१५-तिची आजी

तिची आजी
जे घर सोडून तो ऐटीत नवीन घरी गेला त्या घराने निराधार केल्यावर पुन्हा जुन्या घरानेच आधार दिला.आता पुढची कथा…..
भाग-१५
सीताई रोज एकटीसाठी  जेवण बनवायचीच आता या वयात प्रभाकरसाठीही  जेवण बनवावे लागत होते.दर आठवड्याला मनोहर यायचा.मध्ये कधी श्रीधर आला कि तिच्यावरच जेवण बनवण्याची जबाबदारी यायची.
मनोहरच्या,श्रीधरच्या जबाबदाऱ्या आता संपल्या होत्या.मुलांना नौकऱ्या,त्यांची लग्ने सर्व  आटोपले होते.
सीताईने सर्व नातवांची लग्ने बघितली. काही पणतू ही बघितले.त्याबाबतीत तिचे आयुष्य कृतार्थ होते. पण गीताचे नसणे आणि प्रभाकरची हतबलता  या दोन गोष्टींमुळे तिला कशात आनंद वाटत नव्हता. 
सीताई आता बरीच म्हातारी झाली. थकली आता ती. मनोहरने तिला त्याच्या घरी नेण्याचा आग्रह धरला पण प्रभाकरला सोडून ती जाऊ शकत नव्हती आणि त्याहीपेक्षा तिला घर सोडवत नव्हते. तिचा संसार,मुले,त्यांचे लहानपण, त्यांची लग्ने…या सगळ्या गोष्टींचे हे घर साक्षीदार होते. ते सोडून ती कुठे जाणार? 
एकदा खूप आग्रह करुन मनोहरने सीताई आणि प्रभाकरला त्याच्या घरी  नेले.त्याने तिथे घर बांधले होते. त्याच्याही दोन्ही मुलींचे लग्न झाले होते.मुले चांगल्या नौकरीवर होते. एकंदरीत त्याचे सर्व  व्यवस्थित होते.
त्याच्या घरच्या नवनवीन वस्तु बघून सीताईला नवल वाटत होते. तिच्या काळात पत्रेही दुर्मिळ होते.आता फोनमधून ती नातवांचा आवाज ऐकू  शकत होती.लांब असलेल्या नातीचा फोन आला तेव्हा तिच्याशी बोलतांना सीताईला तिच्याशी भेटल्यासारखे वाटले.
तिला आठवले,रामला दवाखान्यात  नेल्यावर त्याला घरी आणेपर्यंत जीवाची किती घालमेल झाली होती. तेव्हा फोन नव्हता.
दया माहेरी येईपर्यंत तिचा आवाज कानी पडत नव्हता.
महिन्यातून तिचे एखादे पत्र यायचे खुशालीचे ते बघूनच आनंद व्हायचा.प्रभाकरला मुलगा झाला तेव्हा निरोप द्यायला माणूस पाठवावा लागला होता.
सीताई,तिच्या नणदा  मजेत नदीवर कपडे धुवायला जायच्या. आता वाॕशिंग मशीन आल्या होत्या. नदीवरील सुखदुःखाची देवाणघेवाण कमी झाली.
पाटा वरवंटा जाऊन मिक्सर आले आणि  वाटण घालून बनवलेल्या भाजीची चव हरवली.
ओव्या म्हणत जात्यावर दळलेले पीठ तर केव्हाच गेले. मिरच्यांचे खलत्त्यात कुटून तिखट पावडर बनवणेही गेले.हाताने सेवया बनवणे जाऊन शेवयांचा साच्या आला.
रेडिओ,टेपरेकॉर्डर ,टीव्ही अशा कितीतरी बदलांची सीताई साक्षीदार होती.
तिचे गावही आता पूर्वीचे राहले नव्हते.जागोजागी नळ आले होते.शाळा सुरु झाली होती.तिच्या सगळ्या मुलांना शाळेसाठी दूरवर जावे लागायचे.मनोहर त्या गावातील पहिला पदवीधर होता. 
सात वाजता अंधारात गडप होणारे तिच्या गावानेही आता सूर्यासोबत झोपणे आणि उठणे बंद केले होते. लोकांनी जमीनी सारवण्यापेक्षा घरात फरशी बसवली. सारवणातून निर्माण होणारे मांगल्य नाहीसे झाले.फरशीमुळे अंगणात पडणारा सडा बंद झाला.
सीताई आणि रमाईचे लग्न झाल्यावर खूप कमी वेळा दोघी बहिणी भेटल्या.गाव फार लांब नव्हते पण बैलगाडीच्या प्रवासामुळे  भेटी व्हायच्या नाही. आता गावातच बस येत होती. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा भेटता येत होते.पण त्यामुळे भेटीतील नाविन्यही संपले होते.
किती टोकाचे बदल झाले होते. पायी किंवा बैलगाडीची जागा आता बसेस आणि रेल्वेने घेतली होती. उन्हाळ्यात सीताई आणि  पूर्णा अंगणात बाजा घालून झोपायच्या.रोज रात्री आभाळात चांदण्या बघतांना तिला एक लाईट चमकतांना दिसायचा.या वयातही ती खूष व्हायची ते बघून.
पूर्णा खटूलं चाललयं बघ. ती पूर्णाला सांगायची. विमानाला ती खटूलं म्हणायची.
 सीताईने नव्वदी ओलांडली होती. आता थकली होती ती. 
 पूर्णाला म्हणायची कधीतरी पूर्णे थकली आता मी. खूप कष्ट घेतले या शरीराने.नशिबात असलेले मिळाले,नसलेले हातून सुटत गेले. कोणाबद्दल काही तक्रार नाही. जे मिळाले ते गोड मानावे. प्रभाकरचेच फक्त  वाईट वाटते.
 पूर्णा तिला समजवायची.
सीताईची एकच इच्छा होती,चालता फिरता मरण यावे. चार मुलांच्या या आईला  हातपाय थकले तर कोण करणार हा प्रश्न होताच.
देवाने तिचे मागणे ऐकले. एकदिवस झोपेतच सीताई निघून गेली.कुणाला काहीही त्रास न देता. 
प्रभाकरचे कसे होणार हे दुःख सोबत घेऊन……
समाप्त
Previous part link
तिची आजी नातीच्या नजरेतून तिला जशी भावली तशी लिहिलेली. कथामालिकेचा हा शेवटचा भाग. कथामालिका वाचकांना आवडल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!