रंगांचा उत्सव-Marathi katha
रंगांचा उत्सव-Marathi katha

रंगांचा उत्सव-Marathi katha

रंगांचा उत्सव-Marathi katha

 खूप दिवसांनी नव्हे वर्षांनी मानसने हातात रंगाचा कुंचला पकडला.   सुरवातीला अनोळखी वाटणारा कुंचल्याचा  स्पर्श लगेच ओळखीचा वाटला… हातातून कुणी कुंचला ओढून घेईल या भीतीने त्याने कुंचला घट्ट पकडून ठेवला लहान मुलासारखा.

नगरमध्ये आईवडील,लहान बहीण यांच्यासोबत राहणारा,लहानपणापासून चित्रकारीची आवड असणारा मानस सदा रंगांशी खेळायचा.

गणित,भौतिकशास्त्राची ना त्याला आवड होती ना गती. मोठा झाल्यावर त्याला चित्रकारच व्हायचे होते.

रंगांचा जादूगर.

जादू होतीच त्याच्या हातात.

कोणतेही चित्र हुबेहूब काढायचा. चित्र रंगवतांना रंग एकमेकात बेमालूमपणे मिसळवायचा.

वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे जिंकायचा.आईवडील दोघेही कलेचे भक्त.त्यामुळे घरुन कायम प्रोत्साहनच मिळायचे. बारावी झाला कि त्याला जे.जे.आर्टस् ला टाकायचे वडीलांनी नक्की  केले.

मानस बारावी झाला. निकाल आला. आता  जे.जे.त अॕडमिशन घ्यायला मुंबईला जावे लागणार होते.

सगळी तयारी झाली.  उद्या निघायचे ठरले. रंगांचा जादुगर होण्याचे  स्वप्न रंगवतच मानस झोपला. पण त्याच पहाटे मानसचे वडील ह्दयविकाराने गेले.

रात्री बघितलेली स्वप्ने पहाटेत विरुन गेली.

मुंबईला जाऊन चित्रकार होण्याचे स्वप्न भंगले होते. घरची जबाबदारी आता मानसवर आली.

वडीलांच्या जागी पोस्टआॕफिसमध्ये त्याला नौकरी मिळाली.नौकरी करता करता त्याने बीए पूर्ण  केले.

रंगांशी नाते जुळवून ठेवले होते.

पण चित्रात रंग भरायला सवड मिळत नव्हती.

रंग कल्पनेतच  विरुन जायचे.

बहिणीचे शिक्षण ,लग्न झाले.

मानसची आई आता मानससाठी मुली शोधायला लागली.

मानसला होणाऱ्या बायकोला चित्र आणि  रंगांची जाण असावी एवढीच अपेक्षा होती.

पुण्याची उर्मी आईला सुन म्हणून आवडली.

उर्मी आल्यावर घर हसरे होईल या आशेने उर्मीशी लग्न केले.

पुण्यात वाढलेली उर्मी नगरला आली. पहिल्या एक दोन दिवसातच तिच्या  स्वभावाची चुणूक दाखवली तिने.

उर्मी देखणी होती ,कामसु होती.घर नीटनेटके ठेवायची. पण स्वभावात  अती शिस्तपणा. त्यामूळे रुक्षपणा आलेला. घर आता खूप  स्वच्छ  राहायचे अगदी लखलखीत पण हसरे घर नाही.सगळे नियमानुसार चालायचे. काटेकोरपणे. पण नात्यात मोकळेपणा नाही.

जरा घरातली एखादी वस्तु इकडेतिकडे झाली कि उर्मीचा थयथयाट सुरु.

तिच्या शिस्तीच्या नियमावलीत रंग आणि कुंचल्यांना जागाच नव्हती.

मानसला देखण्या जोडीदारापेक्षा त्याच्या चित्रातील देखणेपण शोधणारा जोडीदार हवा होता.

कलाकार स्त्री असो कि पुरुष त्याच्यातला कलाकार जिवंत ठेवायचा असेल तर जोडीदार हा कलासक्त असावाच लागतो.

उर्मी  मानसला चित्र रंगवू द्यायची नाही असे नव्हते. याने चित्रे काढू नये असेही तिला वाटत नव्हते.पण ती रमायची नाही त्यात.रंगवलेल्या चित्रातले रंग कळायचेच नाही तिला.

‘कोणतीही कला असो कलाकार फक्त  एकट्यासाठी तिची निर्मिती करत नाही. त्याला कायम कुणीतरी  कौतुक करणारे हवे असते. स्वतःसोबत स्वतःच्या कलेत बेभान ,बेधूंद होणारे कुणी जवळचे त्याला हवे असते’.

मानस त्या बाबतीत कमनशीबी ठरला. रंगांची उधळण करायची तरी कुणासाठी?रंगांचे वेड हळूहळू त्याच्यातून बाहेर पडले.

सर्वसामान्य व्यक्तीसारखे त्याचे आयुष्य झाले. घर आणि आॕफिस.

रंगांची आठवण स्वस्थता मिळू देत नव्हती त्याला.

तेवढा वेळ अस्वस्थ राहून ती आठवण झटकून टाकायचा मनातून.

मानस आणि उर्मीला बाळ झाले.

मानसने उत्सव नाव ठेवले त्याचे.

उत्सव तीन चार वर्षाचा झाल्यावर त्याला असलेली रंगांची आवड मानसच्या लक्षात आली.

उत्सव त्याच्या सारखाच रंगांशी लीलया खेळतो हे जाणवून मानस अक्षरशः आनंदाने वेडा झाला.

त्याच्यातला कलाकार उत्सवच्या रुपात फुलणार आहे

ही जाणीव झाली त्याला.

मानसला उत्सवसाठी रंगांचे इंद्रधनुषी आकाश मोकळे करुन द्यायचे आहे.

मानसने रंग,कुंचला आणला.

उत्सवला  कुंचला कसा पकडायचा हे शिकवता शिकवता स्वतःच रंगात  हरवला.

कागदावर रंगांचे फटकारे ओढत राहीला.

त्याला माहित आहे

आता तो पक्ष्यांसारखे दूर आकाशात उडू शकणार नाही पण फुलपाखरासारखे रंगीत  पंख लेवून थोडी झेप तर नक्कीच घेऊ शकतो उत्सवबरोबर.

उत्सवला इंद्रधनुषी आकाश मोकळे करुन द्यायचे आहे.

आता तर खरा रंगांचा उत्सव सुरु होणार आहे.

शब्दपर्णवर  इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर
 
https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा
 
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
 
Email
whatsapp no,
9867408400
 
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
 
 
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

 

 

प्रिती

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!