सुमीला आठवले ,बऱ्याच दिवसानंतर नवरा आला .तत्पूर्वी माझ्याकडे त्याचे मोठे भाऊ वहिनी व पुतणी गावावरून आलेले होते. मी नवऱ्याला एवढे दिवस काय करत होते? कुठे राहत होते ?
इत्यादी प्रश्न विचारले.त्यावरून तो उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागला. मी परत परत विचारल्यानंतर त्याने भांडायला सुरुवात केली. त्या रात्री आमचे या मुद्द्यावरून चांगलेच भांडण झाले. मी जाब विचारायला शिकले होते. तो म्हणाला
तू मला मी जाण्यावरून जर भांडण करत असेल तर मला तुझ्यासोबत राहावयाचे नाही. मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे.
त्यावेळी मला पायाखालची जमीन सरकल्या सारखी वाटले.माझ्यासाठी तर तो सर्वकाही होता.तो जरी बाहेरगावी असला तरी तो येण्याची वाट बघत असे. स्वतःला मुलांच्या संगोपनात मध्ये व नोकरी मध्ये जरी गुंतवून घेतले असले तरी रोज सायंकाळी त्याची मला आठवण यायची. मला त्याच्याशिवाय खूप एकटे एकटे वाटे. त्यावरून प्रथमच मी अशाप्रकारे त्याला जाब विचारला होता आणि त्याचे उत्तर मला अशाप्रकारे मिळाले होते. पण यावेळी मी त्यावर काही बोलले नाही.
पुतणी च्या लग्नाची बोलणी सुरू होती. एके दिवशी दुपारी बाहेर सर्वजण निवांत बसले असताना त्याने विषय काढला, तो मला म्हणाला,
तू माझ्या पुतणीच्या लग्नाला किती पैसे देणार आहेस?
या अनपेक्षित प्रश्नाने मी गोंधळून गेले. कारण समोरच जाऊ, भासरे, पुतणी बसले होते. मी म्हणाले,
बघू नंतर आधी लग्न तर ठरु द्या. तो म्हणाला, आत्ताच सर्वांच्या समोर सांग. त्यावरुन परत आमचे भांडण झाले. तो म्हणाला
मी तुझ्यासोबत आता राहणार नाही .हे माझे नातेवाईक आहेत .मी ह्यांना आत्ताच गावाकडे पाठवून देतो .मग बघतो तू कशी एकटी राहते आणि कशी नोकरी करतेस ते . तुझा आता आमच्याशी काही संबंध नाही.
ते सर्व आत गेले आणि गप्पा करू लागले.
तसेही माझ्या सासरच्यांना माझ्याबद्दल आपुलकी वगैरे काही वाटत नव्हती. त्यांना फक्त पैसा हवा होता. तो त्याच्या कडून मिळत होता. मग तो माझ्याशी कसाही का वागेना. त्यांना त्याचे काही घेणेदेणे नव्हते.
माझा दहा वर्षाचा मोठा मुलगा माझ्याजवळ येऊन म्हणाला,
आई तू बाबांना का सोडून देत नाहीस? तू त्यांना सोडून दे. आपण त्यांच्याशिवाय चांगले राहू.
त्याचे अजाणत्या वयातील ते बोल माझ्या काळजाला भिडले. मुलांना पण आमच्यातील भांडणाचा, तणावाचा खूप त्रास होत होता. त्याच वेळी मी निश्चय केला ,त्याला घटस्फोट देण्याचा. दुसऱ्या दिवशी मी माझा निर्णय त्याला सांगितला .त्याला हे अनपेक्षित होते.तो रागाने लालबुंद झाला.
तुझ्यासोबत कोणी लग्न केले असते? मी तुझ्यावर उपकार केले. तुला शिकविले आणि नोकरी लावून दिली. आणि ..
.खूप काही बरळत होता. मी मध्ये काही बोलले नाही. काही बोलले असते तर अंगावर धावून आला असता मारायला.
जवळपास पंधरा वर्षाचा संसार संपवताना माझे अर्धे शरीर लुळे पडल्यासारखे निर्जीव वाटत होते. पण काही झाले तरी निर्णय बदलायचा नाही असे मी ठाम पणे ठरवले होते.
मी माझ्या मनाला समजावत होते,
” सुमे, तू आजवर त्याच्या सोबत होतीस. जो कधीच तुझा नव्हता. तुझा निर्णय योग्य आहे. किती दिवस तु हे लुळे पांगळे नात्याचे ओझे घेऊन जगणार आहेस? यात फक्त तुझे समर्पण समाविष्ट आहे. पण त्याचे काय? त्याला बाहेर राहायला आवडते. तर त्याला बाहेरच्या साठी कायमचा सोडून दे. उगाच रोजच्या मनस्तापात जळत मरण्यापेक्षा एकदाचे ते संपवून जगणे केव्हाही चांगले.”
माझे दुसरे मन म्हणे,” काय चांगले ग…. या जगात त्याच्या शिवाय मला जवळचे कोण आहे. त्याच्यामुळेच तर मला किती नाते मिळाले .सुन, काकू ,जाऊ ,वहीणी, मामी इत्यादी. आता ते संपणार सर्व…”
माहेरी तर बाबा पण गेलेले .आता फक्त आई आणि बहीण. छोटी चे पण लग्न झालेले . आई तर माझ्याकडेच राहते .बहिण तर सवती सारखीच . समोर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारी. सगळं संपलंच ग माझं. सासर …माहेर.
..डोक्यात सर्व गुंता झाला होता विचारांचा
क्रमशः
मस्त
सुमीच्या आयुष्याचा गुंता .दर्जेदार लिखाण
गुंता कमी झाल्यासारखा वाटतो की लगेच दुसरा तयार.
छान कादंबरी