विधिलिखित भाग ६

विधिलिखित भाग ६

 

पण जावेदच्या मनापर्यंत कसे पोहचायचे? त्याचे अंतरंग कसे जाणून घेणार?
वंदनाताईंना काही कळत नव्हते.
आता त्यांनी सरळ जावेदशीच बोलायचे ठरवले.
बँकेत गेल्या आणि  त्याच्या  केबिनमध्ये जाऊन बसल्या. एव्हाना ह्या बाई आपल्याशी बोलायचा खूप प्रयत्न करतात आणि उगाचच चौकशा करतात हे जावेदच्या लक्षात आले होते.
वंदनाताई त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसल्या आणि जावेदला विचारले,
तुम्ही उर्वशीला ओळखता?’
जावेद एका फाॕर्मवर सही करत होता.
वंदनाताईंचे बोलणे ऐकून त्याचा हात जागच्या जागी थबकला.
या स्त्रीला काय उत्तर देऊ? कोण असणार ह्या? यांना उर्वशी कशी माहित?
एवढे सगळे प्रश्न मनात निर्माण  झाले. त्याने विचारले आपण?
‘मी उर्वशीची आई.’
ऐकून जावेद गडबडला.
क्षणभर त्याच्या मनात आले,
यांच्यामुळेच उर्वशी माझी नाही होऊ शकली.’
पण लगेच तो उभा राहिला. आणि केबिन बाहेर आला.
आता माझा आणि उर्वशीचा संबंधच काय? ह्या का मला सांगत आहेत ?  
वंदनाताई जावेदचे अनपेक्षित  वागणे बघून संकोचल्या. त्या तिथेच बसून राहिल्या जरा वेळ जावेदची वाट बघत.
जावेद परत आत आला नाही.
त्याच्या डोक्यात  विचारांचा कोलाहल सुरू होता.
कित्येक वर्षापासून मी उर्वशीला विसरण्याचा प्रयत्न करतोय, ती माझ्या मनातून तसुभरही हलली नाही. धृवताऱ्यासारखे अढळ स्थान आहे तिचे माझ्या  ह्दयात. पण हे माझ्यापुरते. जगासाठी नाही.
पाच वर्षापूर्वीच ती दूर गेली माझ्यापासून.
तिला  आता तिचा स्वतःचा संसार आहे.कदाचित् त्या दोघांचे मुलही असेल.
छे.छे. ह्या का मला आठवण करुन देत आहेत?
का माझ्या  ह्दयाला कासावीस करत आहेत?
वंदनाताईं  नंतर  आठदहा दिवस बँकेत गेल्या नाहीत.त्यांची हिम्मतच झाली नाही.
जावेद समोर जाण्याचे धैर्य होत नव्हते त्यांना.
पण उर्वशीचे आयुष्य जोडीदाराशिवाय कसे जाईल? आणि जावेदशिवाय ती कुणाचा स्वीकार करणार नाही. हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता.
जावेद उर्वशीमुळेच अविवाहित असणार हे त्यांनी ताडले होते.
दहाएक दिवसांनी त्या परत बँकेत गेल्या.
जावेद यायचाच होता बँकेत.त्यांना  केबिनमध्ये वाट बघायला सांगण्यात आले.जावेद आल्यावर त्याच्याशी काय बोलायचे याचा आराखडा बांधत त्या बसून होत्या.
जावेद आला.वंदनाताईंना बघून त्याला आश्चर्य वाटले.त्या परत येणार नाहीत हा त्याचा अंदाज साफ चुकला होता. तो त्यांच्या कडे दुर्लक्ष करीत त्याच्या कामात बिझी झाला. किमान तसे दाखवत राहिला.
वंदनाताईंनी सुरूवात केली.
‘जावेद मला माफ करा’
जावेदने  बघितले त्यांच्या कडे पण बोलला काहीच नाही
वंदनाताई बोलत राहिल्या.
‘ माझ्यामुळेच तुमचे दोघांचे लग्न झाले नाही.
जावेद म्हणाला,
मला माहित आहे. तुम्ही  या आता.
वंदनाताई  थांबल्या नाहीत.
‘ जावेद  प्लीज आज मला थांबवू नका.मला पूर्ण बोलू द्या. मी अक्षरशः जबरदस्तीने उर्वशीचे लग्न लावून दिले तिच्या इच्छेविरुद्ध,तिच्या मनाचा विचार न करता. पण ती तुम्हाला कधीही विसरु शकली नाही. लग्न झाल्यावर तिच्या पतीचा मान ठेवायची,आदर करायची पण प्रेम तिने फक्त तुमच्यावर केले.मी तिची आई आहे माझ्या लेकीची प्रत्येक भावना मी समजू शकते.
जावेदला आता ऐकणे असह्य व्हायला आले होते.त्याने खुणेनेच त्यांना थांबायला  सांगितले पण त्या थांबल्या नाही,
‘ जावेद मी अंदाज लावू शकते तुम्हाला माझा किती राग येत असेल त्याचा.  पण  तेव्हाच्या परिस्थितीनुसार योग्य वाटेल तो निर्णय मला घ्यावा लागला. मी जर हिंमत केली असती तर….पण एकदा घडून गेल्यावर  जर तर ला काही अर्थ नसतो.
पण आता तुम्ही मला हे सगळे का सांगत आहात? जावेद बोलला.
वंदनाताई उत्तरल्या,
माझ्या स्वार्थापोटी.
 उर्वशीचे लग्न ज्याच्याशी झाले तो मिहिर आता या जगात नाही आहे. लग्नानंतर वर्षभरातच मिहिर गेला.उर्वशी आणि  बाळाला सोडून.
वंदनाताई एवढे बोलून थांबल्या. खूप थकल्यासारखे वाटले त्यांना.कशातरी खुर्चीचा आधार घेत उभ्या राहिल्या आणि केबिनबाहेर आल्या.
वंदनाताईंचे बोलणे ऐकून जावेद सुन्न झाला.
त्याच्या मनात आले,
‘ कसे सहन केले असेल उर्वशीने?
त्याला शेवटची बघितलेली,नवरीच्या वेशातील, सजलेली उर्वशी  आणि तिच्या बाजूला उभा असलेला नवरदेव आठवले.
जावेद बँकतून घरी गेला तरी डोक्यातून उर्वशीच्या आईने सांगितले जात नव्हते.
कशी असेल उर्वशी?
त्याच्या  ह्दयात कालवाकालव झाली.
उर्वशी सोबत नसूनही सोबत असलेली.किती आठवणी आहेत तिच्या जावेदजवळ. जावेदला आठवली पहिल्यांदा बघितलेली उर्वशी.
एकेक आठवण आठवत राहिला तो.
उर्वशीला पहिल्यांदा पाहताक्षणीच प्रेमात पडलो मी.
तन आणि मन दोन्हीही सारखेच सुंदर असलेली उर्वशी कुणालाही भूरळ पडेल अशीच आहे.
माझ्यावर तिचे प्रेम असणे खूप रोमांचित करायचे मला.
प्रेमाची हळूवार भावना तिच्याचमुळे अनुभवली.
मला भेटायला किती व्याकुळ असायची ती.
आमच्या भेटी,घेतलेल्या शपथा,तिचे लटके रागावणे सगळे कसे जसेच्या तसे समोर येते.
उर्वशी आणि  माझ्या जातीत खूप अंतर होते.
पण आपल्या प्रेमाने आपण हे अंतर मिटवू असा उर्वशीला माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता. मग असे का झाले? तिची तिच्या आईवर खूप श्रद्धा होती पण आई  तिचे प्रेम समजून घेऊ शकली नाही.
वंदनाताई बँकेतून घरी परतल्या. जावेदला सगळे सांगून मन हलके झाल्यासारखे वाटत होते पण तब्येत जरा अस्वस्थ वाटत होती. जरावेळ झोपल्या.
झोपेतून उठल्या तेव्हा अंगात चांगलाच ताप भरला होता.
जावेदची अस्वस्थता दिवसागणिक वाढत होती.
वंदनाताई पण बँकेत आठदहा  दिवसात फिरकल्या नव्हत्या.
तो आता वाट बघत होता त्यांची.
त्याला घर माहित होते त्यांचे.
जावे का घरी? बघू,अजून दोन तीन दिवस नाही आल्या तर जाऊ.
असा त्याने विचार केला.
चार पाच दिवस झाले तरी वंदनाताई बँकेत आल्या नाही मग मात्र जावेदला संयम ठेवणे अशक्य वाटले.पत्ता आठवत आठवत तो वंदनाताईंच्या घरी पोहचला.
वंदनाताईंनी दार उघडले. समोर जावेदला बघून गडबडल्या.त्यांना हा  सुखद धक्काच होता.
जावेद घरी येईल ही आशा नव्हती त्यांना.
जावेदला त्यांनी घरात घेतले. वंदनाताईकडे बघून त्यांची तब्येत बरी नाही हे जावेदच्या लक्षात आले.
त्यांनी तब्येतीची विचारपूस केली.
बाकी  तो त्याला जे बोलायचे ते बोलू शकत नव्हता.
वंदनाताईंनीच विषय काढला.
उर्वशी जाॕब करते. तिचा मुलगा मोहित चार वर्षाचा आहे वगैरे.
जावेदने न मागताच त्यांनी उर्वशीचा मोबाईल नंबर दिला. नंबर घेतांना जावेदचे हात थरथरत होते.
जावेद घरी आला.वंदनाताईंना वाटले,
उर्वशीला सांगावे का जावेद भेटल्याचे कि थांबावे काही दिवस?’
क्रमशः
विधिलिखित भाग-२ वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
…..प्रिती
….

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!