आईआणि अंगाई
आई” एकच शब्द , अक्षरं दोन , पण या एकाच शब्दात किती सामर्थ्य ,किती ताकद आहे .आई एक परिपूर्ण नातं ! जीवनात सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं –
आईचं आईपण अथांग
जगात तुमच्यावर जीव टाकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे “आई”.
परमेश्वराने स्वःताला पर्याय म्हणून निर्माण केली ”आई”.
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणारी त्यागमूर्ती -”आई”.
आपण जन्माला येण्यापूर्वी आपल्यावर प्रेमसिंचन करणारा स्नेह निर्झर – आई.
वर्तमानाला भविष्याचं क्षितिज दाखवणारा दीपस्तंभ – आई .
सर्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं म्हणजे आई .
तिच्याबद्दल कितीही सांगितलं तरी काहीतरी अपूर्णच वाटतं ती “आई”.
अनंतकाळाची माता म्हणून मुलावर जीवापाड प्रेम करणारी ही सहनशील माता मातृत्वाच्या जीवघेण्या कळा सोसून मुलाला जन्म देते आणि तो क्षण आनंदोत्सवात परावर्तित करते. त्याच्यासाठी जिवाचे रान करते. तिच्या मातृवात्सल्याची मोजदाद करणे केवळ अशक्य !
गरीब असो श्रीमंत असो आई ही आईच असते सदैव मुलाचे शुभचिंतन करणारी. मूल सुरक्षित रहावं , सुखात रहावं, त्याचं कल्याण व्हावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं ही कामना करणारी माताच असते.ती मुलाला चांगले संस्कार देते. तिच्या वात्सल्यात सतत सुगंध असतो.म्हणूनच तिच्या मातृवात्सल्याचा मोह राम कृष्णालाही आवरला नसावा. आई मुलाला कडेवर घेते,का बरं ?
आपण जेवढ्या उंचीवरून जग पहातो त्याच उंचीवरून ते मुलाला दिसावं
असा विचार असेल का तिच्या मनात.
सर्व नात्यांमध्ये आई आणि मुलाचं नातं वेगळ्या उंचीवर पोचतं ते तिच्या क्षमाशीलतेमुळे. ती आईच असते जी क्षमा करू शकते. मूल कितीही चुकलं, त्याने कितीही दुःख, अवहेलना सोसण्याचे प्रसंग आणले तरी ती उदार मानाने क्षमा करते. वाट चुकलेल्या मुलाला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी, बहुतेक नात्यांमध्ये नसलेली सुधारण्याची संधी आईच देऊ शकते. म्हणून पाझरलेले डोळे पुसायला हवा असतो तो आईचाच पदर.
नोकरी करणाऱ्या आईच्या आयुष्यातला अति अवघड क्षण असतो,जो मी देखील अनुभवलाय ,तो म्हणजे बाळाला कुणावर तरी सोपवून ऑफिसला जाण्याचा. त्या दिवसाची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा येतो. सकाळपासून जिवाला चैन नसते,जीव खालीवर होत असतो .मनातील अस्वस्थता लपविण्यासाठी ती काहीही न कळणाऱ्या बाळाला बजावत असते,
”पाळणाघरात नीट राहायचं हं दिवसभर,माझी आठवण काढून रडायचं नाही”
खरं तर ती स्वतःलाच बजावत असते,“ऑफिसमध्ये नीट राहायचं हं ,माझी आठवण काढून रडायचं नाही”. तरी रडू यायचं तेव्हा येतच. यासाठी आईला किती मानसिक तयारी करावी लागते याची कल्पनाच केलेली बरी. आणि गंमतीची गोष्ट अशी की मुलाला सोडून जाणं आईला जितकं जड जातं ना,तितकं आईला सोडून राहणं मुलाला जड जात नाही. बाळंतपण हा अवघड क्षण आहेच पण बाळाला सोडून जाणे हा त्याहीपेक्षा अतिअवघड क्षण आहे.
आता थोडं अंगाई बाबत . लहानपणी आई बाळाला पाळण्यात जोजवते. मोठेपणी नाही पण लहानपणी ते तान्हे असताना ती बाळासाठी गाणं म्हणत असते.प्रत्येकाचीच आई म्हणते,जसं येईल तसं ,तोडकं मोडकं , बोबडं गाणं म्हणते,ती म्हणजे अंगाई.
अंगाई म्हणजे आईच नव्हे तर तिच्या आत्म्याचं गाणं असतं. बाळाला झोपविण्यासाठी ती पाळणा वरखाली हलवते,तेव्हा ते आयुष्यात येणाऱ्या चढउताराचं प्रतीक असेल का?
आई जेव्हा पाळणा जोजवते,तेव्हा ती सांगते,
बाळा असाच तू चढशील, खाली येशील,पुन्हा वर जाशील.
आयुष्यात येणारे चढउतार बाळाला समजावेत म्हणून तर ही योजना केली नसेल ना परमेश्वराने. ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताई-तिने लिहिला चांगदेवाचा पाळणा, १४ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवाची आई झाली. प्रत्येकाला तशी आई मिळणार नाही पण प्रत्येकाच्या आईमध्ये ही मुक्ताई नक्कीच असते. संसाराच्या दुःखातून मुक्त करणारी शक्ती म्हणजे आई असते आणि ज्या गाण्याला आईच अंग असतं ती अंगाई असते.
आई आणि मुलाच्या अगाध प्रेमाचं नातं काव्यात गुंफताना,त्यात निखळ,लडिवाळ रंग भरताना कविवर्य भा. रा. तांबे म्हणतात
तिचा कलिजा पदरी निजला.
जिवापलीकडे जपे त्याजला.
कुरवाळुनी चिमण्या राजाला.
चुंबी वरचेवरी .
निजल्या तान्ह्यावरी माउली
दृष्टी सारखी धरी
माधुरी जोशी
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











सुरेख
अप्रतिम tai