३- तृष्णा

भाग-३
तृष्णा 
काय असेल यात?कॕसेटस् बघून अमोलची उत्सुकता ताणली जात होती.त्याने मुंबईवरुन येतांना आणलेला व्हिडीओ कॕमेरा काढला.आणि त्यात एक नंबर लिहून असलेली कॕसेट टाकली. नशीबाने कॕसेट सुरु झाली.
सुरुवातीला जरा खरखर झाली.चित्र थोडे धूसर दिसत होते.पण एकंदरीत ठीकच होती कॕसेट.
एक देखणी तरुणी स्क्रीनवर आली. हिरवी साडी,हातभर बांगड्या,गळ्यात मंगळसुत्र,हाताला पुसटशी मेंदी.नवीन लग्न नववधू वाटत होती.घर तेच जिथे अमोल आज जावून आला होता. 
अमोल कॕमेरा लॕपटाॕपला जोडत होता.तो जोडता जोडताच मंजूळ आवाज कानी पडला. पुढील कथा
भाग-३
मी तृष्णा
आवाज ऐकून अमोल स्तब्ध झाला.कॕसेट बघायची का?
 बहूधा तृष्णाचे खाजगी जीवन असणार यात.या विचारात क्षणभर थांबला.थोडावेळ बघतो असा विचार करुन बघायला लागला.
मी तृष्णा.
मंजुळ आवाजाची देण असलेला तो चेहरा अतीव देखणा.एवढे सौंदर्य क्वचितच कुणाला लाभत असेल. हा व्हिडिओ कॕमेरा म्हणजे माझी डायरी आहे. डायरी जशी स्वतःपुरती स्वतःसाठी असते तसेच हे शुटींग आहे.मनात साचलेले रिते करायचे आहे बोलून. माझ्याशीच माझे बोलणे. मी  डायरी कधी लिहिली नाही.पण यात आता मी रोज काही ना काही शुटींग करणार.नंतर कधीतरी माझे आताचे आयुष्य बघतांना,ऐकतांना एक आगळाच अनुभव  येईल.माझ्या जोडीदाराला हे सिक्रेट मी आताच सांगणार नाही.नाही आवडले तर बंद होईल शुटींग माझी.खूप  वर्षांनी कदाचित् सांगेन.
माझे गाव,माहेर,आईचे घर सगळे सोडून आईने अनोळखी पुरुष जो आठ दिवसाआधी माझा जन्माचा जोडीदार बनला त्याच्या  सोबत असंख्य स्वप्ने घेऊन इथे आली. पण माझ्या एवढा माझा जोडीदार स्वप्नाळू खचितच नाही.मी बडबडी तो अबोल.मी पसारा मांडणारी,तो नीटनेटका.जरा एखादी वस्तू इकडेतिकडे झाली कि चिडचिड सुरु. 
माहेरी मी आणि आई दोघीच राहत होतो.
माझे बाबा,आई आणि त्यांचे विश्व असणारी मी तृष्णा.
तिघांचे हसरे घर.आई कायम हसतमुख.आईबाबांचा प्रेमविवाह.श्रीमंत कुटुंबातील देखणी असलेली आई बाबांच्या प्रेमात पडली.घरच्यांच्या विरोधाला न जुमानता बाबांसोबत लग्न केले.दोघांनी लग्न केले आणि  दोघांचेही नातलग अंतरले. पण दोघांनी प्रेमाची माणसे खूप  जमवली होती. शेजारी,आईबाबांचे मित्र मैत्रीणी  येत राहायचे घरी.पुढील कथा
आईचा वाढदिवस,बाबांचा वाढदिवस,दोघांच्या लग्नाचा वाढदिवस,माझा वाढदिवस साजरे होत राहायचे.आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करावे असे बाबांना नेहमी वाटायचे.त्या मानाने आई थोडी अबोल होती.तिच्या माहेरच्या वातावरणाचाही परिणाम असेल ती पट्कन कुणाशी जवळीक साधू शकत नव्हती. तिला मोजक्या मैत्रीणी होत्या.तिचे विश्व मी आणि  बाबांपुरते सीमित होते.
बाबा आॕफिसमध्ये गेले कि घर नीट करणे, तिला पसारा मुळीच आवडत नाही. आणि  बाबा पसाराप्रिय.मीही बाबांसारखीच पसाराप्रिय.
जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथे ती वस्तु का ठेवावी मला कळायचे नाही.घरी तिघेच असल्यामुळे पसाऱ्यातही वस्तू कधी हरवल्याचे आठवत नाही.
पण शिस्तप्रिय आईला कोण समजवणार? मी आणि  बाबांनी मांडलेला पसारा न कुरकुरता आवरत राहायची.
बाबा म्हणायचे,राधे पसाऱ्याशिवाय घराला घरपण नाही.तृष्णाला मनसोक्त  खेळू देत जा.तिने केलेला पसारा मी आल्यावर आवरेन.असे म्हणत हसत हसत आॕफिसला निघून जायचे.
आईला झाडांची आवड म्हणून बाबा कुठेही गेले कि झाडे आणायचे. 
आईला फुलांचे भारी वेड. प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतुत उमलणारी फुले सुगंध द्यायची.
वेळ असला कि बाबा आमच्या दोघींसाठी गजरे बनवायचे. 
दोघांच्या आवडी भिन्न होत्या पण जपायचे एकमेकांच्या आवडी जपायचे.आईबाबांचे प्रेम,त्यांचा संसार अगदीच दृष्ट लागण्यासारखा होता. दृष्ट लागलीच संसाराला.
पत्त्याच्या घरासारखे एका क्षणात आमचे घर कोलमडले.
सकाळी आईला टाटा करुन,मला शाळेत सोडून आॕफिसमध्ये गेलेले बाबा घरी परतलेच नाही.घरी आला त्यांचा निर्जीव देह. मला सोडून आॕफिसच्या रस्त्याने जात असतांना बाबांना अपघात झाला होता.
(तृष्णाचे डोळे वाहायला लागले.)
बाबा गेले आणि  आमचे वेगळे बाबांशिवायचे आयुष्य सुरु झाले.
मी तेव्हा बारा वर्षाची होते.सहावीत होते. बाबा गेल्यानंतर घरी येणारे उत्पन्न बंद झाले.श्रीमंतीत वाढलेल्या आईला काय काम करावे सुचत नव्हते. आईला शिलाई कामाची आवड होती.तेच  काम करायचे तिने ठरवले.आई देखणी होते.बाबा गेले तेव्हा पस्तीशी पण झाली नव्हती.घरात पुरुष  मंडळीचे येणे नको म्हणून बाबांच्या मित्रांचे घरी येणे आईने बंद केले.
तिला जास्त मैत्रीणी नव्हत्याच.त्यात आई आता खूप  बिझी असायची.कुणासोबत बोलायला तिला वेळही नसायचा आणि  इच्छाही नव्हती. फक्त तृष्णासाठी तिला जगायचे होते.
बाबा गेल्यावर आईला सासर उरले नाही.आईचे माहेर श्रीमंत होते पण सत्ता मामाच्या हाती होती.आई त्यांच्यापुढे हात पसरत नव्हती आणि  मामा स्वतःहून काही देत नव्हते.
परिस्थितीतील अंतरामुळे मनातही अंतर पडत गेले.
हळूहळू घरात  आम्ही दोघीच एकमेकींपुरत्या उरलो.
मी म्हणजे आईचा श्वास.तिने मला तिच्याजवळून दूर कधी जावू दिले नाही.फक्त  शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडायची.पण मला शाळेत  भरपूर मैत्रीणी होत्या. 
अभ्यासात मी ठीक ठाक होते पण कथा,कविता लिहिणे यात वाकबगार.त्यामुळे लाडकी होती सगळ्यांची.नाटकातही काम करायची.
कुणाला भाषण लिहून दे तरा कुणाला निबंध ही कामे मी आवडीने करायची.
आईला लिखाणाची, वाचनाची आवड नव्हती. ती आवड बाबांकडून माझ्यात आलेली. मी घरी असले कि सतत वाचत असायची.
बाबांनी आवडीने घेतलेली काही पुस्तके होती घरी.बाबांना आवडलेल्या काही ओळींवर बाबा टिपण्णी लिहून ठेवायचे.
आई आता ती पुस्तके जीवापाड जपत होती.
बाबा गेले पण सोबत आईचे हास्य,तिच्या आवडी,तिचे सुगंधावरचे प्रेम सगळे सोबत घेऊन गेले.बाबा गेल्यापासून आईला मी कधीही नटतांना बघितले नाही.आमची बाग सुकली होती.मोगऱ्याचा दरवळ बाबांसोबत नाहीसा झाला होता.

क्रमशः

Next Part
https://marathi.shabdaparna.in/४-तृष्णा
तृष्णा-वडील बालवयात गेले.खचलेली आई  तिचा एकमेव आधार असलेल्या तृष्णाला जीवापाड जपू लागली.पुढील कथा पुढील भागात नक्की वाचा.
शब्दपर्णवरील वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या कथामालिकांच्या लिंक पुढे  दिल्या आहेत.

आभास हा छळतो मला

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुंदरा मनामध्ये भरली

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!