१०- स्वप्न तहानलेले
ज्योती रामटेके
कनकच्या अधुऱ्या प्रेमकथेची ही कथामालिका.
आक्काच्या दुराग्रही स्वभावामुळे कनक-आनंदीचे प्रेम सफल होत नाही.
आक्काचा स्वभाव दुराग्रही का बनतो…वाचा पुढील भागात.
१०- स्वप्न तहानलेले
आक्काचा संसार
खरेच वाड्याचे रुप किती बदलले होते.सदैव वाड्यात गुंजन करणारे आवाज काळाच्या ओघात निघून गेले.
समोरच विश्वासराव यांचा सोनेरी फ्रेम असलेला रुबाबदार फोटो दिमाखात भिंतीवर टांगलेला होता.त्यांच्या आजुबाजुला कुटुंबातील सर्वांचे फोटो लावून होते. आंनदी एकसारखी फोटोकडे बघत होती.
विश्वासराव नावाप्रमाणेच होते.गावात त्यांच्या शब्दाला किंमत होती. घरी शेती,वाडी अमाप होती.नोकर चाकर यांचा वाड्यात राबता असे.
आंनदीचे वडील दिवाणजी होते. सर्व कारभार तेच बघायचे.अतिशय प्रामाणिक म्हणून त्यांची ख्याती होती. आंनदीची आई तिथे स्वयंपाक करायची. सुगरण होती ती. तिच्या हाताला वेगळीच चव होती. विश्वासराव नेहमी म्हणायचे,
बाई तुम्ही पाण्याला जरी फोडणी दिली तरी ते पण चविष्ट लागेल.
कनकची आई, गोदावरी.. नावाप्रमाणेच होती ती.
पवित्र आणि प्रेमळ, घरात सर्वांना आवडणारी. माहेर सामान्य घरातले पण तिच्या सुसंस्कृत स्वभावाने विश्वासरावांना भुरळ पाडली.
आपल्या गोपालच्या आयुष्यात गोदावरी आली तर? सोने होईल त्याच्या आयुष्याचे. वाड्यात शोभून दिसेल तर फक्त गोदावरी. विश्वासरावांनी पंसत केल्यावर बाकी लोकांचा प्रश्नच नव्हता.
श्रीमंत नातेवाईकांनी माघारी कुरबुर केली पण त्याचा फारसा फरक पडला नाही. कुणाच्या विरोधाला न जुमानता दोघांचे लग्न झाले.
गोदावरी आल्यापासूनच वाड्याला नवीन रुप आले. वाडा अजूनच खुलून दिसू लागला.
वाड्याचे अंगण रोज रांगोळीने सुशोभित दिसत होते.वाडा आनंदाने न्हाऊन निघत होता.
आपल्या प्रेमाचा रंग भरला तिने वाड्यात. दिवस चालले होते.लवकरच कनकचा जन्म झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते.
कनक घरात सर्वात लाडका.
आक्का सर्वांची लाडकी बहीण. दिवाळी आणि राखी पौर्णिमेला हमखास माहेरी येत होती. आक्काचा दरारा होता वाड्यात. दिवाळी झाली कि तिला घ्यायला विश्वासराव जायचे.
आज स्नेहलता ताई येणार म्हणून वाड्यात सकाळीच घाई.. गडबड सुरू होत असे.
आक्का सर्वात मोठी.श्रीमंत घरात लग्न झाले.लग्नानंतर लवकर मुल नाही झाले तिला. घरात तिला त्रास होवू लागला.
काही वर्षांनंतर आराधना झाली.इतक्या उशीराने मुल झाले आणि ती पण मुलगी. घरात कुणाला आंनद नाही झाला.आक्काच्या माहेरी मात्र सर्व आनंदात होते.
आक्काचा कनक मध्ये खूप जीव होता. ती माहेरी आली कि कनक तिच्या जवळच राहायचा.
कनक चार वर्षांचा झाला आणि त्याची आई आजारी पडू लागली.
शहरातील प्रसिद्ध डॉक्टर झाले पण गोदावरीचा आजार बळावत होता. अमाप पैसा असूनही तो कामी आला नाही.
एक दिवस सर्वांना सोडून ती निघून गेली. कनक सहा वर्षांचा होता. त्याला हे काय सुरू आहे कळत नव्हते. आईला घरभर शोधायचा तो आणि रडायचा.
आई आपल्याला सोडून कुठे गेली असेल हे त्याला कळत नव्हते.
आई.. आई करत झोपी जायचा. तो काळ त्याच्यासाठी कठीण होता.
आक्काने त्याला त्या काळात प्रेमाने सांभाळले.तो तिच्या शिवाय राहत नव्हता. आराधना, आक्का सतत त्याच्या आजूबाजूला असायच्या.
गोपालने दुसरे लग्न करावे म्हणून विश्वासरावांनी प्रयत्न केले. पण कनक आपल्या पासून दुर जाईल ही भीती गोपलला वाटायची.
गोदावरीची जागा दुसरी स्त्री नाहीच घेऊ शकणार हे त्याला माहीत होते. त्याच्या मनात फक्त गोदावरी असायची. शेवटी सर्वांनी तो विषय संपवला.
कनक आक्काला आई म्हणू लागला. कनकला सोडून सासरी जायला आक्काला जिवावर येत होते. जायचे नाव काढले कि तो रडायचा.
काही दिवसांनी आक्का सासरी गेली. घरात नवीन स्त्री चा वावर दिसत होता, स्त्री कसली तरुण मुलगी होती ती. नवरा हळूच म्हणाला,
तू पण राहू शकतेस. मला मुलगा हवा. तुला दुसरे मुल होणार नाही हे तर तुला माहित आहेच नं. स्नेहलताच्या पायाखालची जमीन सरकली.
किती स्वार्थी आहे हा मनुष्य. कोर्टाच्या जाळ्यात अडकायला नको म्हणून घरातच हार टाकून मोकळा झाला होता तो. गरिबाची मुलगी असणार. श्रीमंतीच्या जाळयात अडकली.
आक्का तिथून निघून आली.आधीच निष्फळ असणारे नाते आता कायमचे संपले होते. आक्का रडायची.
संसार तुटल्याचे दुःख होते तिला. कोर्टाने न्याय मिळेल हे तिला माहीत होते.
विश्वासराव तिच्या पाठीशी होते.
पण हे सर्व तिला नको होते. मनातून उतरलेले नाते नकोच.ते संपलेले केव्हाही चांगले. आधी सारखे फुलत नाही ते. कधीतरी मरगळ येणारच हे नक्की.
क्रमशः
https://marathi.shabdaparna.in/९-स्वप्न
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





उत्तम कथा मालिका.
आक्काच खडतर आयुष्य समजल.
Sundr
Chhan
छान कथा