मन मनास उमजत नाही-स्त्री कथा
मन मनास उमजत नाही-स्त्री कथा

मन मनास उमजत नाही-स्त्री कथा

मन मनास उमजत नाही-स्त्री कथा
परवा अभय विभाच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस
दोन्ही मुलांनी ठरवल्याप्रमाणे साजरा केला.
पंचविसावा वाढदिवस मुलांची शिक्षणाची महत्वाची वर्ष असल्यामुळे साजरा करु शकले नव्हते. वाढदिवस झाला आणि  मुले त्यांच्या नौकरीच्या ठिकाणी वापस गेले.
अभय-विभा घरी दोघेच होते.
अभय म्हणाला
विभा चल परवाचे शुटींग बघू या.
दोघे जवळ जवळ बसले.
अभयने व्हिडियो शुटींग सुरु केले.
अभय विभा नवरी नवरदेवासारखे सजले होते.
जणू लग्नाचा दिवस अनुभवत होते.
विभाला तीस वर्षापूर्वी माप ओलांडून एकत्रित कुटुंबात  आलेली तरुण,अल्लड विभा आठवली.
काही चुकेल का? या विचाराने सतत  घाबरणारी.
दोघेही मन लावून शुटींग बघायला लागले.
बघतांना विभाच्या मनात काहूर उठले.
तिचे शुटींग बघण्याकडे लक्षच नव्हते.
अभय-का ग विभा? आवडत नाही  आहे का?
नाही रे. पण आपण खरेच परवा बोललो तसेच आहोत का?
मी आज मनातले काही बोलू का अभय?
बोल ना विभा.
विभा बोलायला लागली
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला जवळच्या लोकांची मनोगते झाली.
जोडी कशी आदर्श  आहे
made for each other
एक दुजे के लिए वगैरे
अशी मोठमोठी भाषणे झाली.
सगळ्यांच्या भाषणात तेच तेच.
आपण कसे आदर्श आहोत
एकमेकांना किती समजून घेतो वगैरे….
मग तू बोलायला आला.
माझी खूप  तारीफ केली.
लग्नापासून मी तुला कशी साथ दिली ,
घर,मुले,तू , सगळ्यांना मी कसे छान सांभाळले
लग्नाच्या सुरूवातीला कमी पैशातही  मी घर व्यवस्थित चालविले.
वगैरे वगैरे….
मग आला माझा टर्न.
माझा टर्न येताच तुझ्या चेहऱ्यावरील धाकधूक वाचली मी.
खरे बोलण्याची सवय असलेली मी सगळे खरे बोलते कि काय…
.ही तुझी नेहमीची भीती नेहमीप्रमाणे मी खरी होऊ दिली नाही. तुझ्यासाठी कायमच खोटे बोलत आली.
एवढी वर्ष तुझी जपलेली इमेज नव्हती रे बिघडवायची मला.
 धाडधाड खोटी बोलत गेले मी.
चांगली शिकलेले  असूनही मी घरी राहण्याचा घेतलेला निर्णय माझा एकटीचाच होता.(हे खोटे बोलूनच टाकले.)
तुला घर सांभाळणारी ,तू घरी आल्यावर प्रसन्न दिसणारी बायको हवी होती हे नाहीच सांगू शकले रे.
 तू नेहमीच माझ्या कलागुणांना वाव दिला हे पण खोटे बोलले.
मी माझ्या कलेचा अविष्कार करतांना अनुभवलेली तुझी कडवट नजर नाही दाखवू शकली कुणाला.
मध्ये आपल्या आयुष्यात आलेली वादळे जी फक्त  तुला नि मला माहिती.माझ्या भिडस्त स्वभावामूळे नाही सांगता आली कुणाला. वादळ येऊन गेले पण मी पडझड नाही होऊ दिली.त्यामूळे सगळ्यांना वादळानंतरही शांतताच दिसली.
मुलांना आम्ही दोघांनी मिळून घडविले.हेही तसेच खोटेखोटे.
बोलतांना आठवली तुझ्या आणि मुलांच्या मधोमध फसलेली मी. मुलांना काही घ्यायचे तुला पटवा.मित्रांकडे त्यांना जायचे तेव्हा तुला समजवा.
त्यांना कधी कमी मार्कस् मिळाले तर ती जबाबदारी मला घ्यावी लागली. मुले माझ्या लाडामुळे बिघडलीत हे कैकदा मी ऐकून घेतले काहीही न बोलता.
मुलांना एकटीने सांभाळतांना होणारी दमछाक
तुझा परिवार,मित्रपरिवार सांभाळतांना थकले म्हणायची हिंमत नव्हती माझ्यात.नव्हे ते सांगण्याचे  अवसान तू माझ्यात कधी येऊच दिले नाही.
मी गृहीणी…सतत तू गृहीत पकडलेली.
तू माझ्यापेक्षा वरचढ आहेस हे दाखवण्याचा तुझा अट्टाहास जाणवायचा सतत.
मग मीही घरात शांतता राखायला,तुझी इमेज जपायला  मिटवत गेले स्वतःला आतल्याआत.
घरात तू कमावता आहेस हे आडून आडून सतत जाणवून द्यायचास.मग माझ्याही तेच अंगवळणी पडत गेले. तू पैसे  माझ्याच account मध्ये टाकायचा पण खर्च करायची मुभा नव्हती मला.स्वतःसाठी पैसे खर्च करतांना ते तुझ्या कमाईचे आहेत हे विसरु शकली नाही कधीच. आणि  तू विसरुही दिले नाही.
सगळ्या इच्छा आतल्याआत मारत गेली.
तूला योग्य  वाटेल त्याच आणि जेव्हा वाटेल तेव्हाच वस्तु घरात आल्या.
तू माझी किती काळजी घेतोस,माझ्या सगळ्या इच्छा तू कशा पूर्ण केल्या…याचा आज तू भरलेला दंभ बघितला.
आणि  आठवले खूपदा दवाखान्यात एकटी गेलेली मी.
तुला आवडत नाही म्हणून प्रत्येक हौसमौज मारत जगलेली मी.
खूप  आठवायचा प्रयत्न करुनही एकही पूर्ण झालेली इच्छा आठवली नाही.
काल मुलांनी साजरा केलेल्या सोहळ्यात डोळ्यातून अलगद आसवे ओघळलीच. आपल्या  लेकीने श्रावणीने विचारलेच आई का ग डोळे भरले?
मी काही सांगायच्या आतच  तू बोलून गेला,
अग आनंदाश्रु आहेत आईचे.
लग्नाच्या तीस वर्षानंतरही गृहीत पकडलेच मला.
पण जाऊ दे हे सगळे आजवर लपवलेले तसेच राहू देते मनाच्या कुपीत.हवे तर आपण त्याला दुःखाची कुपी म्हणू या.
मी खरे बोलायचे ठरवलेच होते आज.पण नाही जमले.
तुझ्या नजरेने,इमेजने नाही अडवले मला.
तुझ्यावरचे प्रेम आड येते रे…..
अभय उदास नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला,
म्हणजे मी भ्रमात होतो विभा.मला नेहमी माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले असेच वाटायचे.
तू केवळ नजरेनच मला हवे नको ओळखत आलीस.माझ्या एका शब्दावरुन मनातले वाक्य समजून घेतले.मग हे काय?
हे खरेच आहे रे.तुझे मन मी बरोबर ओळखते.
तुला काय आवडेल?
तुला कशाचा राग येईल?…..सगळे तू न सांगताच कळते मला.पण तुझे तसे नाही.माझ्या मनाची तळमळ कधी कळली नाही तुला.तू प्रयत्नही नाही केले कधी.
तुझ्या बाबतीत मन मनास उमजत नाही असेच झाले.
अभयला  न उमजलेली विभा थोडी उमजायला लागली आता…..
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!