माझे मन- लेख
माझे मन- लेख

माझे मन- लेख

माझे मन- लेख

 

मन छोटासाच दोन अक्षरी शब्द पण पर्वताएवढे सामर्थ्य असणारा पर्वता येवढा यासाठी म्हणलं की त्याच्याच म्हणण्यायावर आपलं सगळं काम चालत असत ना.

मग या महान हस्ती बद्दल काहीतरी लिहिलंच पाहिजे असं मला मनोमन वाटलं म्हणून मग मी अगदीच मनावर घेतलं की याच्याबद्दल सगळ्यांना कळायला पाहिजे की त्याला सुद्धा मन असतं.

हो पण त्याच्याबद्दल एवढं बोलत आहे मी ते महाशय नेमकं कुठे असतात याचे उत्तर देण खरंच कठीण आहे कारण असे एकही ठरलेल ठिकाण नाहीये जेथे हे नक्की सापडेल.

कारण मन वढाय वढाय असे बहिणाबाईंच्या म्हणण्यानुसार ते कुठेही भरकटत असते अगदी कुठेही म्हणजे कुठेही आपण कल्पना पण करू शकणार नाही तेथेही फिरून येते आणि याला वेळ काळ असं काहीही नसतं बरं वेळ ठिकाण यांचं भान असणारे ते मन कसल ?

याचे एकच काम एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर सतत उड्या घेत राहायचं ,कल्पनेच्या मनोऱ्यावर चढून साऱ्या काल्पनिक जगाच निरीक्षण करायचं.

हे करता करता ते वास्तव जगात कधी प्रवेश करतं हे कळत सुद्धा नाही कारण असतेच तशी जादू त्याच्याकडे
अगदी बिनदिक्कतपणे ते आपल्यात डोकावत असतं तेव्हा कुठे मग आपलं मन थाऱ्यावर येतं म्हणजे आपण स्वप्नातून शिरतो ते थेट वास्तवात.

अस खडबडून स्वप्नातून जाग करून वास्तवात आणण्याचं कामही ते तितक्याच नेटान करतं तेव्हा आपल्यालाही जाणीव होते की आपल्या मनाला देखील मन असतं .

कधी ते उदास होतं ,एकटच रुसून कोपऱ्यात जाऊन बसतं क्वचित आपल्याला न दिसणारे अश्रू ढाळत मुसमुसू रडते सुद्धा विनाकारण कशासाठी रडतय हे वेडं असं आपल्याला थोड्यावेळासाठी उगाचच वाटून जातं.
पण त्याला आतल्या आत काहीतरी खुपत असतं त्याशिवायच का ते असा वेडेपणा करत?
हे जाणायला सुद्धा एका हळव्या सुज्ञ मनाची गरज असते अशा एखाद्या मस्त मित्राची एकदा का भेट झाली की मग तशी त्याची कळी पटकन खुलते आणि खुदकन हसून उमलून येतं

ते फुल असतं आपल्या भावनांचं मग दवबिंदूसारखं चकाकणारं सुख ते अवघ्या हिरवाईवर पसरवत आतील दुःख तसंच लपवून सतत हिरवगारच दिसायचं ,सर्वांना दिपवणार, सुखावणारं रूपच बाह्यरंगी दाखवायचं किती मोठा संदेश देत असतं हे मन आपल्याला अगदी नेहमी ते असंच प्रेरित करत असतं .

एकदा का यांची स्वारी खुश झाली की मग काय या फुलावरून त्या फुलावर सतत गुंजारव करणाऱ्या भुंग्यासारखे फिरायचं फुलातला सारा मध मग आपल्याकडे साठवून घ्यायचा आणि वाट्टेल तेव्हा कायम आपलं तोंड उघडे ठेवून त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा .
आपलं ही नेमकं असंच असायला हवं अगदी मोकळं – ढाकळं हवा तेव्हा आनंद लुटणारा . म्हणजे अगदी या मनासारखं फुलातला जसा तो मध साठवतो जो कायम गोडच असतो त्यात कधीही कडवटपणा नसतो असंच आपणही चांगल्या गोष्टींची साठवण करायला हवी कडू आठवणी विसरून नेहमी गोड आठवणींचा आस्वाद घ्यायचा.

बघाना इवलसं मन तरीसुद्धा ते आपल्याला किती मोठ्या गोष्टी शिकवत कधी आपण याचा विचार तरी करतो का ?आपण नेहमी उगाच मोठ्यामोठ्या गोष्टींच्या सामर्थ्यांच अवडंबर करून या आपल्या छोट्याश्या मित्राला किती छळत असतो ना त्याला छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा असतात आनंदी होण्यासाठी पण आपण मात्र त्याला वेगवेगळ्या विचारांनी गोंधळून टाकतो पण त्यातूनही तो मार्ग काढतो आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो. बाप रे! बघा इवलसं मन पण किती काम करत असतं.
ते नसतं तर आपलं काय झाल असतं ?एवढं सगळं काम आपल्याला काही जमलं नसतं बुवा. देवाने आपल्याला ही फार मोठी भेट दिली आहे त्याला खुश ठेवायची जबाबदारी मात्र आपली. अरे जबाबदारी म्हंटलं की घाबरलात की काय? घाबरू नका जास्त काही करायचं नाही फक्त त्याला आवडतात त्या गोष्टी करायच्या .

म्हणजे सतत आनंदी राहायचं ,कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता त्याला नेटाने सामोरे जायचं ,हसून त्याचं स्वागत करायचं ,आपापसातील कटू गोष्टींना विस्मृतीच्या घरी चिरनिद्रेसाठी पाठवून आपण मात्र मस्तपैकी आनंद लुटण्यासाठी जागीच राहायचं .

आणि हो एक महत्वाचा कानमंत्र राहिलाच की आपल्या मनाला जे काही सलत ना ते अगदी कसलाही विचार न करता आपल्या मनाशी जुळणाऱ्या एखाद्या शेजारच्या मनाला नक्कीच सांगून टाकावं आणि छान मोकळं व्हावं जीवनाच्या फुलावर मस्त बागडण्यासाठी .

आता बस इतकच ! माझंही मन आता भरकटायला लागलंय ,थकल सुद्धा इतक्यातच आणि पेंगतय छोटासाच जीव तो बिचारा .
धन्यवाद!
: प्रतिमा कुलकर्णी-जोशी.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!