ते चार दिवस….-स्त्री कथा
सौ. दर्शना ओम भुरे
काय बाई हे अवलक्षण आजकालच्या पोरींना जराही मानमर्यादा नाही राहिली. सुलूच्या आजीची जप करता.. करता अखंड बडबड चालली होती.
शकुंतला ..ये …शकुंतला अग..त्या सुलक्षणाला बघ कशी दारात जाऊन बसली बोलव जरा तिला आत.. जराही सोवळ.. ओवळे नाही राहिले. आमच्या काळी असं नव्हते बाई..
आता काय झाले आत्याबाई..शकुंतला आत्याबाईचा आवाज ऐकून पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाली,
अग..त्या सुलूवर लक्ष ठेव जरा या चार दिवसात नसती बाटाबाटी.. सणासुदीचे दिवस आहेत.
कंटाळली असेल आत्याबाई घरात एकटे बसून बसून.. अजून सवय नाही तिला या सर्व गोष्टींची…बसू द्या जरा वेळ निवांत मुलींसोबत मन रमेल जरा तिचे..काही नाही होत बदलत्या काळानुसार कोणी पाळत नाही आजकाल एवढे सारे नियम ..
मग करा मनमानी…परंपरा,देव धर्म गुंडाळून ठेवून.. मनाला येईल तसे अगदी स्वच्छंद वागा तुम्ही सगळेजण कोणी टोकणार नाही तुम्हाला..
आत्याबाईचा एव्हाना चढत असलेला आवाज ऐकून शब्दाला शब्द वाढून अजून वाद होऊ नये म्हणून शकुंतलाने माघार घेतली. शकुंतलेला हे सर्व अवडंबर मनापासून मुळीच पटत नव्हते. पण आत्याबाई (सासू) जुन्या विचारांच्या चार दिवस विटाळशा स्त्रीची सावली पण त्यांना चालत नसे ..आपल्या आईला चार दिवस वेगळे बसलेले पाहून सूलूला नेहमी प्रश्न पडे तेव्हा तिची आई तिला सांगे अग कावळा शिवला की वेगळे बसावे लागते. पुढे वयात आल्यावर सुलक्षणाला आजीने वेगळे बसवल्यावर कावळा शिवण्याचा अर्थ कळला.
वेगळे बसवल्यामुळे आधीच गोंधळलेल्या सुलक्षणेवर तिच्या आजीने लादलेल्या सक्त नियमाने परेशान केले. .. इकडे तिकडे हात लावला तर देवाचा भयंकर प्रकोप होतो.. असे आजीने सांगितल्यावर तर ती अजूनच घाबरली . तिची मनस्थिती लक्षात घेऊन तिची आई तिला समजावत म्हणाली, देवाचा प्रकोप वगैरे असे काही नसते.
पाळी येणे वाईट असते न आई.. सुलू रडत आईला म्हणाली
नाही..ग
मग आजी असे का वागते.
पाळी आल्यापासून तिने मला वाळीतच टाकले…सारखीच हटकत राहाते..
अग..आजी जुन्या विचारांची लहानपणापासून ह्याच संस्कारात वाढलेली. त्यामुळे त्यांना आपली हल्लीची पिढी चुकीची वाटते. आणि प्रत्येक मुलीला वयात आल्यावर योग्य वेळी मासिकपाळी येणे नैसर्गिक आहे. सुलू पाळी ही प्रत्येक स्रीच्या आयुष्यातील सखी .. तिच्या येण्याने स्त्रीचे स्रीत्व पूर्ण होते.. तिचे अस्तित्व तिला आई होण्यास सक्षम बनवते… प्रत्येक स्री साठी पाळी येणे हा एक सुखद अनुभव असतो..पाळी येणे हा स्त्रीजीवनाचा अविभाज्य भाग आहे. तुला माहीत आहे सुलू अग..पूर्वीच्या काळात स्त्रियांना भरपूर कष्टाची कामे होती. नेहमीच्या कामातून काही दिवस विश्रांती मिळावी म्हणून पाळीच्या निमित्ताने तिला चार दिवस बाजूला बसवत होते. पण हल्लीच्या जमान्यात सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने होऊ लागले…आजकालच्या स्त्रियांना एवढी कष्टाची कामे करावी लागत नाहीत ..या चार दिवसांमध्ये शारीरिक स्वच्छता फार महत्त्वाची ..या दिवसात मन हळवे होणे, शारीरिक दुखणे,चिडचिड होणे साहजिक आहे .. आपण हे सर्व सहन करायला शिकलो की पाळीचे दिवस सहज सोपे जातात…. बाकी काही नाही ग..
आईचे हळूवार बोल सुलूला धीर देत आपल्या शरीरात होणाऱ्या नवीन बदलास आनंदाने सामोरे जाण्यासाठी तयार करीत होते..
दोघी मायलेकी बराच बोलत होत्या.
जरावेळाने जेवणखाणे आटोपून..
सुलक्षणा आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेली.
झोपण्यापूर्वी आत्याबाई
शकुंतलेला म्हणाली,
उद्याच्या सत्यनारायणाच्या पूजेची सर्व तयारी करायची.. आहे न तुझ्या लक्षात शकुंतला..
हो .. आत्याबाई झाली आहे पूजेची सर्व तयारी ..फक्त प्रसाद बनवायचा आहे तो उद्या वेळेवर बनवू ..
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या वेळेत पूजा सुरू झाली.घरातील सर्व सदस्य पूजेत गर्क होते.
अचानकपणे ओटीपोटातून असहनीय कळा निघू लागल्याने..सुलक्षणा कासावीस झाली. जागेवर उठून बसणेही तिच्याने अवघड जाऊ लागले. पण आजीच्या सक्त हुकूमामुळे पूजा संपन्न झाल्याशिवाय आपल्या खोलीत कोणीच येणार नाही हे माहिती होते. त्यावेळी वेदना सहन करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता.. ती तशीच स्वस्थ पडून राहिली..पूजा आटोपल्यावर सर्व जण जेवायला बसले. आजी शकुंतलेला म्हणाली अग विटाळशा बाईने शेवटी जेवायचे असते. तू पूजेला बसली होती जेवून घे.. पण आत्याबाईच्या बोलण्याकडे लक्ष न देता शकुंतला…सूलूसाठी ताट वाढून घेऊन तिच्या खोलीत गेली.. खोलीत येताबरोबर सुलूला निपचित पडलेल्या अवस्थेत पाहून ती एकदमच हादरली. हातातील ताट तसेच सोडून..मागचापुढचा विचार न करता धावतच जावून सूलूला जवळ घेत आपल्या छातीशी कवटाळले .सुलक्षणा तापाने चांगलीच फणफणली आहे हे तिला जाणवले..मग ताबडतोब तिच्यावर डॉक्टरी इलाज सुरू करून..
सुलूचे डोके आपल्या मांडीवर घेत..बाजूलाच उभ्या असलेल्या आपल्या सासूला शकुंतला म्हणाली,
बघितले न आत्याबाई.. काय अवस्था झाली माझ्या पोरीची..
हो ग शकुंतला.. मी ज्या संस्कारात वाढले तेच संस्कार मी तुमच्यावर लादत गेले.. याचा मला आज खरेच पश्चात्ताप होत आहे. मासिकपाळीतून जाणाऱ्या स्रीला तिच्या या चार दिवसांत मानसिक आधाराची तसेच देखभालीची जास्त गरज असते..
हे कधीही मला लक्षात नाही आले..
हे मी काय करून बसले शकुंतला.. माझ्या कठोरपणाची एवढी मोठी शिक्षा माझ्या नातीला मिळेल असे मला कधीच नाही वाटले…
सुलूला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत तिची आजी तिला म्हणाली सुलूबाळा..तुझी आजी आता खरेच बदलली ग तुझ्यावर आता ती यापुढे कसलेही बंधन टाकणार नाही किंवा टोकणार नाही. फक्त तू लवकर बरी हो.. असे म्हणून रडू लागली..
नातीवरच्या अखंड प्रेमापोटी आजीचे हृदय परिवर्तित होवून डोळ्यांतील अश्रूंसोबत बुरसटलेले सर्व विचारही जणु वाहून जात होते….









वेगळा पण महत्वाचा विषय
महत्त्वाच्या विषयावर लिहिले … छान
खूप छान
जुनाट विचारांचे जु मानेवर घेऊन जगणाऱ्या स्त्रियांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा
Chan
वेगळा विषय पण खूप महत्त्वाचा
खूप छान लेख
खुप छान मांडला विषय, महत्वाचे आहे हे.
वेगळा विषय…मस्त लिहिले
आभार सर्वांचे
छान लिहिले,. 👍 नैसर्गिक गोष्टी समजावून सांगणे आणि समजून घेणे हे आता बऱ्यापैकी वाढले आहे ही फार चांगली खरी सामाजिक प्रगती आहे. पूर्वी ह्या विषयावर कुणी बोलायला, लिहायला सुद्धा तयार नसत आणि आता ऑफिसमधे सरळ सुट्टीचे कारण सांगताना पण कुणी संकोचत नाही.