मराठी स्त्री लेख-भाग्य तिच्यासोबत येतं
आई -पत्नी -मुलगी -सून,
वेगवेगळ्या रूपात वावरणारी आणि त्या त्या भूमिकेत मनापासून प्रवेश करत अगदी नेमकेपणाने ती भूमिका यशस्वी करणारी “ती”. ती एका घरात जन्माला येते. कौतुकात, लाडात वाढत मोठी होऊन एका अनोळखी घरात (प्रेमाविवाह असला तरी ) निघून जाते.
तिच्या जाण्याने या घरातलं चैतन्यच नाहीसं होतं. माझी थोरली बहिण जेव्हा लग्न होऊन सासरी गेली, त्यानंतर जवळजवळ महिनाभर मी अत्यंत सैरभैर आणि उदास होऊन गेलो होतो. अगदी हाच किंवा काकणभर जास्त अनुभव पुन्हा माझी लेक लग्न होऊन सासरी गेली तेव्हा मला आला.
का होतं असं ? नेमकं नाही सांगता येत, परंतु हा अनुभव प्रत्येक पुरुषाला येत असतो. घरातली ती नुसती साध्या आजाराने अंथरुणावर पडली तरी घरातलं वातावरण उदास होऊन जातं, आणि ते येणारं उदासपण
आता आपल्याला घरातलं सगळं करावं लागणार याचं नसतं. (म्हणजे ते ही असतं खरं तर )
माझी बायको कधी आजारली की माझा मुलगा अगदी केविलवाणा होतो. तो बोलून दाखवत नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत असतं. अगदी एक दिवस घरचं सगळं करावं लागल्यावर काय होतं ते प्रत्येक पुरुष जाणतोच. तीचं तर हे नित्याचं असतं. बरं आपण ती ने केलेलं, बनवलेलं गपचूप पहातो, खातो असंही नाही. त्यात चुका, चवी काढत रहातो.
लग्न होऊन लेक सासरी जाते आणि घरातलं हरवलेलं चैतन्य सुनेच्या रूपात पुन्हा घरात अवतरतं. (काय खरं की नाही??? हे वाक्य वाचून डोळे मोठे झालेल्या सगळ्या सासूबाईंना विचारतोय प्रश्न ) आता असं म्हटलं जातं की मुलगा हा आईच्या जास्त जवळ असतो (लग्नानंतर घरात आलेली सून “आईने अगदी लाडोबा करून ठेवलाय” असं म्हणून सारखा उद्धार करतच असतें ) तर मुलगी ही बापाच्या हृदयाजवळ असतें. तसेच जावयाचे लाड सासूबाईंकडून अधिक होतात तर घरात येणाऱ्या सुनेच्या रूपात सासऱ्यांना त्यांची लेक परत मिळते.
आता सासू -सून हे एक न सुटणारं नातं आणि कोडं आहे हे तर आपण चांगलंच जाणतो. आपण त्या वादात नको जायला. गंमतीचा भाग सोडा परंतु स्त्री महिमा खरच अगाध आहे. स्त्रीच्या विविध रूपात ती आपल्या घराला मायेने बांधून ठेवते. असं म्हणतात, ‘एक स्त्रीच घर जोडू शकते आणि मोडूही शकते. असेलही कदाचित, परंतु मी मात्र नेहमीच घर जोडणारी स्त्री पाहिलीय.
पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली पुस्तकात ‘अंतू बर्वा’ या व्यक्तीचित्रात एके ठिकाणी ते पात्र लेखकाला (पुलं ना )म्हणतं,
तुमचे भाग्य तुमच्या पत्नीमुळे आहे हो! भाग्य कोणत्या वाटेने जातं सांगता येत नाही. या आंब्याच्या झाडाचा शेकड्याने आंबा घेतलाय एके काळी. पण ही गेली आणि तेव्हापासून हे झाड काही मोहोरलं नाही.”.
आता याला कुणी म्हणू देत अंधश्रद्धा, परंतु भाग्य हे स्त्रीच्या पावलाने घरात येतं आणि जातंही तिच्याच बरोबर. मला नेमकं काय म्हणायचंय हे कदाचित अनेकांच्या लक्षात आलं असेल. आपली आई,पत्नी यांना नेहमीच आपण गृहीत धरतो. अगदी प्रेमाविवाह केलेला प्रेमवीरही लग्नानंतर टिपिकल नवरा होऊन जातो.
आपल्या पत्नीच्या आवडी निवडी, तिचे प्राधान्यक्रम यांना फारसं विचारात न घेता, स्वतःच्याच प्रत्येक गोष्टींना प्राधान्य देत रहातो. आता आजकालच्या मुली हे फारसं चालवून घेत नाहीत म्हणा. तरीही काही वाद किंवा बोलाचाली झाली की पुरुष लगेच टोकाला जाऊन पोहोचतो. पण ती मात्र तसं करत नाही. ती आपला संसार मोडू देत नाही, कारण आता तो त्या दोघांपूरता राहिलेला नसतो तर त्यामध्ये मागची आणि पुढची पिढी सामावलेली असतें.
अर्थात काही वेळा अगदीच असह्य्य झाल्यावर स्त्री सुद्धा धाडसी निर्णय घेऊन बाहेर पडते. परंतु शक्यतो ती सहन करत, त्यातून मार्ग काढत आणि सुवर्णमध्य शोधत पुढे जात रहाते, आणि तिच्यावर पूर्ण संसार सोपवून पुरुष आपला जबाबदाऱ्यांतून पळवाटा शोधत रहातो. हे होतं कारण स्त्री पुरुष स्वभावातला, दृष्टिकोनामधला मूळ फरक. याचा अर्थ पुरुष हा मुळातच वाईट असतो, त्याला प्रेम नसतं किंवा तो हृदयशून्य असतो असा अजिबात नाही. परंतु जबाबदारीची जाणीव, जी ती ला लवकर होते तशी पुरुषाला होतं नाही म्हणा किंवा तो ती अंगाला लाऊनच घेत नाही.
अगदी लहानपणापासूनच घरातल्या मुलींना प्रत्येक कामं सांगितलं, शिकवलं जातं, अपेक्षा केली जाते. तसं मुलांचं होतं नाही. त्यांना नेहमीच सुट मिळत रहाते आणि त्याचा परिणाम तो मोठा होतं जातो तसतसा दिसू लागतो. अर्थात अनेक पुरुष (माझ्यासारखे)सुद्धा अगदी नेटकेपणाने घर सांभाळू लागलेयत ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाने घरातल्या ती चा आदर करायला हवा, तिच्या गुणांची कदर करायला हवी.
स्त्रीला घरची लक्ष्मी असं म्हटलं जातं, ते शब्दशः न घेता, घराचा आनंद, घराचा आधारस्तंभ, घराचा कणा जो संपूर्ण घराच्या सुखदुःखात तितक्याच कणखरपणे घराचा तोल सांभाळत असतो, अशा अर्थाने घ्यायला हरकत नाही.
मला पूर्वीपासून ते अगदी आजपर्यंत एक कोडं नेहमीच पडलेलं आहे , की माझी आई ते अगदी आज माझी पत्नी महिन्याभराच्या घरखर्चासाठी दिलेल्या पैशात संपूर्ण महिना कसा निगुतीने मॅनेज करत असतील?
अनेक आकस्मिक खर्च तेव्हाही उभे रहायचे आणि आताही उभे रहातात. पण त्या साऱ्यांना व्यवस्थित सामावून घेत कुणालाही काहीही कमी पडू न देता महिना निभाऊन नेतात. माझी आई काही रक्कम बँकेत बचत खात्यातही टाकायची. हे सगळं डोळसपणे पाहाण्याची सवय असल्याने या सगळ्याचं मला प्रचंड आश्चर्य वाटायचं.
माझे सख्खे काका, जे रेल्वे अकाउंट्स विभागात चांगल्या पदावर होते, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत ते तसेच राहिले. एकटेच बडबडत असायचे. माझ्या वडिलांनी भावासाठी अगदी मनापासून जे जे उपाय केले त्याचा मी एक साक्षीदार आहे. उपयोग काहीच झाला नाही.
आता यामध्ये भावाने भावासाठी (ते ही वेड्या ) केलं हे एकवेळ समजू शकतो ( अर्थात आज चांगल्यासाठी सुद्धा कुणी करत नाही )पण भावाला माणसात आणायचं या नवऱ्याच्या ध्यासाला माझ्या आईने साथ देत निभावून नेलं हे मोठं आहे. कुणीही साहजिकच म्हटलं असतं की ‘त्यांना वेड्याच्या इस्पितळात ठेवा. हा त्रास मी काही सहन करणार नाही.’ पण आईने शेवटपर्यंत कधीही हे म्हटलं नाही. कुठून येते ही सहनशक्ती ती च्यामध्ये कोण जाणे. पुढे माझी आई गेली आणि वडील अगदी दीनवाणे झाले.
आमच्या परिचयाच्या एका कुटुंबात त्यांचा एक कुत्रा होता. प्रचंड मस्तीखोर होता तो. बाहेरचं कुणी घरी आलं की त्यांच्या अंगावर उड्या मारायचा. माझी बायको तर बाहेरूनच आधी त्याला बांधून ठेवायला सांगायची. त्या घरातल्या सगळ्यांनाच त्याचा खूप लळा होता. परंतु त्या घरची ती जेव्हा वारली अगदी त्या क्षणापासून तो जो शांत झाला, त्यानंतर मी त्याला पूर्वीच्या रूपात कधीही पहिला नाही. ती च्या मृत देहापाशी तिला नेईपर्यंत तो शांतपणे बसून होता. येणाऱ्या कुणाच्याही जवळ गेला नाही. मुक्या जनावरालाही ती ची महती कळते मग आपण तर माणूस आहोत.
पत्नी गेल्यावर पुरुष मात्र खुपच एकलकोंडां होऊन जातो. ती असताना दिसणारा त्याचा रुबाब, आब अचानक विरून जातो.
नटसम्राट नाटकात त्यांच्याच तोंडी साधारण अशा आशयाचं एक फार सुंदर वाक्य आहे.
“पुरुष हे एक गलबत असतं, जे आयुष्याच्या सफरीला निघतं. वाटेत विविध मोह, माया, दुःख, चांगले वाईट प्रसंग जवळ येतात. अखेर या सगळ्यांशी सामना करत ते गलबत अखेर येतं ते बायको नावाच्या बंदराकडेच, जिथे आपल्या सगळ्या चुका, सगळे अपराध मोठ्या मनाने पदरात घेतले जातील हा त्याच्या मनात विश्वास असतो.”
क्षणभराची पत्नी आणि अनंत काळची माता असं ती ला म्हटलंय ते अगदी तंतोतंत पाटण्यासारखं आहे. एका ठराविक वयानंतर आपल्या अपत्यांबरोबरच आपल्या सहचराकडे ती त्याच मायेने लक्ष ठेवते.
म्हणून म्हणतो आपल्या सहचारिणीला सांभाळा, कारण आपण कितीही पराक्रमाच्या, मोठेपणाच्या, कर्तृत्वाच्या डिंग्या मारल्या, तरी आपल्या यशाची ती एक भक्कम पाठराखीण असतें. जी यशाच्या चित्रात कुठेच दिसत नाही कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या (आणि अयशस्वी सुद्धा ) ‘ती ‘ पाठीमागे उभी असतें. अगदी एखाद्या पहाडासारखी.
प्रासादिक म्हणे
अप्रतिम लेख