नाते तुझे माझे अंतिम भाग
नाते तुझे माझे अंतिम भाग

नाते तुझे माझे अंतिम भाग

सतीशला आताशा कावेरीचे घरी येणे किंवा माझ्याशी बोलणे खटकते हे मला कळते..पण त्यावरून त्याची नेहमी तिच्यासमोर अशी उघड उघड नाराजी दर्शविणे हे काही मला बरोबर वाटत नाही. त्याने जरा तरी कावेरीला समजून घ्यावे मी बोलून बघू का एकदा सतीश सोबत ..नाही नको..योग्य वेळ येण्याची वाट बघुन नंतरच बोलू..फोडणीसाठी गॅस वर कढई तापवायला ठेवून सुजाता विचारात गढून गेली. आपली आणि कावेरीची खरी भेट तर तिच्या मुलामुळे मनीष मुळे झालेली मनीष आपल्या हाताखाली शिकणारा अत्यंत हुशार होतकरू विद्यार्थी..पण अचानक शाळेत गैरहजर राहू लागला ..अभ्यासातही त्याचे लक्ष नव्हते.. म्हणून एकदा त्याच्या आईला बोलले..त्याच्या वडिलांची छोटीशी चहाची टपरी शाळेलाच लागून असल्यामुळे मी मधल्या वेळेत माझ्या सहकार्‍यांसोबत दुपारचा चहा नाश्त्यासाठी तेथे जात जात होते..तेव्हा त्याच्या आईलाही बर्‍याचदा त्याच्या वडिलांसोबत काम करतानी बघितलेले असल्याने एक दिवस वेळ पाहून त्यांच्या जवळ मी मनीषचा विषय काढला. तशा त्या म्हणाल्या,

बाई ..तुम्ही म्हणता ते खरे आहे माझा मनीष हुशार आहे .मला तर तो नेहमीच म्हणतो आई मी शिकून लय मोठा साहेब होणार..पण बाई लेकरू आहे ते त्याला काय माहित इथे हाडाची काडे करून पण आम्हाला फक्त दोन वेळच्या जेवणाची सोय होते बाई मला सांगा.. त्याला शाळेत शिकवण्यासाठी लागणारा एवढा खर्च आम्ही गरिबाने कसा करायचा.. एवढीशा चहाच्या टपरीवर जगणारी आमची पोटं… आता तुम्ही सांगा बाई मलाही वाटते की माझ्या मनीषने खूप शिकावे मोठे व्हावे पण..

तुला मान्य आहे ना.. कावेरी मनीषने शिकावे मग त्याची काळजी तु करु नको मी शिकवेल त्याला शाळेत…त्याच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च मी स्वतः उचलेन ..

बाई पण तुम्ही काय म्हणून करसाल एवढा खर्च आमच्यासाठी ….

अगं माझं स्वतःचं मूल असतं तर मी एवढा खर्च केला असता ना..

शिवाय मनीष किती हुशार आहे. त्याचे नुकसान नको व्हायला ग..तू नाही म्हणू नको..

मलाही आनंदच होईल हुशार मुलाला शिकवण्याचा.. इथूनच आमची भेटगाठ सुरु झालेली.. मी मनीषच्या पुढील शिक्षणासाठी तिला तयार करून.. त्याचे शिक्षण पूर्ववत सुरू केले ..त्या बदल्यात मग कावेरी ही माझ्या घरातील अडलेनडले काम करून देऊ लागली .तिचा स्वाभिमानी स्वभाव पाहता मग मी पण तिला अजून 2..4 घरची कामे लावून दिली .नवऱ्याच्या व्यवसायात मदत करून बाकी वेळात ती इतर घरी कामाला जाऊ लागली त्यातून तिच्या हाती बऱ्यापैकी पैसा येऊन घराला त्याचा आधार झाला ..अशी कावेरी..

विचारा विचारात सुजाता ने चहा व पोहे बनवून चहा गाळून कप पण भरले व पोह्यांच्या प्लेटा तयार करून घेतल्या व दिवाणखान्यात सर्वांसाठी घेवून आली. पोहे पाहूनच अबोलीची पोहे पाहून खाण्याची धडपड सुरू झाली तेव्हा कावेरी तिला आपल्या मांडीवर बसवून आपल्या हाताने भरवू लागली.. हे पाहून बाजूलाच बसलेल्या सतीशने अबोली इकडे ये बेटा माझ्याकडे मी भरवतो तुला असा आवाज देत तिला जवळ बोलावले..वडिलांचा आवाज ऐकून आबोली कावेरीच्या मांडीवरून उठून धावत जात वडिलांच्या हातून खाऊ लागली.. त्यावेळी कावेरीचा चेहरा नकळत उतरलेला सुजाताच्या लक्षात आला. ..

कावेरी गेल्यावर सुजाता सतीश ला म्हणाली, काय झाले असते सतीश.. कावेरी ने तिला भरवले असते तर तू पण ना..

अग.. सुजाता तुला कसं सांगू मला आवडत नाही..

का॑ॽ नाही आवडत सतीश शेवटी अबोली तिचीच मुलगी ना.. तिनेच तर जन्म दिला अबोलीला.. हे तू विसरला असशील ..पण मी नाही..

काय ॽकाहीही बोलते आहे सुजाता तू ..उगाच काहीबाही बरळू नको नीट विचार करून बोल..तिचे शब्द कानावर पडताच सतीश एकदम गोंधळुन जात म्हणाला.

हो ..सतीश तू कितीही लपवलं तरी मला सर्व माहित आहे .माझे मुल जन्मताच मरण पावले.. त्यामुळे माझ्यावर मानसिक आघात होईल असे डॉक्टर म्हणाले.. म्हणून त्यावेळी नुकत्याच बाळंत झालेल्या कावेरीला तिचे मुल देण्यासाठी तुम्ही तयार केले…आणि कावेरीही माझ्यासाठी माझ्यावरील प्रेमापोटी आपले मूल द्यायला तयार झाली.. मी तिला तिचे बाळ माझ्या पुढ्यात ठेवताना स्वतःच्या या डोळ्यांनी बघितले आणि तुमचे सर्वांचे बोलणे सुध्दा ऐकले.. तुम्हाला वाटले मी बेहोश अवस्थेत आहे. पण सतीश तेव्हा मी नेमकेच शुद्धीवर आले होते .अरे कावेरीला आधीची दोन्ही मुलं तिला मुलांच्या पाठीवर मुलीची किती हौस होती.पण मला उशिराने मातृत्व सुख मिळाले पण तेही नशिबाने हिरावून घेतले ..म्हणून तिने तिची मुलगी मला दिली. तुला हीच भीती नेहमी वाटते ना सतीश की ती तिची मुलगी केव्हाही घेऊन जाईल…नाही सतीश ती असे कधीच करणार नाही .आमचे यावर बोलणे सुद्धा झाले आहे मी माझी सत्य परिस्थिती स्वीकारून तिची मुलगी तिच्या स्वाधीन पण केली..पण ती मला म्हणाली बाई ..अबोली त्या दिवशीच तुमची झाली बाई ज्या दिवशी मी तिला तुमच्या पुढ्यात ठेवली. तेव्हापासून तुम्हीच तिच्या आई झाल्या आहात… माझा तिच्यावरील हक्क मी कधीच दाखवणार नाही. तुम्ही पण मला वचन द्या बाई परत तुम्ही हा विषय कधीच काढणार नाही ..ही गोष्ट आपल्या दोघीतच राहील आणि मी माझ्याकडून तसे वचन सुद्धा तिला दिले…पण सतीश तू.. तुला मी हे सर्व सांगणार नव्हती पण.. हल्ली कावेरीसाठीची तुझी बदलत चाललेली वागणूक…तिच्याविषयीची निरर्थक वाटणारी भीती मला पहावत नाही आहे. तू उगाच शंका बाळगून आहे…तुला मी एक सांगू तिला स्वतः ला 9 वा महिना लागूनही ती मला दिवस आहेत ..आणि माझी तब्येत नाजूक आहे म्हणून मला जपत होती.. काळजी घेत होती..पण नियतीला माझी आई होणे केव्हाच मंजूर नव्हते म्हणून सातव्या महिन्यातच तिने माझे मुल माझ्यापासून हिरावून घेतले.योगायोग बघ ना कावेरी नऊ महिन्यानंतर त्याच दवाखान्यात बाळंत झाली आणि आपल्या पोटचा गोळा मागचा पुढचा विचार न करता माझ्या स्वाधीन करून मला आई बनण्याची खुशी दिली ज्या खुशीसाठी मी तरसत होते… सतीश मला सांग कावेरी चे आणि आपले नाते तरी कायॽ फक्त माणुसकीचे आणि प्रेमाचे ..

एक मात्र मला निश्चित वाटते सतीश , कावेरी सारखी चांगली माणसं आपल्या आयुष्यात असली की हरवलेली नाती सुद्धा परत मिळतात हे विसरून चालणार नाही.

समाप्त..

 

  • सौ. दर्शना भुरे हिंगोली..

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!