मराठी कविता-चंद्रकांत गायकवाड
संपली उणीव
मराठी कविता-चंद्रकांत गायकवाड
गुलाबी गाल ते
नभ पांघरले
लाजून लाजले
सख्या किती
भांगात केशर
सूर्य पेरू जाता
येते रे सुबत्ता
जीवनात
सावरून मला
ह्रदयी आसरा
उन्मेष पिसारा
फुलविला
सावळी सावळी
विठुची रुक्मिणी
अहेवाची गाणी
ओठावर
वाटे अमावस्या
प्रीतीची पूणव
संपली उणीव
सान्निध्यात
संवादाचे काय ?
मुकी झाली घरे, माणसे
गाव गावासारखा राहिला नाही
संवादाचे झाले वाटोळे
माणूस माणसात राहिला नाही
संवादाला फुटतात फाटे
भक्तीच्या भावबांधाला
भक्तांच्या विसंवादाचे
येती बोराटीचे वाकडे काटे
तिमीर अंधारात, उत्साहाने
काळ्यापांढऱ्या कृतीचे पडघम
बिनबियाच्या जंगलाचे रान
बडवत जातो ढोल,बिनधास्त ढमढम
आत्मसंवाद, करावा नित्य
ह्रदयमंदिरी नंदादीप जाळून
जळून जातील जळमटे
विसंवाद, संवादाला पाहून
कुटाळ कुटील ओटा
पाडायला सुगम संवाद
खोल खोल रुतलेला
उथळ मातलेला निव्वळ वाद
मिलिंदाचे प्रश्न……
त्याचे सुसंगत उत्तर
हरवले, प्रश्नसारे……..
नाही राहिला सदाचार
कविता
व्यथा कोणाच्या?
फूल झाल्या !
कुरवाळतो, मी यातनांना
गार मस्तकातही अंगार ठणक
शब्द पलिते पेटलेले
कसे सांगावे,कुणाला?
कानी कुंडल नियतीच्या
चीर वेदना, उरी फुटते
आतल्याआत ओलेपणे
नसतो, घाव कधीच
फुलासारखा, भळभळती
जीवघेणी जखम ती
शब्दासवे, होते प्रवाही
डोंगर दऱ्या ओलांडत नदीसारखी
कविता,
ओढीत नाही रुढी, परंपरा
मिळून जाते सागराला
सांगत असते गुपीत काही
विशाल होते, आभाळाएवढी
व्यथीत मनालाही भिजवून जाते थोडी
मग ठणक होते थंड
वरून थंड तरी,
आतून उभारते बंड
जीवना उद्धारी
जीवना उद्धारी
शिक्षणाचे बळ
जीवा तळमळ
भाऊराव
फकीर जन्माचे
होते चारपाच
शिरी शिरपेच
श्रीमंतीचा
रयत संस्थेचे
पेरुनीया बीज
जीवनाचे चीज
शिक्षणात
भगीरथ आज
झाले हो पोरके
न्यायाचे हुंदके
अनाठायी
शिक्षणाची गंगा
झाली अमंगळ
कराया निर्मळ
कोण आता
सत्याचे सौंदर्य
सत्याचे सौंदर्य
कुरूप भासते
छबी लपवते
आरशात
चिकित्सा नको ती
पापाची पाचर
वाढे उपचार
मतलबी
मिरवी सोहळे
डामडौल मोठा
खोटा फौजफाटा
संगतीला
आंधळा अंधार
जिवाला छळतो
विज्ञान पिळतो
चरकात
नंदीबैल झाले
विचाराचे लोक
गड्या रोखठोक
रया गेले
व्हा, रे वेडेपिसे
ज्ञान लालसेने
मान तुकवीने
गुलामीचे
भरोसा ठेवावा वाटेवर
वाट शोधीन म्हणतो,
सुखद ,सुखरूप जीवन प्रवासाची
काटे, दगडगोटे खचून भरलेले
वाटेतच बेळे धर्माचे रोवलेले
माणसा-माणसात, रंगाचे चिरोटे वाटून
पसरवला जातो द्वेष,
वाटेची दुतर्फा झाडेही, देतात ग्वाही
श्वासागणिक येणारा वास
नकोसा झालाय आज
अन् तोच गेलाय व्हेंटिलेटरवर
दीडमूढ झालीय मती
झाडाझुडपांची, माती न जगभर झालेल्या वाटेची
तिलाही पडलीत खूप प्रश्न
कित्येकांची लागलीय वाट
वाटेलाही वाटते दुःख
मी ,असते सरळ, आत्मीय निरागस
मला कळत नाही भाव
वाटाड्याच्या मनाचा
त्यात, माझे नसतात मनसुबे
कुणात द्वेष, कुणाचा उपहास करण्याचे
मी अनादि अनंत आहे
वाटाडे असतात मतलबी
त्यात माझा काय दोष
वाटसरुने घ्यावा ध्यास
भरोसा ठेवावा वाटेवर
खरेच भावांनो, मी आहे निष्कलंक, निष्पाप….
गालीची खळी
गालीच्या खळीला
लाजवून बट गेली
लावण्यवतीचे लावण्य
लाज पांघरूण आली
नजरेच्या तीरांनी
घायाळ कित्येक झाले
तो तीर नजरेचा
काळीज खल्लास करून गेली
नागवेली बांधा तुझा
इंद्रधनुष्य वाटे मजला
हसू, ओठांना रंगाचे गीत देई
हे, बंध रेशमाचे,गुंतून पार गेला
वाळलेल्या देहाचे
चंदन अत्तर झाले
जीवन जाळताना हे
आयुष्य कोमेजून गेले.
रुळत्या त्या बटाना
भ्रमर घाली पिंगा
प्रीतीच्या संगमाला
नको, व्यवहाराची बाधा
वसुधा
मातीला लागली आस
श्वासाश्वासात रे कंप
ती, नववधू बावरी
करी थेंबाथेंबाचा जप
कोणी काढा, राव आता
मेघनाथांचे रूसवे
ओढ लावून जिवाला
असे, दूरदेशी जावे?
उभे मायबाप जेव्हा
ओठी बांधून पोटाला
उपवर लेकीसाठी
जीव बांधावर टांगला
नको डाव मोडू राया
स्वप्न पेरले रे, मनी
तूच रे सख्याहारी
दिसे रानात पानोपानी
भेगाळलेल्या भुईला
वाटे सौभाग्य चांदणे
राबणाऱ्या हातांना ही
वाटे आकाश ठेंगणे
नातं
नात्यांच्या भाराने
बघ झुकली बाभळ सारी
काटेच टोकदार टोचणारे
कसे, का?कुरवाळी बिचारी
माणसें वाकलेली
भिऊन गावगाड्याला
विषारी फुत्कार मारतो
मीही, कधी नातलगांना
आज सारेच, उथळ
खळखळून जोर येतो
नात्यांच्या मर्मबंधी
ना ,पवित्र, प्रेमळ
सदा ,चाले जुगलबंदी
क्षणात, क्षणासाठी
जुळतो, मतलबी पसारा
स्क्रिप्ट,संपवून नाटकाची
करी नातेही पोबारा
इतकी सहज असतात नाती
गाजराच्या पुंगी सारखी,
वाजली, तर वाजली…
तशीच मोडूनही खातात, नाती
गाजरासारखी…..
चंद्रकांत गायकवाड
मुखेड.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा









छान
सूर्य पेरू जाता, येते सुबत्ता, छान
छान
सुंदर