११-तिची आजी
संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला कि गाव अंधारात गुडूप व्हायचे. दिवा आणि कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात जास्त काही सुचत नव्हते.
सूर्यास्त होण्याआधीच जेवण उरकावे लागत असे.शारदाच्या घरी राॕकेलवर चालणारा वातीचा स्टोव्ह होता.इथे चुलीवर स्वयंपाक नकोसा व्हायचा तिचा जीव.तिच्यासाठी चूल पेटवणे पण एक दिव्यच राहायचे.लाकडं पेटवा,फुंकणीने फुंकर मारत बसा. असली कामे तिला जमत नव्हती.
शारदाच्या माहेरी लाईट होते.
शिवाय इथे शौचालयही नव्हते.
आठ दिवस कसेतरी काढून श्रीधर आणि ती भोपाळला परत गेले.त्यानंतर फार कमी वेळ शारदाचे इकडे येणे झाले.
श्रीधरचा संसार सुरु झाला,गीताही तिच्या संसारात रमली होती.मनोहरला एका गावी शिक्षकाची नौकरी मिळाली.
आता मनोहरसाठी मुली बघणे सुरु झाले. रमाईने तिच्या नात्यातीलच एक मुलगी सुचवली.
मुलगी खेड्यातील ,सधन कुटुंबातील होती.
थोडीफार शाळा शिकलेली होती. मुलीचे नाव कांता. मनोहर,प्रभाकर मुलीला बघायला गेले.दोघांनाही मुलगी आवडली. एवढ्यातच गीता आणि श्रीधरचे लग्न झाले म्हणून मनोहरचे लग्न चार महिन्यांनी करायचे ठरले.
सीताई सकाळीच उठून शेतात जात होती. सोबत शिदोरीत घट्ट तुरीची डाळ ,भाकर आणि तळलेली लाल मिरची न्यायची. शेतात काम करणाऱ्या बाया नीट काम करत नाहीत असा तिला नेहमी संशय असायचा.
शेत लांब होते.ती दमायची पण तरीही एकही दिवस घरी थांबायची नाही.
मुले कशीही निघोत मुलांसाठी कमाई करण्याचा मोह शेवटपर्यंत असतो. हेच खरे.
सीताईचा हा स्वभाव सगळ्यांनाच खूपदा त्रासदायकही वाटायचा. प्रत्येक गोष्टीत हिशोब बघणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.
मनोहरचा लग्नाचा दिवस जवळ आला. घरातील हे शेवटचे लग्न होते. शिवाय मनोहरला नौकरीही लागली होती.त्यामूळे या लग्नात सढळ हाताने खर्च करण्यात आला. कांता लग्न करुन या घरची सून झाली.
काही दिवस कांताने सासरी राहावे असे ठरले.
मनोहर नौकरीच्या गावी एकटाच गेला. कांता आणि इंदुमतीचे स्वभाव पट्कन जुळले. दोघी एकमेकींशी चांगल्या राहत होत्या.पण सीताई मात्र एकटी पडत गेली.दोनएक महिनै झाले कांताला इथे राहून. आता तिला मनोहरसोबत जायचे होते. ती दिवसभर एकटी कशी राहील म्हणून सीताईने तिच्यासोबत जायचे असे मुलांनी परस्परच ठरवले.
सीताईची इच्छा,तिला कुठे राहायचे आहे…या गोष्टींना काहीही महत्व नव्हते.
स्त्रीचे आयुष्य म्हणजे काही दिवसांचा उजेड बाकी अंधारच असतो.
दिवसागणिक हातून कशी सत्ता निसटत जाते कळतही नाही.
सीताईचे तसेच झाले. लहानवयात आईवडील गमावलेल्या सीताईच्या आयुष्यात रामच्या सहवासातील दिवस सोडले
तर काय होते?
ज्या घरात रामच्या सहवासात यौवन घालवले , मुलांना जन्म दिला,त्यांच्या असंख्य आठवणी असलेल्या त्या घरात तिने राहायचे कि नाही हे मुले ठरवायला लागले.
आणि नेहमीप्रमणेच तिने आतल्याआत इच्छा दडपली आणि मनोहरसोबत जायला तयार झाली.
मनोहरचे नौकरीचे गाव म्हणजे एक रम्य ठिकाण. गावात निर्मळ पाण्याने भरभरुन वाहणारी नदी,दाटीवाटीने उभी असणारी झाडे,झाडांच्या मध्येमध्ये असणारी सुंदर कौलारु छोटी घरे.मनोहरने नदीजवळच भाड्याने घर घेतले होते. नदीचा वाऱ्याने होणारा झुळूझुळू आवाज सतत कानावर पडत होता. नदीच्या बाजूला असलेल्या झाडांवरुन सतत पक्ष्यांचा मंजूळ आवाज कानावर पडायचा. मनोहरची शाळा इथून जवळच होती. शाळेसमोरच एक वडाचे मोठे झाड होते. त्याच्या लोंबलेल्या पारंब्याचा झोपाळा बनवून मुले झुलत राहायचे. त्याच्या बाजूलाच सोनचाफ्याचे झाड होते. पण वडाच्या मोठ्या झाडामुळे त्याचे असणे जाणवायचे नाही.सोनचाफा फुलायचा तेव्हा हवेच्या झुळकीबरोबर त्याचे सुगंधी अस्तित्व दाखवून द्यायचा.
कांताला गाव आवडले. पावसाळा संपला कि गावात एक टुरींग टाॕकीज यायची.अशावेळी गावात सणासारखे वातावरण असायचे.मनोहरला सिनेमाची आवड नव्हती पण कांताने इथे खूप सिनेमे बघितले. नदी ओलांडून सिनेमा बघायला जावे लागायचे. सिनेमा सुरु व्हायच्याआधी संळतोषीमातेची आरती व्हायची.कांता तेव्हा घरुन निघायची मुले आणि मैत्रिणींसोबत.बसण्यासाठी गोधडी सोबत न्यावी लागायची. टुरींग टाॕकिजमध्ये अर्थातच खुर्च्या नव्हत्या. सीताईने तिच्या लहानपणापासून खूप बदल बघितले होते.तिच्या लहानपणी पत्रही दुर्मिळ वाटायचे.नंतर तिच्या म्हातारपणात फोन,मोबाईल बघायला मिळाले.
ती नदीवर कपडे धुवायला जायची.मनोहरच्या घरी तिला वाॕशिंग मशीन,नंतर तिच्या म्हातारपणात फोन,मोबाईल बघायला मिळाले.
ती नदीवर कपडे धुवायला जायची.पाटा-वरवंट्यावर वाटण वाटायची.मनोहरच्या घरी तिला वाॕशिंग मशीन, मिक्सर, फ्रिज बघायला मिळाले
सीताई मनोहरच्या घरी रमली पण गावच्या अनंत आठवणी मनात घुटमळत राहायच्या. त्यांना मनातून हाकलून तर देता येत नव्हते.दिवस कसाही जायचा पण रात्र झाली की आठवणी जणू रात्री वाटच बघितल्यासारख्या सरसर यायच्या.
मध्ये दहा वर्ष गेली. गाव नवीन होते म्हणून कांताला सोबत द्यायला आलेली सीताई दहा वर्ष इकडेच थांबली.
गावी तिची गरज आता संपली होती,दयाला तीन मुली आणि दोन मुले होती, प्रभाकरला तीन मुले आणि एक मुलगी,मनोहरला दोन मुले आणि दोन मुली श्रीधरला दोन मुली एक मुलगा आणि गीताला एक मुलगा आणि एक मुलगी.
क्रमशः
Previous link
Next part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
उत्तम कथा.. पुढे काय…… उत्सुकता
छान कथा 👌👌
Khup chan