मराठीकथा-कोणाची भूक कोणाचा बळी
वातावरण आज सकाळपासूनच ढगाळ होतं. मधेच झाडाची पाने सळसळ करत होती.आभाळ जाऊन कोवळं ऊन पडलं होतं.तर मधेच मोठी वीज कडाडून एखादी पावसाची सर येऊन धरतीला न्हायला घालून जायची.अश्याच वातावरणात कोणाच्या तरी मयतीची वाट पाहणारा ‘शेऱ्या’, आज निवांत पण कसल्यातरी काळजीत डोक्याला हात लावून बसला होता.
लोक एखादा माणूस जगावा म्हणून दुवा मागतात,हे सूत्र मला माहित होतं.पण कोणाच्या तरी मरणाची वाट पाहात राहणं हे आश्चर्यकारकच वाटलं.खरं म्हणजे जगणं-मरणं कोणाच्याच हातात नसतं शिवाय त्यासाठी वाटही बघावी लागत नाही.पण लोकांनीच या मरणाचा ‘बाऊ’ करून ठेवला आहे.
गावात कोणी मेलं म्हणजे पन्नाशी उलटलेला हा शेऱ्या न सांगता हजार व्हायचा. मग कधी भाड्यानं रडायचा, कधी तिरडीचे सामान गोळा करायचा, सरण रचायचा,तर कधी तिरडी बांधायचा…..
या साऱ्या कामातच त्याची पुरेवाट झालेली बघायला मिळायची.अक्षरशः घाम पुसायला पण त्याला वेळ मिळत नसे.
कोणी तिन्ही सांज ला मेलं असेल तर रात्र व्हायच्या आतच मयताची विल्हेवाट लावावी लागे. तेंव्हा त्या प्रेताचा मालक ओरडत असे….
“शेऱ्या,आवर लवकर,तिन्ही सांज टळत आली बघ…!”
अशा वेळी शेऱ्याला मान वर करून बघण्यास सुद्धा फुरसत नसे.आणि अशा एखाद्या प्रेताची विल्हेवाट लावली म्हणजे त्यातच त्याला १०० ते २०० रुपये सहज मिळायचे.आणि २-४ दिवसाचा पोटाचा प्रश्न सुटायचा.
‘एकटा जीव सदाशिव’असा शेऱ्या…..
शेऱ्याचे वडील म्हणे,सोन्याचांदीचे फार लालची होते,घरची गरिबी म्हणून सोने नाणे मिळाले तर आपण झटपट श्रीमंत होऊ ही त्यांच्यातली विकृती होती.यामुळे गावात कोणी मेलं म्हणजे त्या प्रेताला जाळल्या नंतर ते तिथे जाऊन सरणाची हलवाहलव करून प्रेतावर काही सोने नाणे सापडते का?हे पाहून बळकवायचे.
जाताना कधी कधी ते शेऱ्यालाही सोबत घेऊन जायचे,म्हणून की काय त्याला त्या प्रेतत्म्यांची कधीच भीती म्हणून वाटत नव्हती.आणि म्हणून सारे जण त्याला ‘शेर’म्हणायचे.पुढे याच ‘शेर’ नावाचा तो ‘शेऱ्या’ झाला.आणि त्याचे शेऱ्या नाव पडले ते कायमचेच.
लोक पोटासाठी कष्ट करतात,भीक मागतात पण शेऱ्या कोणाच्यातरी मरणाची वाट बघत असे.पन्नाशी ओलांडलेला,अंगात कळकट-मळकट सदरा अन धोतर,डोळे अगदी क्षीण झालेले,चेहऱ्यावर ग्लानी पसरलेली,कपाळावर आठ्या पडलेला,उंच काळा, आणि मध्यम शरीरयष्टीचा असा हा शेऱ्या.
त्याच्या शरीरयष्टीचा आढावा घेता त्याला शेऱ्या हे नाव मात्र शोभत नव्हते. जन्मतःच माय ला गिळून बसला म्हणून बापानंच पोसला.पण शेऱ्यावर जेंव्हा बापाला पोसायची वेळ आली तेंव्हा एक दिवस बाप अचानक झोपेतच जो कुठेतरी निघून गेला,तो त्याचा आजवर काही थांगपत्ता नव्हता.
शेऱ्याच्या बापाला झोपेत चालायची सवय होती.कदाचित प्रेतात्म्या वरचं सोनंच त्याला बाधलं असावं. आणि आज शेऱ्या ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून याच व्यवसायात गुरफटून चालला होता.
आज बऱ्याच दिवसात तो निवांत बसलेला दिसत होता.हातात एक अर्धवट फुकलेलं बिडीचं थोटुक मात्र दिसत होतं. मागच्या २ ते ३आठवड्यात त्याची बरीच चांगली कमाई पण झाली होती.करण मुसळधार पावसात वीज कोसळून धनगरांचा एक विशी ओलांडलेला जवानीतला पोर मेला होता.तसंच रात्रंदिवस दम्याच्या आजारानं खाटवर पडलेला थेरडा पिराजी पण देवाला भेटायला गेला होता तो ही शेऱ्याच्या मदतीनच…!
शिवाय सासुरवासाला कंटाळून त्या परसातल्या शांतीनं फाशी घेतली होती.तिच्या मयतीचा पंचनामा व्हायलाच चार पाच तास लागले होते. आणि या तिन्ही मयतीची विल्हेवाट लावण्यात आणि तिरडीचे सामान गोळा करण्यात तो पार थकून गेला होता. या तीनच दिवसात त्याची जवळपास पाच सहाशे रुपये तरी कमाई नक्कीच झाली होती.मात्र तो पैसे जमवून काय करत होता कोणास ठाऊक?
या आठवड्यात कोणीच कसा गचकत नाही याची तो वाट बघत बसला होता.डोक्याला हात लावून कसल्यातरी विचारात बसलेल्या ‘शेऱ्याला’ बघून पलीकडच्या वस्तीत वळू लागलेली जनी शेऱ्याजवल आली आणि तिने त्याची विचारपूस केली,
“काय शेऱ्या,आज काही काम नाही मिळालं वाटतं?”
“जने, काम नाही म्हनून तर बसलोया…!
उगच, एकजात कोनचातरी रोग व्हावा अन पटापट मौती याव्यात बघ…!”
त्याच्या तोंडावर बोलता बोलताच एक मिश्किल हास्याची लाट आली अन निघूनही गेली.त्याच्या विचारांची मात्र दाद द्यावीशी वाटली.
‘शेऱ्या,त्या मागल्या वस्तीला बघ एक मांजर मारून पडलंय’
तिनं आणखी एक गिऱ्हाईक आणून दिलं. कारण शेऱ्याला नेहमीच मौतीच्या घटना महत्वाच्या वाटायच्या…!
“जने, त्या मांजराची तिरडी आणली तर मला एक फुटकी कवडी पण मिळायची नाही बघ..!
पण कुनी माणूस मेलं असलं तर सांग,त्याची बिनबोभाट विल्हेवाट लावतो.”
आणि पुन्हा खाली मान घालून तो आपल्या घरासमोर च्या ओट्यावर पूर्ववत बसून राहिला.तशी जनी गालातल्या गालात हसून पुढे सरकली.
शेऱ्या चं घर म्हणजे एक पाचटी चं छोटसं खोपट च होतं. आतमध्ये एक मिणमिणती चिमणी मात्र तेवत होती.एक खापराचं कटोरं होतं. एक मडकं त्यावर एक पाटीलीनीन दिलेला किटन चढलेला ,चमटलेला स्टीलचा पेला होता.आणि एक जेवायची ताटली,वाटी, व दोन टकरे पातेले,एवढंच काय ते त्याच सामान आणि संसार. एवढा मिळालेला पैसा, सोनं तो काय करत असेल.
अशाच भकास,उजाड,खोपटाच्या बाहेर शेऱ्या डोक्याला हात लावून दोन्ही पायाच्या आत डोकं खुपसून बसला होता. तास कोठून तरी पुसटसा आवाज कानी पडला.
“तो देशमुखांचा गना, शेवटच्या घटका मोजतोय म्हणे…!”
दूरवरचे ते वाक्य कानी पडताच त्यानं दोन पायातील मुंडक ताडकन वर केलं आणि लांबवर नजर टाकली.
काहीतरी गोंधळ चालू होता,त्यानं मागे वळून एकदा खोपटा कडे पाहिले आणि तो तसाच उठून चालू लागला. तो थेट देशमुखांच्या दारापर्यंत.तिथे बहुधा तालुक्यावरून डॉक्टर आणला असावा.कारण बाहेर दरवाज्यात गाडी उभी होती. त्या गाडीला पाठ लावून तो जमिनीवर टेकला.आणि दिवा कधी शांत होतो,याचीच वाट तो पाहत बसला.
अर्धा तास झाला,डॉक्टर काही बाहेर येईनात.सगळेजण वाड्यात चहूबाजूस उभे होते.कोणी म्हणे,पाणी पाजवा,कोणी म्हणे तुळशीपत्र तोंडात द्या असे एक एक वाक्य कानी पडत होते. तसतसे शेऱ्या ला हायसे वाटू लागले.पण मधेच आवाज यायचा,
‘अरे,छाती उडते आहे,श्वास चालू आहे बघ…!’
की तो पुन्हा कपाळावर चार आठ्या पाडायचा….
तोवर दुसरीकडे कुठे मौती ची खबर येते का याची वाट बघत बसला.
आणि एकदम रडारड सुरू झाली,तसं त्यानं वाड्याच्या दिशेनं चमकून पाहिलं.तो दिवा शांत होऊन धूर ओकत होता.तसा त्यानं एक सुटकेचा श्वास सोडला. आणि एक गिऱ्हाईक मिळालं या कुशीतच तो तिरडीच्या सामानासाठी धावपळ करू लागला.
किती विचित्र चित्रण आहे ना,कोणाचा बळी गेला…म्हणजे कोणाची भूक भागते….!
आता त्याचा पुढच्या चार दिवसाचा प्रश्न सुटला होता.त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसू लागली होती…!
सौ. प्रिया देशपांडे (नांदेड)










मन विषण्ण करणारी कथा
छान कथा…
मस्त लिहिले
भयाण सत्य मांडले प्रिया मॅडम
अप्रतिम लिखाण