आठवणींचा पाऊस-लेख
आठवणींचा पाऊस-लेख

आठवणींचा पाऊस-लेख

आठवणींचा पाऊस-लेख

आई खूप बोर होतंय,
आई काय करू?
अशी सतत मागे भुणभुण करणाऱ्या लेकाची शाळा आज ऑनलाईन का होईना सुरू झाली आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. Van वाल्या काकांचा हॉर्न वाजला नाही,शाळेची घंटा वाजली नाही, प्रार्थना नाही, मित्रांना भेटणार याचा उत्साह नाही, शिक्षकांना दोन महिन्यांनी पाहिल्यावर येणारी डोळ्यातली चमक नाही,नव्या युनिफॉर्म चा कडक पणा नाही. पुन्हा एकदा त्या मोबाईल नामक डबड्यात गेम ऐवजी छोट्या छोट्या चौकोनातून जमतील तेवढे चेहरे पाहायचे. कीव आली मला त्याची.
मन भरून आलं बालपणीच्या आठवणींनी आणि सुरू झाला पाऊस मनात.
आमच्या लहानपणी शाळा सुरू होणे हा महोत्सव पंधरा दिवस आधी सुरू व्हायचा. शाळेची आणि पावसाळयाची बेगमी अशी एकत्र मोहीम असायची. कधी नवीन पुस्तके तर कधी अर्ध्या किमतीत घेतलेली पुस्तके . काहीही असो पण कौतुक मात्र नवंचं असायचं. अर्ध्या किमतीत पुस्तकं घेणं आम्हाला तेव्हा कधीच कमीपणाचं वाटलं नाही. पुस्तकं कोणतीही असो त्याला हालत बघून शिवून आधी वर्तमानपत्राचे मग त्यावर दुसरे असे कव्हर घालणे, मग स्वच्छ कोऱ्या कागदाची विविध आकार कापून डिंक लावून ते पुस्तकावर चिटकवून त्यावर नाव टाकणे हा सोहळा किमान तीन दिवस चालायचा .कारण आम्ही तिघी बहिणी ना. रोज एकीचा नंबर. कव्हर घालून झालं की बाबांच्या सुवाच्य अक्षरात त्यावर नाव टाकले की कोण आनंद व्हायचा. कार ची ,छोटा भीम ची ,अन् पोकेमाॖन ची आत्ता मिळतात तशी स्टिकर्स तेव्हा होती की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं.
उरलेल्या कोऱ्या पांनाची वही शिवणे हे काम आई साईड बाय साईड करत असायची.
कंपास मध्ये नसलेली ,हरवलेली एखाद दुसरी वस्तू सुटी आणून एखादी कंपास सदृश्य पेटीत भरली की झालं

मग पाळी गणवेश खरेदीची.
मी आधी सांगितलं तसं आम्ही तिघी बहिणी. मग मोठीचा गणवेश लहानीला हे गणित ठरलेलं असायचं. विकत घेतांना आई नेहमी वाढत्या मापाचे गणवेश का घ्यायची हे तेव्हा कध्धीच कळलं नाही. पण खर्चाचे वाढते माप आणि त्यावर काटकसर हे तिने शोधलेले उत्तर समजायला वाढतं वय यावं लागलं. मग ज्या कोणाला अगदीच गरजेचे असेल त्याला नवी खरेदी. पण वाईट कधीच वाटलं नाही. ताईंचा ड्रेस मिरवण्यात आनंदच वाटायचा. आत्ता मुलांना दोन सेट गणवेशाचे, मग पी. टी. चा वेगळा,स्काऊट गाईड चा वेगळा हे बघून चक्रवल्या सारखं होतं माझ्या सारख्या आयांना.
मग नंबर छत्री,रेनकोट,चप्पल, बूट, दप्तर,पेन पेन्सिल,कंपास यांचा. छत्री तर नाहीच मिळाली कधीच अगदी कॉलेज ला जाई पर्यंत.
तू लहान आहेस अजून छत्री सांभाळता येणारे का? असं बाबा मोठ्ठ्या आवाजात बोलले की टाप च नव्हती पुढे विचारायची. आणि इगतपुरी च्या मुसळधार पाऊस वारा आणि धुक्यात ते शक्यही नव्हतच म्हणा. माझी तर गंमत च वेगळी मला तर दोन चार वेळा मी रेनकोट च्या आत मी शाळेचं दप्तर पाठीवर अडकवायचे विसरले हे पण आठवत नव्हत. आमची स्वारी तशीच शाळेत.

चप्पल, सँडल, बूट दरवर्षी नवीन घ्याचेच असा मुळीच रीवाज नव्हता. कधी कधी तर स्लीपरला रबरी पट्टे लावून ते टाचांना अडकवले की टाचेकडे गोल पडलेलं छिद्र आपोआप झाकलं जायचं आणि काम भागायचं. त्या स्लीपर ने ड्रेस वर मागे काढलेली चिखलाची रांगोळी तेव्हा आम्हाला काय किंवा आमच्या मैत्रिणींना काय कमीपणाची वाटलीच नाही कधी. सगळ्या जगण्यातच एकूण मजा होती. दप्तर नामक पिशवी किंवा पिशवी च दप्तर एकच प्रकार असतो हे तेव्हाचं ज्ञान होतं. आता पोरांच्या ब्रँडेड bags, शाळेला,वॉक ला, जनरल, occassional असे शंभर प्रकारचे खेटरं पाहिलं की हसायला येतं मला.
आम्ही इगतपुरी सारख्या छोट्या गावात राहायचो जिथे पाऊस आठ अन् आठ दिवस उघडत नव्हता अन् सूर्य दर्शन पावसाळ्यात दुर्मिळ व्हायचं. तेव्हा खूप पाऊस चालू आहे म्हणून कुठेतरी थांबायचं ,पाऊस कमी झाला की निघायच हा प्रकारच माहीत नाही. पाऊस काही थांबणार नाही मग आपण कशाला थांबा? अशा विचारात आम्ही सकाळी शाळा, दुपारी क्लास, मग बाजार असे सगळे कामं चिंब भिजलेल्या अवस्थेत च करायचो. इथून भिजून आलं की बदल कपडे,जा दुसरीकडे असा क्रमच असायचा. आणि इतकं भिजूनही विशेष म्हणजे पाऊस कधीच बाधत नव्हता. कधी सर्दी खोकला नाही की कधी ताप नाही.आता आश्चर्य वाटतं सगळ्यांचंचच.
आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं पण ते आता.
आता शंभर प्रकारच्या औषधांच्या जाहिराती पहिल्या की हमखास आठवते ती चार महिने पायाच्या बोटातल्या चिखल्या ,त्याचा त्रास सहन करत,तरीही चेहऱ्यावर कधीही त्रागा न दाखवता काम करत राहणारी माझी आई.

एक पाऊस आठवला आणि सगळ्या आठवणी हिरव्यागार झाल्या. आणि डोळ्यातून वाहू लागले झरे माझ्या गावात पहिल्याच पावसानंतर वहायचे ना अगदी तसेच.

राखी तोफखानेवाले जोशी
नाशिक

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

3 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!