सुखा
सुखदाने फोटो पर्समध्ये ठेवला.
सुखदाने संपदाच्या हातून ताट घेतले आणि जेवू लागली. संपदाला आश्चर्य वाटले.सुखदाने ना आईबाबा जेवले का विचारले ना संपदाला तू जेवली का विचारले.
संपदा सुखदाचे जेवण आटोपल्यावर ताट ठेऊन परत आली.
सगळ्यांची जेवणे आटोपली.संपदा झोपायला खोलीत आली तर परत तेच. सुखदा मानसच्या फोटोसोबत बोलत होती.
सुखदा काय खेळ मांडलास ग?
आम्ही सगळे तुझ्या काळजीत आहोत अन् तू काहीच झाले नाही अशा आविर्भावात वावरत आहेस.ठेव तो फोटो आधी बाजूला.
सुखाने रागाने संपदाकडे बघितले.
सुखदा संपदाशी यापूर्वी कधीही असे वागायची नाही. वसुधाताई नौकरी करायच्या.संपदानेच सुखदाचा लहान असल्यापासून सांभाळ केला होता.
सुखा अग मानसने तुला नाकारले. तुला झिडकारले त्याने.
पड त्याच्या जाळ्यातून बाहेर. विसर त्याला सुखा.
तो तुझ्या लायकीचा नाही आहे.तुला फसवून बायको मुलीत गुंग आहे तो.
ताई तू कितीही प्रयत्न कर.मी चित्रकार मानसला विसरणार नाही. आणि सतत तू त्यांनी मला फसविले असे म्हणू नकोस. काही फसवले नाही.आम्ही नेहमी भेटतो.मी त्यांना बोलवेन तेव्हा येतात. मी त्यांच्या कलेची प्रेरणा आहे आणि तुम्ही सगळे मला त्यांच्यापासून दूर व्हायला सांगताय.शक्य नाही.
अग पण तो तुला ओळखत नाही असे म्हणाला.
तुम्हाला घाबरुन ते असे म्हणाले असतील.
बरं सुखा तू त्यांना उद्या आपल्या घरी बोलव. ते आले तर तू म्हणशील ते खरे.
त्यांना कुठे वेळ आहे ग इकडेतिकडे फिरायला?मला वाटेल तेव्हा मी बोलवेन.
सुखदाने घरात सगळ्यांचीच झोप उडवली होती.
हळूहळू सुखदा विसरेल असा विचार करुन सध्यातरी सगळ्यांनी शांत राहायचे ठरवले.
संपदा तिच्या घरी वापस गेली.सुखदा नेहमीसारखी आॕफिसमध्ये जायची.पण आता तिचे खोलीत बंद करुन राहणे वाढले होते. कधी तिच्या लग्नाचा विषय काढला कि चिडायची. दिवस जात होते,सुखदाला आता मैत्रिणीही नव्हत्या. तिनेच तोडली सगळ्यांशी मैत्री .
तिला घरीदारी,आॕफिसमध्ये एकटेच राहायला आवडत होते.
ती आणि मानस.तिच्या विचारचक्रात तिसऱ्याला जागा नव्हतीच.
संपदा फोनवर,घरी भेटून तिला समजवण्याचा प्रयत्न करायची पण सुखदावर परिणाम नव्हता होत. तिला रागावून बघितले, प्रेमाने समजवले पण तिचा हट्ट कायम होता.
सुखदा भ्रमातून बाहेर ये,तुझा आभास आहे सगळा.
मानस मजेत संसार करत आहे.तू मात्र रोज जळते आहेस त्याच्यासाठी. त्याचे प्रेम असते तुझ्यावर तर तो भेटला नसता का तुला?
आम्ही भेटतो नेहमी माझे आॕफिस सुटल्यावर. त्यांचे खूप प्रेम आहे माझ्यावर.कालच त्यांनी माझे एक चित्र बनवायला घेतले. मी मंगळसुत्र,कपाळावर टिकली,हातात हिरवा चूडा, केसांचा अंबाडा त्यावर गजरा अशी नववारीत झाडाला टेकून उभी आहे त्यांची वाट बघत . चित्र पूर्ण झाले कि मी दाखवेन तुला.
आणि तुम्ही जर सतत चित्रकार मानसबद्दल अपशब्द बोलत असणार तर मी कुणाशीही बोलणार नाही.
क्रमशः
सुखदाच्या आयुष्यात पुढे काय होते….वाचा पुढील लिंकवर
प्रिती गजभिये
प्रिय वाचक, लेखक तुम्हीही शब्दपर्णवर लिखाण पाठवू शकता.






सर्व भाग खूप छान