणि आतुर होते की खरेच असा कोणी राजूचा भैय्या आहे का ?
थोड्या वेळाने झुडपाच्या मागून आवाज आला,” हो मीच दिली ती राजूला, राजू चोर नाही”.
पण बन्सीवाला समोर आलाच नाही कानावर आले फक्त बन्सीचे सूर.
आजीच्या आठवणीतील कथा
शब्दांकन
मोहिनी शैलेश पाटनुरकर











निरागस, भोळ्या बालमनाची सुंदर बालकथा