ज्ञानेश्वरांचे अभंग-पैल तो गे काऊ कोकताहे
ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो कारण त्यांचे शब्द हे अत्यंत कोमल आहेत आईच्या ह्रदयासारखे ममतेने, कारूण्याने ओथंबलेले आहेत. जागोजागी आपल्याला मायेचे वात्सल्य आढळते. आज मी ज्या विराणीची मुक्तलेखनात मांडणी करणार आहे; ती एका सासुरवाशिणीची मनोभूमिका आहे. तीच म्हणून भूमिका घेऊन मी सदर लेखात माझे मन व्यक्त करत आहे.
पैल तो गे
नुकताच उजाडलं होतं.आडावरून घागरीच्या खेपा आणून रिचवल्या. कपिलेला आणि बछड्याला गवताची पेंडी सोडून टाकली. अंगणात सडा टाकला. त्यावर लक्ष्मीची पावलं रेखाटली. आडावर पाणी शेंदताना पातळ भिजलं होतं. कामाच्या रगाड्यात त्याचा ओलावा जाणवला नाही परंतु क्षणभराची उसंत मिळताच पदर पिळायला लागले तोच अंगणातील चाफ्यावर येऊन बसलेला काऊ काहीतरी सांगायला लागला.
कालच माहेरची आठवण झाली होती. दिवसभर घर डोळ्यापुढे दिसत होते ज्या घरात वाढली, खेळली, बागडली, ज्या घरात कोडकौतुक झालं ते घर मनात उतरायला लागले. मायबाप, भावंडे डोळ्यांपुढे दिसायला लागली. …. पण ते माहेरची घर दूर राहिलेले तिथे केवळ मनाचे पोहोचणे. केवळ कल्पनेचे इमले. आता दिवाळसण थोडीच आहे की लगेच तिथे जावे! परंतु हा अनाहूतपणे आलेला काऊ खरंच काहीतरी सांगतो आहे हे लागलीच कळले.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
त्या काऊच्या सांगण्यात गोडवा होता, एक निरोप होता आणि मुख्य म्हणजे शकुन होता. तो शकुन मन आनंदित करणारा, आल्हदीत करणारा होता. कारण तो काय सांगत होता! तर माझा भाऊराया येणार आहे, पंढरीराया येणार आहे, घरी न्यायला मूळ येणार आहे! खरंच की काय? आणि कित्ती गोड सांगावा घेऊन आलास रे तू काऊ! तुझ्या ह्या सांगाव्यासाठी सांग तुला काय देऊ?
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
हे काऊ, तू थेट पंढरी तूं आला आहेस निरोप घेऊन आला आहेस तू असाच थांब मी आत्ता आले तू थकला असशील मी तुला काहीतरी खायला देते बघते घरात काय आहे ते अरे हो आठवले रात्रीचा आहे तो दह्यात कालवून तुला आणि माझ्या कपिलेच्या बछड्याला देते. अगदी आत्ता आले हां आणि हितगुज ते सांगता सांगता तू माहेरच्या काही गोष्टी सांग बरं!
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
अरे, तिकडे माजघरात झोळीत निजलेलं माझं सोनुलं, तान्हुलं बाळ आहे. ते उठेलच बघ आता. तो उठला कीमग मी त्याला पाजायला घेणार आहे. तर त्याला पाजता पाजता माझ्या दुधाची धार वाटीत घेऊन तुला देईन बरं! पण तू थांब आणि खरंच सांग की, माझा विठू घ्यायला येणार आहे ना?
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
बघ मी लेकराची आठवण केली आणि त्याचा रडण्याचा स्वर ऐकू येत आहे. असंच असतं रे.. लेकराची रडणे हे केवळ मायलाच कळते. आणि माझे मन माझ्या पंढरीरायाला कळले आणि तो येणार असल्याचा निरोप तू आणलास! मी आत्ता घरातून आले हां! भारी धावपळ होते रे. तू एक काम कर तुला भूक लागली असेल ना बघ समोरच्या झाडावर आंबे लगडले आहेत त्यातील पाडावर आलेले आंबे तू चाखून बघ. तू भाऊरायाचा निरोप घेऊन आला म्हणजे पाहुणा आहेस आणि तो मेवा तुझ्या सरबराईसाठी मी रांधलेली ती रसाळी, पुरणपोळी आहे असे समज.
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
अरे काऊ, तू आणलेला शकुन काही साधा सोपा नाही. तुला सांगू माझा भाऊराया येतो, माझा पंढरीराया येतो त्यावेळी माझ्या मनात दिवाळसण फुललेला असतो. त्याचे येणे म्हणजे साक्षात माहेराचे येणे असते बरं! अरे, तो माझ्यासाठी कित्ती काय काय आणतो म्हणून सांगू?
तो मोगर्याचे गजरे आणतो, रखुमाईच्या हातचा खाऊ आणतो, माझ्यासाठी तिने पाठवलेले लाडू आणतो. शिदोरी, भातकं.. खूप काही आणतो.आणि आला की लगेच कधीही न भेटल्यासारखा खूप खूप बोलायला देखील लागतो. एक गुपित सांगू तुला.. तो कवितादेखील करतो बरं! हो अगदी खरंच!
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
तर काऊ, तू दिलेला हा शकुन मी काळजात जपून ठेवणार आहे. माझ्या भाऊरायाची वाट बघणार आहे. त्याने सांगावा पाठवला म्हणजे तो येणार हे नक्कीच! आणि तूच खरं खरं सांग पंढरीची ओढ कुणाला नाही रे!
संतोष जगताप.
मोगरा फुलला अभंगाचे निरुपण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
https://marathi.shabdaparna.in/मोगरा-फुलला-mogara
रूणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा अभंगाचे निरुपण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
https://marathi.shabdaparna.in/रुणुझुणु
अप्रतिम लिखाण
सुंदर
उत्तम लिखाण. एक वेगळा अर्थ मांडला.
मी समजत होतो : पंढरपूर च्या विठोबाने भेटीसाठी बोलावले आहे, अथवा विठोबा (कोणत्या तरी रूपात) भेटायला येत आहे असा शकून (निरोप/संकेत)हा कावळा देत आहे. (घरावर ओरडणारा कावळा अशा भेटीगाठी चे संकेत देतो अशी आपल्याकडे धारणा आहे त्याला अनुसरून हा अर्थ)
आणि दुसरा म्हणजे : हा विठोबा चा निरोप म्हणजे आता आपले जीवन संपत आले आहे, आणि म्हणून विठूराया आता कायमचे बोलावत आहे.
असे दोन अर्थ मला वाटत होते. प्रस्तुत लेखात मांडलेला अर्थ ही छान आहे.
आणखी एक.: हम आपके है कौन मधे जे एक गाणे आहे, माईं न् माई मेहेर पे तेरे बोल रहा है कागा…….. ह्या गाण्याचा काही संबंध (theam, inspiration, copy…etc) पैल तो गे काऊ….ह्या गाण्याशी आहे का? …फक्त एक विचार.