स्वप्न तहानलेले
भाग-११
ज्योती रामटेके
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
दिवस चालले होते.कनक, आराधना सोबतच राहायचे,खेळायचे. स्नेहलता सावरत होती. तो काळ तसा जुनाच.त्या मानाने यांचे घर पुढारलेले.मात्र समाजाच्या नजरा तिच्याकडे खिळून असायच्या. तिचा दोष नसताना तिला शिक्षा मिळाली होती. कुणी काय म्हणेल या भितीपोटी आक्काने स्वतःच्या भोवती कोश निर्माण केला.
अलिप्त राहायची.माझ्याच सोबत असे का घडले याचा विचार करायची. प्रेमळ आक्का हळूहळू उर्मट बनत गेली. तिने स्वतःला जरा जास्तच कणखर बनवले. वाड्यात फटकून वागू लागली.
सर्वांचा विचार करणारी आक्का आता फक्त स्वतःचा विचार करताना दिसत होती. कुणाच्या भावनेची तिला जाणीव राहिली नव्हती. पण कनक वर खूप प्रेम करायची. त्याला सोडायची नाही.कनक दिवसभर तिच्या मागे असायचा.
तिच्या शब्दाबाहेर तो चुकूनही जात नसे. तिला दुःख होईल असे आयुष्यात काही करायचे नाही हे लहानपणीच ठरवले कनकने. आई नंतर एवढे विशाल प्रेम आक्का कडून त्याला मिळत होते.
वाड्यात आईसोबत आंनदी येऊ लागली. स्वभावाने सालस
गोड आंनदी कनकची लवकरच मैत्रीण बनली.आंनदी रोज आईसोबत येत होती. आता कनक अजूनच खूष दिसू लागला. आराधना,कनक,आंनदी दिवसभर वाड्यात खेळायचे.
कनक मधला बदल सर्वांना सुखावत होता. आईविना पोरका झाला होता तो.पण आक्का आईने कम त्याला मुलासारखे सांभाळत होती.आंनदीचा वाड्यात असणारा वावर आक्काला आवडायचा नाही. पण ती आली कि कनक जेवायचा, खेळायचा, अभ्यास करायचा. दिवसभर त्याचा चेहरा फुललेला दिसायचा.
आंनदी सुट्टीत मामाकडे जायची.कनकला अजिबात करमायचे नाही.आराधना पेक्षा तो आंनदीचे ऐकायचा.
आक्काची नजर असायची. आता तिला आंनदीचा राग येऊ लागला.वाड्यात तिचे येणे कसे बंद करायचे हा विचार तिच्या मनात येत होता.तिच्या आईला बंद करणे शक्य नव्हते. तिच्या हातच्या स्वयंपाकाची वाड्यात सर्वांना सवय झाली होती.
कनकला ती त्याच्या आवडीचे पदार्थ करून खावू घालायची.बघू नंतर, म्हणून आक्का शांत बसली.
आराधनाला बरेचदा कनकचे वागणे आवडायचे नाही.
पण तो खूष दिसला कि तिला चांगले वाटायचे.
आपल्या पेक्षा आंनदी सोबत खेळायला कनकला मजा येते हे आराधनाला कळले होते. कनकच्या प्रत्येक गोष्टीत आंनदीचा सहभाग असायचा. झोपाळ्यावर देखील आंनदी लागायची त्याला.
दिवस चालले होते. तिघे मोठी होत होती. वाड्यात प्रत्येक सणाला आंनदी हजर असायची. आता तिला आक्काच्या स्वभावाची जाणीव होऊ लागली. तिने कनकला बरेचदा आक्काच्या स्वभावाबद्दल विचारले. कनकला पण कळायचे सारे.तो आंनदीला समजावून सांगायचा.
तो नेहमी म्हणायचा.परिस्थितीने स्वभावात बदल होतो ग. तरुण वयात खूप भोगले तिने.तिच्या वाट्याला एकटेपणा भरपूर आला.वाड्यात जिवाभावाची भरपूर लोक होती. पण तरीही तिला एकटेपणा जाणवत होता. आपल्या हक्काच कुणीतरी असाव,ही भावना खरे तर सुखावणारी.पण ते सुख प्रत्येकाला नाही मिळत.
बाबाकडे जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांचा एकटेपणा चेहऱ्यावर दिसतो. वाईट वाटते ग त्यांना बघून. त्यांनी दुसरे लग्न करायला हवे होते. आयुष्यात जोडीदार हवाच. आक्का, बाबाकडे बघितले तर ते प्रकर्षाने जाणवते.
आक्काचे सासरी पटायचे नाही. पण हळूहळू होईल ठीक ही आशा तिच्या मनाला उभारी देत राहायची . ते बकुळीचे झाड बघ,आक्का ने लावले होते.ती माहेरी आली कि रोज त्याचा गजरा माळायची असे काकु सांगत होती.
आता त्या फुलांना स्पर्श सुद्धा करत नाही ती.
बाबांनी,आक्का ने मनमुराद जगाव असे वाटते.पण ते तरी काय करणार, त्यांच्या संसाराचा डाव उधळून गेला.संसाराचे स्वप्न नियतीच्या जाळयात उध्वस्त झाले. एकट्याने जगणे कठीण असते हे आता मोठे झाल्यावर कळत आहे.
आराधनाला सर्व कळत होते. तिला लहानपणापासून कनक आवडायचा. आक्का बोलून नाही दाखवायची पण तिने मनात कनक आणि आराधना ही दोन नावे कोरुन ठेवली होती.
आराधनाला आईच्या मनातले कळत होते.आंनदी आणि कनकचे प्रेम आराधनाला कळले होते. कनक सुखी असावा हीच मनोमनी तिची ईच्छा होती.
कनकला तिच्या मनातले भाव कळायचे. आंनदीला तर तिच्या मनातील भावनेची जाणीव होतीच.तिने तसे कनकला बोलून दाखवले. आक्काला हे आवडणार नाही हे दोघांना माहीत होते. पण आक्काला मी तयार करणारच असा ठाम विश्वास कनकला होता.
आराधनाचे स्वप्न हवेत विरले होते.आक्काला आराधनाचे मन कळत होते.
आराधना गुणगुणायची त्या गीताचा अर्थ आक्काला कळायचा.
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी संसार मांडते
जे प्रेम आक्काला मिळाले नाही ते संसारप्रेम आराधनाला पारखे होऊ नये असे आक्काला वाटायचे.आराधना आईची समजूत काढायची.
आई कुणाचे प्रेम जबरदस्तीने नाही मिळत. तू विसर सर्व. त्या दोघांच्या प्रेमाची परीक्षा घेऊ नको.आराधना सांगायची.
तू कनकला सांभाळले याचा मोबदला तू घेऊ पाहत आहेस.
माझ्या सुखासाठी त्याला दुःखी करण्यात काय अर्थ आहे.आंनदीसोबत खूष आहे तो.
आक्का तर जिद्दीला पेटली होती.कनकचे आराधनाशीच लग्न होणार हे तिने अधोरेखित केले होते
काळ सरकत होता.विश्वासराव थकले होते आता. काही दिवसात ते देवाघरी गेले. वाडा पोरका झाला.आक्का पुन्हा एकटी पडली.विश्वासरावांचा मोठा आधार होता तिला.काळ समोर सरकत होता.
क्रमशः
Previous Link
https://marathi.shabdaparna.in/१०-स्वप्न
Next Part
https://marathi.shabdaparna.in/१२-स्वप्न-तहानलेले
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




छान कथा👌
छान वळण घेतलं कथेनी.
आक्काचा डावपेच चांगला मांडला.
Sundr