विधिलिखित-कथामालिका भाग ७
विधिलिखित-कथामालिका भाग ७

विधिलिखित-कथामालिका भाग ७

विधिलिखित-कथामालिका
जावेद उर्वशीला फोन करु कि नको याच संभ्रमात होता.  फोन केला तर  काय बोलू? तिचे सांत्वन कसे करु?
अखेर न राहवून जावेदने उर्वशीला फोन केला.
हॕलो,कोण?
उर्वशीने विचारले.
किती वर्षांनी जावेदने तिचा आवाज ऐकला.आवाजाने ह्दयाची धडधड वाढली.
पण मन सुखावले.
मी मी जावेद.
त्याने मी म्हणताक्षणी उर्वशीने त्याचा आवाज ओळखला.
जावेदशी ओळख,जावेदवरचे प्रेम आणि तिने केलेली जावेदची फसवणूक. हे सगळे चित्रवत् तिच्या डोळ्यासमोर  उभे राहिले.
उर्वशीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही.भास झाला असेल ? तिने परत विचारले
कोण?
समोरुन तेच उत्तर आले
जावेद’.
जावेद-ज्याच्याशिवाय ती कधीही सुखी राहू शकली नाही.पण त्याचा फोन आल्यावर  काय बोलावे सुचत नव्हते.
दोघांनाही एकमेकांशी खूप बोलायचे होते.पण उर्वशी
नाही बोलू शकली काही.तिने फोन ठेवला.
जावेद कसा असेल?  एव्हाना मला विसरून पुढे गेला असेल.माझा नंबर कोणी दिला असेल?
आई
मोहीतच्या आवाजाने ती भानावर आली.
उर्वशी गोंधळली होती.
जावेद? कुठे  असेल?
जावेदने एवढे वर्ष काबूत ठेवलेले मन आज बंड करत होते. ऊर्वशीशिवाय सध्या मनात काहीच नव्हते.
वंदनाताईंची तब्येत आता ठीक झाली होती.
आज बऱ्याच दिवसांनी त्या बँकेत आल्या.
जावेदला आज पहिल्यांदा बँकेत त्यांना बघून आनंद झाला.
प्रथमच तो वंदनाताईं सोबत मोकळेपणाने बोलला.
त्यांनी सांगितले
उर्वशी लग्नाला तयार नव्हती,लग्नानंतरही ती जावेदला विसरली नाही.
जावेदचा फोन आल्यानंतर उर्वशीच्या मनात चलबिचल झाली,मन वेगाने त्याच्याकडे धावत सुटले.
पण तिने लगेच स्वतःला सावरले,
मनाला आवरले.
आणि स्वतःला बजावले.
आता ते स्वप्निल दिवस संपले होते. एका मुलाची आई आहे मी. माझे आॕफिस,घर,मोहित,सासरची मंडळी असेच आयुष्य सुरु राहणार.
जावेदची बेचैनी वाढत होती.आज पुन्हा एकदा त्याने उर्वशीला फोन केला.
पण तिने उचलावसा वाटला तरी उचलला नाही.
संयमाने मनाला आवरले तिने.
जावेदने वंदनाताईंना हे सांगितले.
वंदनाताई  जावेदची व्याकुळता समजू शकत होत्या.
त्याचे उर्वशीवर असणारे प्रेम उशीरा का होईना पण त्या उमजल्या होत्या. आता वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता. आधीच खूप उशीर झाला होता.
वंदनाताईंनी उर्वशीच्या सासु सासऱ्यांना बोलवून घेतले.उर्वशीला सोबत नका आणू असेही सांगितले.
वंदनाताईंनी त्यांना उर्वशी आणि  जावेदबद्दल सगळे सांगितले. सांगतांना त्यांना संकोच वाटत होता पण सांगणेही  गरजेचे होते.
उर्वशीचे सासुसासरे सगळे ऐकून स्तब्ध झाले.
काय   बोलावे कळत नव्हते.
उर्वशीने एकटीने आयुष्य  कसे काढायचे
हा प्रश्न त्यांनाही पडायचा.तिचा एकटेपणा त्यांच्याही ह्दयात कालवाकालव निर्माण  करायचा .
पण उर्वशीने लग्न केले तर  उर्वशीबरोबर मोहितही  आपल्याला सोडून जाईल ही भीती पण होती.
उर्वशीच्या सासुसासऱ्यांशी बोलून झाल्यावर त्यांनी जावेदलाही त्यांना भेटायला बोलवले.
जावेदशी बोलल्यावर त्यांना  आवडला तो.त्यांच्यासाठी जात हा प्रश्न मोठा  नव्हता.
उर्वशीला  त्यांनी नेहमी सुनेपेक्षा मुलगीच जास्त मानले होते. उर्वशी सुखात राहावी ही त्यांचीही इच्छा होतीच. जावेदला भेटल्यानंतर तो  तिला सुखात ठेवेल अशी त्यांना खात्री वाटत होती.
मनोमन काही निर्णय घेऊन ते परतले.
उर्वशीला काही माहित नव्हते.परत गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी  नाश्ता करायला सगळे बसले असतांना  आईंनी विषय काढला.   उर्वशी आम्ही जावेदला भेटून आलो.उर्वशी शहारली.
अग,आम्हाला आवडला तो. वंदनाताईंनी आम्हाला त्याला भेटायलाच बोलवले होते.
म्हणजे आईनेच त्याला माझा नंबर दिला तर उर्वशीने अंदाज बांधला.
उर्वशी बेटा,एकटी किती दिवस राहणार?
 
आई मी एकटी कुठे आहे?आपण सोबतच आहोत सगळे.
उर्वशी आईला म्हणाली.
आईने तिची समजूत  काढली.
रात्री जेवण आटोपल्यावर मोहीतचे आजोबा रोजच्या परिपाठानूसार मोहितला गोष्ट सांगायला बसले. उर्वशी झोपायला रुममध्ये आली. तेवढ्यात जावेदचा फोन आला.आज धडधडत्या अंतःकरणाने उर्वशीने फोन उचलला.
उर्वशी
पलीकडून जावेदचा आवाज आला.
बोल जावेद.
जावेदला तिच्या आवाजातला  आनंद जाणवला.
पण एकमेकांशी  बोलण्यासारखे दोघांजवळ खूप काही असूनही दोघे काही बोलू शकले नाही.
त्यांचे अबोल प्रेम मौनातूनच व्यक्त होत होते.
जावेदने अम्मी अब्बाला उर्वशीबद्दल सांगितले.सुरूवातीला ते नाराज झाले पण जावेदच्या आनंदासाठी तयार झाले. जावेद  लग्नाला का नकार द्यायचा याचे कारण समजले त्यांना.
जावेदमधील बदल त्यांच्या लक्षात आला होता.
त्यांचा हरवलेला जावेद आता वापस येत होता.
आधीचे हसू जावेदच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते.
ते उर्वशीला भेटायला तयार झाले.जावेद उर्वशीच्या सासरी अम्मीअब्बाला  भेटायला घेऊन आला.
जावेदने आईबाबांशी अम्मीअब्बांची ओळख करुन दिली.उर्वशी अम्मीअब्बांना भेटली.
त्यांना आवडली ती. उर्वशीने आणि जावेदने खूप वर्षांनी बघितले एकमेकांना.त्यांच्या भावना व्यक्त होण्याच्या पलिकडच्या होत्या.
जावेदला उर्वशीतला बदल जाणवला.आधीची ती अवखळ उर्वशी हरवली होती.परिस्थितीने किती गांभीर्य आणले होते तिच्यात.
आणि जावेदही किती बदलला. किती परिपक्वता आली याच्यात.
उर्वशीच्या लक्षात आला जावेदमधील बदल.
आईबाबा,अम्मीअब्बा  बोलत बोलत बाहेर आले. मोहित सावीबरोबर बाहेर गेला होता. आता हाॕलमध्ये जावेद आणि उर्वशीच होते.
एवढ्या वर्षांनी भेटूनही दोघांजवळ एकमेकांशी बोलायला शब्द नव्हते.
आधी रोज भेटूनही शब्द संपत नव्हते आणि आता शब्द ओठांवर यायला तयार नाहीत.
काळ आणि  वेळ सगळ्या गोष्टींचे संदर्भच बदलून टाकते.
दोघे फक्त एकमेकांना बघत राहिले. नजरेनंच एकमेकांशी बोलत होते. बघता बघता उर्वशीच्या डोळ्यातून आसवे वाहायला लागली.
जावेद लगेच उर्वशीजवळ येऊन तिला थोपटायला लागला. उर्वशीच्या आसवांमध्ये मधला काळ वाहून गेला होता. जणू दोघांच्या आयुष्यात मधला काळ आलाच नव्हता.उर्वशीच्या आसवांनी पुसून टाकला तो. आता त्यांचा स्वच्छ  भविष्यकाळ सुरु होणार होता.
सावी मोहितला घेऊन आत आली.
उर्वशीने सावीची जावेदशी ओळख करुन  दिली.
मोहित एकदम आवडला जावेदला. त्याच्या  उर्वशीचा मुलगा होता तो.
जावेद,अम्मीअब्बा सगळे ठरवून परत गेले. जावेदला उर्वशीपासून आता एकही दिवस दूर राहण्याची इच्छा नव्हती.
मधल्या काळात केवळ तिच्या आठवणींवर जिवंत राहिला होता तो.
आईबाबांकडे गडबड चाललीय.लग्नसमारंभाची सगळी सुत्रे सावीच्या हातात आहेत.
सकाळी कोर्टमॕरेज आणि रात्री मोजक्याच लोकांना पार्टी असे ठरले. कोर्टात आईबाबांसोबत उर्वशी पोहचली तेव्हा वंदनाताई आधीच येऊन पोहचल्या होत्या.
जावेदला नकार देणाऱ्या वंदनाताईंनी आज समाजाची पर्वा न करता दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
दोघांचे लग्न लागले.  उर्वशी आज खूप सुंदर  दिसत होती.वंदनाताईंनी  उर्वशीच्या चेहऱ्यावर खूप दिवसांत फूललेले हास्य बघितले.
खूप  समाधान वाटले त्यांना. त्यांच्या हातून घडलेल्या चुकीचे  आज परिमार्जन  झाले होते.
जावेद आणि उर्वशीचे मिलन विधिलिखितच होते जणू.
उर्वशीची पाठवणी करतांना आईबाबांनी उर्वशीकडे एकच मागणं मागितले. मिहिरची आठवण म्हणून मोहितला त्यांच्याजवळ ठेवण्याची विनंती केली.
उर्वशीचे मन मानत नव्हते पण आईबाबांच्या जीवनाचा मोहितच आधार आहे  हे तिला माहित होते.त्याला सोबत नेले तर  त्यांच्या जगण्याचा अर्थ  संपला असता. मोहितला आईबाबांकडे ठेवून उर्वशी जावेद बरोबर नवीन  आयुष्याच्या  दिशेने  निघाली.
वंदनाताईंच्या डोळ्यातील आनंदाश्रु आज कोणीही थांबवू शकत नव्हते….
समाप्त
प्रिय वाचक, कथा आवडल्यास नक्की  Like,Share करा
विधिलिखित-कथेच्या  पहिल्या भागाची लिंक.

https://marathi.shabdaparna.in/विधिलिखित-भाग-१

शब्दपर्ण वेबसाईटवरील इतर कथामालिका वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/कथामालिका

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!