मराठी कविता-प्रिती
मंगळसूत्र
माझे तू चित्र
काढणे म्हणजे
किती रंगांचा
आणि कुंचल्याचा पसारा
ही अशी हनूवटी,
मान जरा तिरपी
डोळ्यांनी इकडे बघायचे
नाही ग थोडे या बाजूने बघ
केसांची बट गालावर,
गालाच्या खळीवर सोड ना
नको,
मग हनूवटीवरचा तीळ नाही दिसणार
हात तिथे नाही ग,थोडा वरच्या बाजूने
तर्जनी थोडी खाली हवी.
पदर थोडा खांद्यावरुन सरकलेला हवा….
आणि चेहऱ्यावर भाव आण ग
डोळेही जरा स्वप्निल ठेव
असे रिते डोळे मला नाहीच रंगवता येणार
या आणि अशा अनेक सुचना देता देता
तुझे मोरपीसी स्पर्शाने मी मोहरत जाते
तू माझा खांद्यावरचा पदर थोडा
खाली सरकवायला बघतो
तेव्हा अगदी तेव्हाच तुझ्या रंगमाखल्या
कुंचल्याचा स्पर्श माझ्या मंगळसुत्राला होतो
अन् लगेच ढळलेला पदर सावरते मी
केसांची बट मागे सारते
चेहऱ्यावरचे भाव लुप्त होतात
आणि तशीच तुला बाजूला सारत
मंगळसुत्राला घट्ट पकडत
माझ्या रंगहीन जगात वापस येते
आठवणी
मी धापा टाकत पुढे पळते आहे.
त्या माझा माग सोडायला तयार नाहीत
जिथे गेले तिथे छळताहेत
दमले आता मी
त्यांच्यापासून दूरवर जायच्या प्रयत्नात.
कुठवर पळू आणि कुठे ?
जिथे जात आहे तिथे ह्या एका निमिषात हजर.
का छळताहात तुम्ही मला
मी डोळ्यात पाणी आणि आवाजात
उसनं अवसान आणून विचारले.
त्या बोलायला तयार नाही
चक्क माझ्याकडे दुर्लक्ष करुन
सोबतच ठाण मांडून बसल्या.
मी पुन्हा ओरडत म्हंटले
नको नको मला तुमची संगत
मला राहू द्या ना एकटीला
त्या बोलल्या ,
बघ विचार कर
आम्ही आहोत म्हणून तू आहेस
आमच्याशिवाय तू राहू शकशील?
हो .जा तुम्ही.
मी राहीन तुमच्याशिवाय.
ह्यावेळी मात्र त्यांनी शहाणपणाचा
आव आणून माझे ऐकले.
निघून जाऊ लागल्या एकेक
सुखावले मी क्षणभर.पण….
जसजशा त्या एकेक कमी व्हायला लागल्या,
मी रिते होऊ लागले.
गोड,कडू कशाही असल्या
तरी त्या माझ्या होत्या.
त्या माझ्यात असेस्तोवरच
मी असण्याला अर्थ होता.
आता मी त्यांना थांबवायचा प्रयत्न करु लागले
पण नाही
त्या निघाल्या सरसर मला सोडून
मी एकटी रिकामी,रिती, त्यांच्याविणा
कोलमडलेली……
फक्त तू अन् मी
तुझ्या घराचे माप ओलांडून आली
मेंदी रंगल्या हाताने
हळद माखल्या अंगाने
हिरवा चूडा हातात लेवून
डोळ्यात स्वप्नांचे लोलक घेऊन
तो हिरवा शालू नेसून
जुड्यात माळलेली शेवंतीची वेणी
घराच्या दारात तुझ्या
नावाचा लाजत घेतलेला उखाणा
अंगणात पाट मांडून केलेला नान्होरा
तुझी संधी मिळेल तेव्हा
माझ्यावर खिळलेली नजर
काही अनवधनाने अन्
काही मुद्दाम केलेले स्पर्श
अन् त्या स्पर्शाने थरारलेली काया…..
फक्त तुझे आणि माझे असलेल्या
घराचे मुलांनी केलेले गोकुळ
दिवस सरत गेले….
अन् मग मुलांना पंख फुटल्यावर.
त्यांनी गगनी घेतलेली झेप
सगळे कसे आठवणीत जमा झाले रे
मधूर क्षणांची पानगळ होत गेली
मखमली दिवस सरत गेले
आता पक्ष्याविण रुसलेले निष्पर्ण झाड
आणि आधीसारखेच फक्त तू अन् मी……
कुंचला
अहाहा!
शब्दातीत
आहे तुझ्या कुंचल्याची जादू
लाल,निळा,हिरवा,पिवळा
रंग घेऊन त्यांना बेमालूमपणे
एकमेकात मिसळवणे
आणि त्याचे फटकारे मारुन
रंगवलेले माझे चित्र बघतांना
तुझ्या रंगांपेक्षा जास्त माझ्याच
भावनांचे रंग दिसतात.
सगळे कसब ओततोस रे तू त्यात
माझा चेहरा,डोळे,पापण्या,ओठ,
गुलाबी गाल अन् गालावर येणारी
केसांची बट… सगळे जादूई
आणि चित्र रंगवून झाल्यावर
तूच फिदा होतो त्या चित्रावर.
जेव्हा अलवारपणे हात
फिरवतोस देखण्या चित्रावर.
चित्रांना स्पर्शतांना
तृप्तता दिसतेच तुझ्या चेहऱ्यावर
ओठांवरुन,गालावरुन फिरलेले
तुझे अलगद स्पर्श
कसे उमजतील
त्या निर्जीव चित्राला
मी एका कोपऱ्यातुन
बघत असते सगळे.
निर्जीव चित्राला न
उमजलेल्या स्पर्शांची अनुभूती घेत
माझे शरीर रंगवतोसच तू
नेहमी कुंचल्याने
एक अलवार स्पर्श मलाही अनुभवू दे
एक रंगभरला कुंचला
माझ्या मनावरही फिरव ना…..
निरोप
निरोप घेतांना तुझ्याही मनात
आठवणी आल्याच सरसर धावत
आसवेही जमली पापणीत
महत्प्रयासाने आहेस त्यांना अडवत
वरवर हसू दाखवत
किती वेळ थोपवणार पापणीत
माझ्या येतयं सगळं लक्षात
पण मी आहे हसू आवरत
अन् पापणीआडचे अश्रू लपवत.
माझा हात घेऊन हातात
मनात घेऊन यातना अनंत
निरोप देण्याच्या प्रतिक्षेत
दोन आसवे तुझी पाझरत
आली बघ माझ्या हातात
सोपे वाटले का तुला
सोडवणे हातातले हात
देहात अंतर पडत जातं
मन अजून गुंतत जातं…
फोटो
ये आज मी निवांत आहे.
तुझे फोटो काढू या
ती मला आवडलेली साडी नेसून
अन् केसांवर गजरा माळून.
तू ये म्हणण्याचाच अवकाश
मी मनाने पोहचते लगेच
शरीर जरा उशिरा.
फोटो शरीराचा निघणार असतो
त्याला तुझ्या हुकूमानूसार
सजवून
तुझ्या समोर बसताक्षणी
ही पोज नको,
केस थोडे समोर घे
नजर जरा तिरपी कर
मान थोडी झुकव
थोडी पाठमोरी हो
तुझ्या गोऱ्या पाठीवरचे
गोंदण दिसायला हवे
तर्जनी गालावर ठेव…..
तुझ्या न संपणाऱ्या सुचना
अन् मला न जमणारी पोज
फोटो निघतच नाही
सजलेल्या देहाचा
तुझ्या मनाने मात्र
तेवढ्या वेळात माझे
कित्येक फोटो काढले असतात….
निवांतपण
आज बोलला तू,
अग चल आता निवांत जगू
तू बघितलेले स्वप्न पूर्ण करु या आता.
करियर,नौकरीच्या मागे धावता धावता
तुझ्या स्वप्नांना वेळ देता आला नाही मान्य,
पण वेळ गेली नाही अजून
ये,बस निवांत
मी ऐकत राहिले तुझ्या निवांतपणाच्या गोष्टी
अरे कोणती,कुठली स्वप्ने?
काही स्वप्ने उडाली माझ्या पिलांबरोबर
अन् काही
तुझ्यासवे बघितलेली
त्याचे निर्माल्य झाले आता.
आपल्या निवांतपणासाठी थांबण्याएवढा
निवांतपणा नव्हता स्वप्नांजवळ.
मिलनाची आस
वारा बोले नदीला
किती ग झूरतेस सागरासाठी
चल माझ्या सवे
भेटण्या सागरा विरहणी
हर्षभरीत नदी सागराकडे निघाली
मिलनाची आस होतीच मनी
वाऱ्याच्या गतीने वाट चालू लागली
वाटेत भेटली आभाळाएवढी झाडे
तर काही पायाशी तृणही भेटले
कुठे ग निघाली सरिते
दोघांनीही विचारले
मी निघाली भेटण्या माझ्या सागराला
येईल परत लवकरच भेटण्या तुम्हा
झाडे आणि आभाळ हसले विषादाने
नाही येऊ शकणार वापस
तू सोडून सागरास
वेळ गेली नाही अजून
सांभाळ स्वतःस
आला राग नदीला
काही सांगू नका मला
गती वाढव रे वाऱ्या
वाट बघत असेल सागर
जरा गेली पुढे आली घंटा ऐकू मंदिराची
झाडावरच्या पक्ष्यांची किलबिलही ऐकली
नदीकिनारी काही मुले
वाळूची घरे बांधत
होती शैशव जपत
मी परतेन तेव्हा
घर झाले असेल त्यांचे बांधून
गेली अजून पुढे दिसले डोंगरदऱ्या
बघून त्यांना नदी बोलली
परतीचीही हीच वाट ना वाऱ्या
वारा बोले नदीला
एकदा करतो मी
सावध तुला सरिते
सागराशी मिलन होता.
नाही तुला परतीचा रस्ता
नदी थबकली जरा विसावली
मनी म्हणाली
काय म्हणावे वाऱ्याला
वेठीस धरतो सागराला
निघाली अजून पुढे
गात मिलनाचे गाणे
दिसला सागर नजरेने
बाहू पसरवले त्याने
नदी विरघळली बाहूत त्याच्या
कधी ना आली वापस
मिटवले स्वतःस
मिलनाच्या आशेने
एकांत
एखाद्या क्षणी निवांत
तुझ्याशी मिळावा एकांत
तुझ्याशी व्हावे एकरुप
गळून जावे आत्मभान
स्पर्शाचे इमले चढत
व्हावे तनूने तृप्त
पसरावा त्याचा गंध
जगावे जरा बेहोषीत
व्हावे धूंद त्यात
जगाचे ना उरावे भान
एक एकांत असाही मिळावा
मनाने जावे देहापलिकडे
गळून पडावे दोन तने
भेदूनी एकमेकांची मने
केवळ आत्म्याचे मिलन व्हावे
हरवून देहभान जावे
नाते
नात्यांचे शिवण उसवले
जमेल तिथे धागे लावले
जमेल तिथे ठिगळ लावले.
नाते दाद देईना विरलेले
अवघे आता नाते फाटले.
नाते जेव्हा निवडले
रंग,रुप फक्त बघितले
पोत बघायचे राहून गेले
धागे संपले,ठिगळ संपले
नात्यातील प्रेमही संपले.
कपड्यासारखे नाते मात्र
नाही दुसरे शोधता आले…
आभाळाचा तुकडा
आभाळाचा तुकडा
आला एकदा हाती
तारे आणि चंद्र
होते त्याचे संगती
मी म्हंटले आभाळा
कसा असा तुटला
चंद्र तारे घेऊन
आभाळातून कोसळला.
नाही साहू शकलो मी
अमावस्येची रात
मला लपवून ठेवले तिने
दूर दूर एका मेघात
मी लपून मेघात
माझी धरती अंधारात
म्हणून मी कोसळलो
धरती ताऱ्यांचा धरुन हात.
मला वाटले नवल
आभाळाच्या तुकड्याचे
धरतीवर एवढे वात्सल्य
तुकडे केले स्वतःचे……..
क्षितिजापलिकडे
सुरकुत्या
चेहऱ्यावर सुरकत्या घेऊन
तू आणि मी
खूप वर्षानंतर भेटलो
आधीचे एकमेकांचे
आठवत चेहरे
बघतांना एकमेकांकडे
नजर जाणवलीच
अनोळखी जरा
पण तुझ्या सुरकुत्या
असलेल्या चेहऱ्यावर
उमटलेली
हास्याची लकेर बघितली
तशीच ओळखीची
अन्
आठवले तुझे शब्द
वेडे, कधी म्हातारे
होत नाही.
ते तरुणच असते
तुझ्यामाझ्या ह्दयासारखे……
कविता
एक कविता आकार घेऊ पाहत होती
आतल्या आत
खोल ह्दयाच्या कप्प्यात.
शब्द साथ देत नव्हते.
थकले ते.
हे काय नेहमीचेच
एक झाली की दुसरी
दुसरी झाली की तिसरी
आम्ही नाही येणार आता
बघू तुझी कविता कशी जन्म घेते
शब्दांनी दिली धमकी
शब्दांशिवाय कविता
कशी आता प्रसवावी
ठरवले कवितेने
शब्द नाही मला अडवणार
डोळ्यांवाटे आसवांसोबत
आली ती बाहेर
मी विसरावे कैसे
रातराणीचा गंध
पुनवेचा चंद्र
अन् तुझ्या स्मरणातलं
चांदणं…..
मी विसरावे कैसे
पावसाची सर
तुझे सरीत चिंबणे
आणि थरथरत मला बिलगणे
मी विसरावे कैसे
पहाटेचे दव
त्यात भिजून तुझे लाजणे
अन् लटकेच रुसणे
मी विसरावे कैसे
सागराचा तट
तिथे बाहूपाशात माझ्या
घेतलेल्या आणाभाका
मी विसरावे कैसे
सांग सखे तूच आता
हात माझा विलग करता
थरथरणारे ओठ तुझे
पाझरणारे डोळे तुझे
मी विसरावे कैसे
स्वप्नांचा बाजार- बालपण कविता
रंगवला एकदा मनात
सगळे स्वप्ने मांडत
गेली एका रांगेत
मांडून झाली स्वप्ने रांगेत
अन् रंगले मी स्वप्नात
हे माझे पहिले स्वप्न
घेऊन गेले बालपणात
मिळेल का बालपण
स्वप्नांच्या बाजारात
नाही म्हणून उत्तर आले
गेली मग दुसऱ्या स्वप्नात
यौवनातली स्वप्नेही मिळतील
का बाजारात
होती जेव्हा यौवनात
तेव्हा नाही जगली तू
घर,करियर,मुले
फक्त रमली होतीस संसारात
आता विसर बालपण,
अन् नाही तू यौवनात
तिसरे काही स्वप्न असेल तर
ते माग बाजारात.
मी बसले आठवत
स्वप्न माझे रंगीत
मला बनायचे फुलपाखरुबालपण
आणि संचार करायचा मुक्त
घेऊन फुलांचा सुगंध
करायचे स्वतःला सुगंधीत
इंद्रधनुष्याला स्पर्शन्या
पोहचायचे मला नभात
हे स्वप्न तुझे तू
रंगव फक्त तुझ्या मनात
फुलपाखराचा सुगंध
इंद्रधनुष्याचे रंग
नाही मिळेल
स्वप्नांच्या बाजारात.
मौन आणि शब्द
तू उदास,अस्वस्थ
मी ही शांत
मौनात हरवले
सगळे शब्द
अन् शब्दाला
आले मौनत्व
भास,आभास
अवतीभवती
खरेखोटे
समजण्यापलीकडले
मौनालाही अर्थ असतो
अन् शब्दही असतात निरर्थक
तुला माझी अन् मला तुझी
भाषा समजते मौनातलीच…..
पण तरीही
कळले नाही
मौनातली
निःशब्दता खरी
कि शब्दातले मौनत्व
दिनकर
आज दिनकर गेला विसरुन
पहाटवेळी शशिला झाकोळणं
शशिच दिसत आहे नभी
लेवून चांदण्यांच कोंदणं
रात्र तशीच आहे
स्वप्नांनी लपेटलेली.
शशिधराला बिलगून
थांब जरा दिनकरा अजून
अर्धवट आहेत स्वप्नं
त्यांना उमलू दे जरा
नको जागवू तू उजाडून…
मित्र आणि प्रियकर आणि मैत्रीण आणि प्रेयसी हे नात्यांचे वेगवेगळे अंग आहेत हे कुणालाच जाणून घ्यायचे नसते.स्त्रीच्या मनात एक मित्र अन् पुरुषाच्या मनात एक मैत्रीण असू शकते.
मित्रा
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










